बंदी कालावधीतही बेकायदेशीर मासेमारी

बंदी कालावधीतही बेकायदेशीर मासेमारी

Published on

बंदी काळातही बेकायदा मासेमारी
आतापर्यंत २२ मच्छीमारांवर कारवाई; संशयित बोटीच्या तपासात उघड

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. ८ : पावसाळ्यात मत्स्यजीवांचा प्रजनन काळ असल्‍याने त्‍यांची शिकार होऊ नये म्हणून दोन महिने खोल समुद्रात मासेमारीसाठी बंदी घातली जाते, परंतु तरीही काही मच्छीमार बेकायदा मासेमारी करीत असल्‍याचे समोर आले आहे. सोमवारपासून सुरू असलेल्‍या कोर्लई येथील संशयित बोटीच्या शोधमोहिमेत अलिबाग, मुरूड तालुक्यातील शेकडो मासेमारी नौका समुद्रात गेल्याचे उघड झाले आहे.
शोधमोहिमेत सुरक्षा यंत्रणेने बंदरात किती नौका आहेत, त्यांची कागदपत्रे, त्या नौका सध्या कुठे आहेत, याची चौकशी केली असता अनेक नौका मासेमारीसाठी गेल्‍याचे आढळले. बंदी कालावधीत अशा प्रकारच्या मासेमारीवर निर्बंध घालण्यात जिल्हा प्रशासन अपयशी ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. बेकायदा मासेमारीवर कारवाई कोणी करायची, यावरून सध्या पोलिस प्रशासन आणि मत्स्यव्यवसाय विभाग यांच्यात वाद निर्माण झाला आहे. मनुष्यबळाअभावी थेट कारवाई करता येत नसल्याचे मत्स्यव्यवसाय विभागाचे सहाय्यक उपायुक्त संजय पाटील यांचे म्‍हणणे आहे.
बेकायदा मासेमारी रोखण्यासाठी पोलिस, तटरक्षक दल, सागरी सुरक्षा दल यांना पत्रव्यवहार केला जातो; परंतु त्यांच्याकडूनही प्रतिसाद मिळत नसल्याचे मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
उरण तालुक्यातील करंजा, मोरा बंदरात सर्वाधिक बेकायदा मासेमारी होत असल्याचे आढळले आहे. त्याखालोखाल अलिबाग तालुक्यातील बोडणी, वरसोली, साखर आक्षी, रेवदंडा, मुरूड तालुक्यातील कोर्लई, एकदरा, आगरदांडा, श्रीवर्धन तालुक्यातील जीवनाबंदर, दिघी, दिवेआगर बंदरातील मच्छीमारांकडून मासेमारी होत आहे. सध्या समुद्रातील मासेमारीवर बंदी असल्याने मासळीचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. बाजारात ताज्या मासळीला मागणी असल्याने काही मच्छीमार लपून मासेमारी करीत असल्‍याचे तपास मोहिमेत आढळले आहे.

आतापर्यंत २२ जणांवर कारवाई
१ जूनपासून सुरू झालेल्या मासेमारीबंदी कालावधीत मत्स्यव्यवसाय विभागाने आतापर्यंत २२ जणांवर दंडात्मक कारवाई केली आहे. मच्छीमारांकडून एकूण १४ लाख ५० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. यातील काही दंड रोखीने, तर काही दंड हा जप्त केलेल्या मालाच्या विक्रीतून वसूल करण्यात आला. दिवसाला शेकडो नौका मासेमारीला जात असताना फक्त २२ जणांवर होणाऱ्या कारवाई मत्स्यव्यवसाय विभागाच्या कारभाराबद्दल संशय व्यक्त करणारी आहे. आतापर्यंत झालेली ही कारवाई जुजबी असल्याचे जिल्ह्यातील मच्छीमारांचे म्हणणे आहे.

१९ ठिकाणी सशस्‍त्र नाकाबंदी
कोर्लई येथील संशयास्पद बोट प्रकरणानंतर रायगड पोलिस दलाकडून तातडीने उपाययोजना करण्यात आल्या आहेत. जलद प्रतिसाद पथक व बीडीडीएस पथक यांच्या दोन तुकड्या करून रेवदंडा सागरी भाग, कोर्लई परिसर, जे. एस. डब्ल्यू, साळाव येथे रवाना करून पेट्रोलिंग व शोधमोहीम राबवण्याच्या सूचना दिल्‍या आहेत. जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाणे हद्दीत तसेच सागरी व खाडीकिनारी भागात एकूण १९ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. नाकाबंदीदरम्यान संशयित वाहने व व्यक्‍तींची कसून तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नाकाबंदी व संशयास्पद बोटीच्या तपासासाठी ५२ अधिकारी व ५५४ पोलिस अंमलदार यांचे वेगवेगळ्या पथक तयार करण्यात आले आहेत. त्यांच्याकडून झालेल्या तपासात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर मासेमारी सुरू असल्याचे उघड झाले आहे.

कारवाईमध्ये राजकीय लोकांचा जास्त हस्तक्षेप वाढलेला आहे. एका बाजूला हेच राजकीय लोक मत्स्य दुष्काळ होत असल्याची ओरड करतात आणि दुसऱ्या बाजूला बेकायदेशीर मासेमारीला प्रोत्साहन दिले जात आहे. मत्स्यव्यवसाय विभागाकडे खूपच कमी मनुष्यबळ आहे, अशा स्थितीत कारवाई करताना अनेक अडचणी येत आहेत.
- संजय पाटील, सहाय्यक उपायुक्त, मत्स्यव्यवसाय विभाग, रायगड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com