बचावकार्य, शोधमोहिमा आव्हानात्मक

बचावकार्य, शोधमोहिमा आव्हानात्मक

Published on

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. ३ : डोंगर-दऱ्यांमधील धबधब्यांपर्यंत चोरवाटेने पोहोचणारे हौसी पर्यटक आपला जीव धोक्यात घालत असल्‍याचे प्रकार आठवडाभरात समोर आले आहेत. पाण्याच्या प्रवाहात वाहून जाणारे मृतदेह बाहेर काढण्यासाठी तिथपर्यंत पोहोचणे सर्वसामान्य व्यक्तीला शक्यच होत नाही. यात हेलिकॅप्टर, ड्रोन, थर्मल कॅमेरा यांसारख्या आधुनिक साधनांचा वापर होत असला तरी बचाव पथकाचे आव्हानात्मक काम संपलेले नाही. स्वत:चा जीव धोक्यात घालून या मोहिमा राबवल्या जात आहेत.
मुरूड तालुक्यातील काशीद समुद्रकिनाऱ्यावर दोन दिवसांपूर्वी पुण्याहून आलेला तरुण समुद्रात बुडाला होता. त्‍याचा मृतदेह शोधण्यासाठी तटरक्षक दलाच्या हॅलिकॉप्टरचा वापर करण्यात आला, तरीही त्याचा शोध लागला नव्हता. अखेर सह्याद्री बचाव पथकाने थर्मल कॅमेरा लावलेल्या ड्रोनचा वापर केला. अखेर त्या मृतदेहाचे ठिकाण समजले, परंतु तिथे जाऊन मृतदेह बाहेर काढणे खूपच आव्हानात्मक होते. असाच प्रकार ३० जून रोजी माणगाव तालुक्यातील चन्नाट गावाजवळ एका धबधब्याच्या ठिकाणी घडला होता. मृतदेह शोधण्यापेक्षा, तो अवघड वाटेने गावापर्यंत आणण्यात सहभागी बचाव पथकांचा कस लागला. उंच उंच डोंगरातील खडतर पायवाटेवरून मृतदेह बाहेर आणण्यामध्ये अगदी जिकिरीचे बनले होते. काही ठिकाणी मृतदेह स्ट्रेचर व बोया रिंगच्या साह्याने नदीमधून बाहेर काढावा लागला, तर काही ठिकाणी अगदी स्ट्रेचरच्या साह्याने मृतदेह ओढत बाहेर काढावा लागला. यामध्ये पोलिस प्रशासन, शेलारमामा बचाव पथक तसेच सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्था सहभागी  झाली  होती. अशा घटना रायगड जिल्ह्यात वारंवार घडत असून, दीड महिन्यात १६ व्यक्तांचा विविध घटनांमध्ये मृत्यू झाला. अशा घटना घडू नये म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी पर्यटनस्थळांवर निर्बंध घातले आहे, तरीही हौसी पर्यटक नव्या नव्या वाटा शोधून धोकादायक पर्यटनस्‍थळी मौजमजा लुटण्यासाठी जात असून, यामुळे बचाव पथकाचे काम आव्हानात्‍मक बनते.

बचावमोहिमा शोधकार्यात रूपांतरित
धोकादायक पर्यटनस्थळावर पर्यटकांनी जाऊ नये, यासाठी अनेक ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे, परंतु ग्रामस्थ व पोलिसांची नजर चुकवून अतिउत्‍साही पर्यटक धोकादायक ठिकाणी पोहोचतात. रिल, फोटो काढण्याच्या नादात अनेक जण आपला जीव धोक्यात घालतात. मुसळधार पाऊस आणि फेसाळणारे धबधबे आणि सह्याद्रीच्या उंचचउंच पर्वतरांगामध्ये हे पर्यटक बेधुंद होतात आणि अतिउत्‍साहात आपला जीव गमावून बसतात. अशी ठिकाणे दुर्गम भागात असल्याने तिथे तत्काळ मदतही पोहोचू शकत नाही. ‘गोल्डन अवर’मध्ये बचावकार्य राबवता येत नसल्याने मोहीम मृतदेहाच्या शोधकार्यात रूपांतरित होते. असे मृतदेह शोधण्यात अनेक अडचणी येत असल्‍याचे बचाव पथकातील सदस्यांचे म्हणणे आहे.

काय आहे थर्मल ड्रोन?
ड्रोनमध्ये थर्मल इमेजिंग कॅमेरा वापरलेला असतो. हा कॅमेरा इन्फ्रारेड किरणाद्वारे वस्तूंचे तापमाण ओळखतो आणि त्याचे थर्मल प्रतिमेत रूपांतर करतो. यामुळे दृष्टीला न दिसणाऱ्या उष्णतेच्या पातळीसह गोष्टी सहज पाहता येतात. थर्मल ड्रोनमुळे मानवी डोळ्यांना न दिसणाऱ्या गोष्टी स्पष्टपणे पाहता येतात. ज्याचा वापर विविध क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. रायगड जिल्ह्यात पर्यटकांच्या शोधमोहिमांमध्ये केला जात आहे.

अनेकवेळा दोन ते तीन उलटले तरीही मृतदेह सापडत नाहीत. त्यानंतर ते मृतदेह कुजण्याच्या स्थितीत असतात. प्रचंड दुर्गंधी, निसरड्या वाटेने हे मृतदेह बाहेर काढून पंचनामा करावा लागतो. हा संपूर्ण कालावधी जसा नातेवाइकांसाठी तणावाचा असतो, त्याही पेक्षा शोधमोहीम राबवणाऱ्या बचाव पथकाला असतो. प्रत्येक क्षणाची बातमी होत असते आणि अशा स्थितीत मृतदेह शोधण्यात आलेल्या अपयशाचा ताण पथकातील सदस्यांवर असतो. तहान, भूक विसरून बचाव पथकातील सदस्य नैसर्गिक आव्हानांचा सामना करीत काम करीत असतात.
- सागर दहिंबेकर, अध्यक्ष, सह्याद्री रेस्क्यू टीम

सह्याद्री बचाव पथक आणि अन्य बचाव पथकेही सरकारी अनुदानाशिवाय चालवली जात नाहीत. अनेकदा पथकामधील सदस्य वर्गणी काढून बचाव साहित्य खरेदी करतात. त्यांना काही मदत सुनील तटकरे प्रतिष्ठानच्या माध्यमातून केली जाते. या मदतीपेक्षा पथकातील सदस्यांची मानसिक कणखरता महत्त्वाची आहे. पथकातील सदस्यांचा विमा काढलेला आहे, त्याचबरोबर त्यांचे प्रशिक्षणही नियमित होत असते. यामुळे रायगड जिल्ह्यातील ही पथके इतर राज्यातही जाऊन बचावकार्य राबवत असल्याने यशस्वी होत आहेत.
- अनिकेत तटकरे, माजी आमदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com