सजगावमध्ये विठ्ठल भक्तीचा महापर्व
सजगावमध्ये विठ्ठलभक्तीचा महापर्व
पाली, ता. ५ (वार्ताहर) ः आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी हा दिवस महाराष्ट्रातील भक्तांच्या आध्यात्मिक जीवनात विशेष महत्त्वाचा आहे. या दिवशी केवळ पंढरपूरच नव्हे, तर गावखेड्यासह रायगड जिल्ह्यातील विठ्ठल मंदिरे भक्तांच्या उत्साहाने गजबजून जातात. विठ्ठलभक्तीचे हे संमेलन एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक असून, भारतीय संस्कृतीचे एक अद्भुत दर्शन घडवते.
देवशयनी एकादशीच्या निमित्ताने लाखो वारकरी पंढरपूरला पायी चालत जातात. जिल्ह्यात बहुतांश गावांमध्ये विठ्ठल मंदिरे आहेत. आषाढी एकादशीच्या दिवशी या सर्व मंदिरांमध्ये भक्तांची गर्दी असते. खालापूर तालुक्यातील सजगाव येथील विठ्ठल मंदिर धाकटी पंढरी म्हणून ओळखले जाते. सर्वच विठ्ठल मंदिरांमध्ये आषाढी एकादशीच्या दिवशी विशेष कार्यक्रम आयोजित केले जातात. सकाळी पूजा-अभिषेक, दुपारी पालखी उत्सव आणि संध्याकाळी कीर्तन कार्यक्रम असतो. काही ठिकाणी भक्तांसाठी मोफत भोजन (महाप्रसाद) असते. या मंदिरांमध्येही पंढरपूरप्रमाणेच ‘विठ्ठल विठ्ठल’चा घोष गुंजत असतो. काही भक्त पंढरपूरला जाऊ शकत नाहीत, त्यामुळे ते स्थानिक विठ्ठल मंदिरांमध्ये जाऊन आपली भक्ती अर्पण करतात. या मंदिरांमध्येही उत्साही वातावरण असते.
...................