निवडणुकांसाठी राजकीय जमवाजमव
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. २१ : जवळपास तीन वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी आता प्रशासकीय स्तरावर तयारी सुरू झाली आहे. प्रभागरचनेची जबाबदारी संबंधित तहसीलदारांवर असेल, तर प्रक्रियेचे पर्यवेक्षण संबंधित उपविभागीय अधिकारी करतील. १४ जुलैपर्यंत जिल्हा परिषद गट, पंचायत समितीचे गण रचनेचे प्रारूप करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचदरम्यान येथील राजकीय पक्षांचीही जमवाजमव सुरू झाली आहे.
जून २०२२ मध्ये तयार केलेल्या प्रारूप आराखड्यानुसार, रायगड जिल्हा परिषदेच्या प्रभाग (गट) रचनेत ५९ वरून ६६ पर्यंत वाढ करण्यात आली होती; मात्र त्यानंतर या प्रभागरचनेला न्यायालयाने स्थगिती दिल्याने राज्यात सर्वच जिल्ह्यांप्रमाणे रायगडमध्येही नव्याने प्रभागरचना केली जात आहे. याची तयारी तहसील स्तरावर केली जात आहे. ही प्रभागरचना झाल्यानंतर २१ जुलैपर्यंत हरकती व सूचना मागवल्या जाणार असल्याची माहिती अलिबागचे तहसीलदार विक्रम पाटील यांनी दिली. या निवडणुकीत रायगड जिल्हा परिषद, एक महापालिका, १५ पंचायत समित्या, १० नगरपालिकांध्ये हजारो उमेदवार निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. हजारो उमेदवार आणि त्यांचे लाखो कार्यकर्ते तीन वर्षांपासून केव्हा निवडणुका घेतल्या जातील, याकडे लक्ष ठेवून आहेत.
महायुतीमध्ये अंतर वाढले
खासदार सुनील तटकरे आणि राज्याचे रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांच्यातील शाब्दिक युद्ध पुन्हा सुरू झाले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येऊन निवडणुका लढवतील, अशी कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. शिवसेनेच्या आमदारांनी आक्रमक भूमिका घेत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आव्हान देण्यास सुरुवात केली आहे. तर भाजपचे आमदार या सर्व परिस्थितीवर तटस्थ भूमिका घेताना दिसतात. स्थानिक विकास आघाड्या तयार करताना भाजप कोणाला साथ देणार, यावर येथील राजकीय गणिते अवलंबून आहेत.
शेकाप-राष्ट्रवादीची जवळीक
शेतकरी कामगार पक्षाचे काही नेते भाजपमध्ये गेल्यानंतर कमकुवत झालेल्या शेकापने राष्ट्रवादीला जवळ करण्याचा प्रयत्न केला आहे. पालकमंत्रीपदासाठी राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे याच योग्य उमेदवार असल्याचे म्हणत, त्यासाठी आंदोलन करणार, असे म्हणत शेकापच्या नेत्या चित्रलेखा पाटील यांनी राष्ट्रवादीबरोबर संबंध वाढत असल्याचे संकेत दिले आहेत.
अलिबागमध्ये तिढा वाढणार
सध्या अलिबाग नगरपालिका आणि आजूबाजूच्या ग्रामपंचायतीमध्ये प्रशासकीय राजवट आहे. याच संधीचा फायदा घेत आमदार महेंद्र दळवी यांनी नगरपालिकेच्या हद्दवाढीचा प्रस्ताव ठेवला. नव्याने प्रभाग रचना होताना, यातील काही ग्रामपंचायती दुसऱ्या प्रभागात जाण्याची शक्यता आहे. असे झाल्यास प्रभाग रचनेचा तिढा वाढणार असल्याचे राजकीय अभ्यासकांचे मत आहे.
प्रभाग रचनेचा कार्यक्रम
प्रारूप प्रभागरचना ः १४ जुलैपर्यंत
हरकती व सूचना : २१ जुलै
हरकतींवर आयुक्तांकडे प्रस्ताव : २८ जुलै
हरकतींवर सुनावणी : ११ ऑगस्ट
अंतिम गट - गणरचना आयोगाकडे पाठविणे : १८ ऑगस्ट
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.