अलिबागमधील नाट्य संकुलाचे उद्या उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. ५ : रायगड जिल्ह्यातील सहकारी बॅंका आणि पतसंस्था एकापाठोपाठ बुडीत गेल्याने सहकार क्षेत्र पुन्हा उभारी घेईल किंवा नाही, याबद्दल शंका व्यक्त केली जात होती, परंतु महाराष्ट्रातील पहिला प्रयोग म्हणून महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक विभागाच्या आर्थिक पाठबळाने अलिबागमध्ये पीएनपी सहकारी सांस्कृतिक कला विकास मंडळाचे नाट्यगृह सोमवारपासून (ता. ७) पुन्हा सुरू होत आहे. तीन वर्षांपूर्वी लागलेल्या आगीत नाट्यगृह पूर्णपणे भस्मसात झाले होते. नव्या स्वरूपातील अद्ययावत नाट्यगृहाचे उद्घाटन ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
तीन वर्षांपूर्वी १५ जून रोजी नाट्यगृहात वेल्डिंगचे काम सुरू असताना ठिणगी पडून आग लागली होती. त्यामुळे अलिबागमधील नाट्य चळवळीला मोठा धक्का बसला होता. पीएनपी नाट्यगृह हे अलिबाग शहरातील महत्त्वाचे सांस्कृतिक केंद्र असून, सहकारी तत्त्वावर चालणारे आहे. नाट्य प्रयोगाबरोबरच विविध सांस्कृतिक कार्यक्रम, संगीत मैफल, नृत्य स्पर्धा, शाळांचे स्नेहसंमेलन आणि सामाजिक कार्यक्रमांसाठीही वापरले जाणार आहे. त्याचबरोबर स्थानिक कलाकारांना आणि नाट्यसंस्थांना आपली कला सादर करण्यासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ उपलब्ध होणार असल्याचे सहकारदिनानिमित्त आयोजित बैठकीत संस्थेच्या अध्यक्षा चित्रलेखा पाटील यांनी सांगितले.
नाट्यगृहात ७२२ क्षमतेची वातानुकूलित आसन व्यवस्था, जीबीएल ध्वनी आणि प्रकाश व्यवस्था आणि भव्य रंगमंच असे महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. जिल्ह्याला सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध करणे, हा नाट्यगृहाचा उद्देश असल्याचे चित्रलेखा पाटील यांनी सांगितले.
सांस्कृतिक विभागाकडून नऊ कोटींचा निधी
नाट्यगृहाला नवी झळाळी मिळण्यासाठी निधी मिळण्याबाबत रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांस्कृतिक कार्य विभागाकडे प्रस्ताव पाठवला होता. त्यानुसार तब्बल नऊ कोटी ३२ लाखांचा निधी मिळाला होता. हा निधी मंजूर करताना सरकारने काही अटी घातल्या आहेत. भविष्यात नाट्यगृहाच्या प्रयोजनासाठी पुन्हा निधीची मागणी करता येणार नाही, तसेच कुठलीही दुर्घटना घडू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नाट्यगृह सांस्कृतिक कार्य विभागासाठी दरवर्षी सलग १० दिवस अथवा टप्प्याटप्प्याने विनामोबदला उपलब्ध करून द्यावे लागेल.
जागतिक सहकार दिवसाचे महत्त्व
जागतिक सहकार दिवस दरवर्षी जुलै महिन्याच्या पहिल्या शनिवारी साजरा केला जातो. हा दिवस जगभरातील सहकार चळवळीचे महत्त्व आणि समाजाच्या विकासात त्याचे योगदान अधोरेखित करतो. सहकार म्हणजे एकमेकांना मदत करणे आणि एकत्र काम करणे. हा दिवस याच तत्त्वावर आधारित असलेल्या संस्थांचे उदा. सहकारी बँका, दूध उत्पादक सहकारी संस्था, ग्राहक सहकारी संस्थांचे महत्त्व दर्शवतो. या संस्था आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावतात. सहकारी संस्था लोकांना एकत्र येऊन व्यवसाय सुरू करण्यास, संसाधने सामाईक करण्यास आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत करतात. यामुळे ग्रामीण आणि कृषी अर्थव्यवस्था मजबूत होते.
अलिबागसह जिल्ह्यातील नाट्यसंस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी ही संस्था सहकारी तत्त्वावर स्थापन झाली आहे. अलिबागमध्ये नाट्यगृह उभारण्यासाठी सांस्कृतिक विभागानेही मोलाचे सहकार्य केले असून, नूतनीकरणासाठी साधारण १३ कोटी रुपये खर्च झाला आहे. यातून नाट्यकलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याबरोबरच उत्तम कलाकृती पाहता येतील. महाराष्ट्रातील नाट्यनिर्मात्यांनी येथे येऊन कलाकृती सादर करण्याचे आवाहन करत आहोत.
- चित्रलेखा पाटील, अध्यक्षा, पीएनपी सहकारी सांस्कृतिक कला विकास मंडळ
अलिबाग ः नाट्यगृहाचे काम पूर्ण झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.