सुधागडमध्ये ओल्या दुष्काळाची स्थिती

सुधागडमध्ये ओल्या दुष्काळाची स्थिती

Published on

पाली, ता. १ (वार्ताहर)ः सुधागड तालुक्‍यात मेपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची पूर्व मशागतीची कामे खोळंबली आहेत.शेतात पाणी साचले असून, संपूर्ण तालुक्‍यात आतापर्यंत केवळ ७२४ हेक्टरवरच पेरणी झाली आहे. त्‍यामुळे उत्‍पादन घटण्याची शक्‍यता आहे. सध्‍या पावसाचा जोर कमी झाल्‍याने भात रोपे बनवण्याचे आवाहन तालुका कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
तालुक्यातील एकूण भातलागवडीखालील क्षेत्र २८१६.९३ हेक्टर असून, सध्या केवळ २५४ हेक्टरवर पेरणी झाली आहे, तर नाचणीची लागवड १७३.४० हेक्टरवर करण्यात येत असून, आतापर्यंत १३.५९ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. वरीची पेरणीही ६.६४ हेक्टर क्षेत्रावर झाली आहे, तर गतवर्षी ५०.७० हेक्टरवर लागवड करण्यात आली होती. तालुक्यातील डोंगरपट्टी भागात म्हणजेच महागाव, चंदरगाव व हातोंड या ठिकाणी काही प्रमाणात लावणी सुरू आहे.

घराच्या परिसरात भात रोपे तयार करा
पावसाने अजून उसंत न दिल्याने भातशेतीत मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. घराच्या परिसरात जागा असेल तिथे प्लॅस्टिकची ताडपत्री टाकून रोपे तयार करू शकता तसेच छोटी नर्सरी तयार करून भात रोपे तयार करता येतील. ही रोपे नंतर भात लावण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात, अशी माहिती सुधागड तालुका कृषी अधिकारी दयावंती कदम यांनी दिली.

यंदा मेपासूनच पावसाने जोरदार सुरुवात केली. त्‍यामुळे बहुतांश शेतकऱ्यांना पेरणी करायला संधीच मिळाली नाही. आजही अनेक शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे पेरणी होऊ शकत नाही. सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत करावी.
- शरद गोळे, प्रगतिशील शेतकरी, शिळोशी

नुकसानभरपाईची मागणी
अवकाळी तसेच अतिवृष्टीने शेतात पाणी साचल्याने रोपे कुजण्याची शक्यता आहे. भातपिकाबरोबरच फळबागा, भाजीपाला लागवडीलाही मोठा फटका बसला आहे, तर नव्याने पेरणी केलेल्या पिकाची नासाडी झाली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्‍यामुळे ओला दुष्‍काळ जाहीर करून नुकसानभरपाई मिळावी, अशा मागणीचे निवेदन वंचित बहुजन आघाडीकडून तहसीलदारांना देण्यात आले आहे. रायगड जिल्हा संघटक राहुल गायकवाड, सुधागड तालुका अध्यक्ष स्वप्नील गायकवाड, महासचिव आनंद जाधव, रायगड जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत साळुंके, नारायण जाधव, अशोक वाघमारे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com