सुकेळी खिंडीत होणार टोलवसुली
महेंद्र दुसार : सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १७ : मुंबई-गोवा महामार्गाच्या सर्वात विवादित कासू ते इंदापूर या ४२.३ किलोमीटरच्या टोलवसुलीसाठी प्रवाशांना सुकेळी खिंडीत गाठण्याची जोरदार तयारी सध्या सुरू आहे. खिंडीच्या पायथ्याशी टोल प्लाझा उभारला जात असून, काम अंतिम टप्प्यात आहे. आता केवळ अधिसूचना निघणे बाकी असून, जानेवारीपासून टोलवसुली केली जाईल, असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.
महामार्गाच्या पहिल्या टप्प्यातील नागोठणे, कोलाड नाका येथील प्रमुख उड्डाणपुलांची अद्याप ४० टक्के कामेही पूर्ण झालेली नाहीत, तर काही ठिकाणी एकेरी वाहतूक आहे. सध्या चिखलमय रस्त्यावरून वाहने चालवावी लागत आहेत, अशा कंबरतोड प्रवासानंतरही कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना टोल भरावा लागणार आहे. न्यायालयाच्या आदेशाने या टप्प्याचे काम डिसेंबरअखेर पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे, परंतु सध्या सुरू असलेल्या कामाचा वेग पाहता, ही डेडलाइन पुन्हा हुकण्याची शक्यता दिसून येत आहे. आतापर्यंत अनेक डेडलाइन हुकलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या टोलवसुलीची डेडलाइन चुकणार नाही, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. महामार्गाच्या कामापेक्षा टोल प्लाझाच्या उभारणीचे काम अतिवेगात केवळ दोन महिन्यांत पूर्ण करण्यात आले. यावरून टोलवसुलीसाठी किती घाई चालली आहे, हे दिसून येत आहे. यास जिल्ह्यातील राजकीय लोकांनी विरोध करण्यास सुरुवात केली आहे.
दरवर्षी गौरी-गणपतीसाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना अनेक यातना सोसल्या लागतात. खड्डेमय रस्त्यामुळे पाठ, कंबरेचा त्रास जाणवतो, वाहने नादुरुस्तीमुळे लाखोंचे नुकसान होते. अपघातास जीवित हानी होते, तर आतापर्यंत हजारो जायबंदी झाले आहेत. महामार्गासाठी नागरिकांनी अनेकवेळा आंदोलने केली आहेत. तरीही अद्याप कामे पूर्ण झालेली नाहीत.
रत्नागिरी-सिंधुदुर्गातही विरोध
मुंबई-गोवा महामार्गावरील काम अजूनही पूर्णत्वास आलेले नाही. ज्या ठिकाणी काम पूर्ण झाल्याचा दावा केला जात आहे, तेथे टोलवसुली करण्याचा प्रयत्न केला जातो. गतवर्षी हातिवले (जि. रत्नागिरी) ते कणकवली (जि. सिंधुदुर्ग) या ७० किलोमीटरच्या टप्प्यासाठी टोलवसुली सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, परंतु नीलेश राणे यांनी केलेल्या तीव्र विरोधामुळे टोलवसुली सुरू होऊ शकली नाही. आता रायगडमधील टोलवसुलीसंदर्भात येथील लोकप्रतिनीधी कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
अपूर्ण कामामुळे केवळ ३० टक्के टोल
कासू ते इंदापूर या ४२.३ किलोमीटर अंतरासाठी निश्चित दरफलक राष्ट्रीय महामार्ग महामार्ग प्राधिकरणाने जाहीर केलेले नाहीत, परंतु हातिवले (जि. रत्नागिरी) ते कणकवली (जि. सिंधुदुर्ग) या ७० किलोमीटरच्या दरफलकावरून सुकेळी टोल प्लाझाचे दर किती असतील याचे मोजमाप वाहनचालक लावीत आहेत. द्रुतगती मार्गावर जास्त टोल आकारला जातो, कारण त्यांची बांधणी आणि देखभाल खर्च जास्त असतो. उदा. मुंबई-पुणे महामार्गावर कारसाठी प्रति किलोमीटर साधारण ३.२० रुपये टोल लागतो. अपूर्ण कामामुळे केवळ ३० टक्के टोल मुंबई-गोवा महामार्गासाठी घ्यावी लागणार आहे. ही सरासरी साधारणपणे १.२० रुपये प्रति किलोमीटर असेल असा अंदाज वर्तवला जात आहे. यात वेगवेगळ्या वाहनांसाठी वेगवेगळे दर ठरवले जाणार आहेत.
स्थानिकांना १५ किलोमीटरपर्यंत सवलत
टोलवसुलीतून टोलनाक्यापासून १५ किलोमीटरच्या परिसरातील वाहनचालकांना सवलत दिली जाणार आहे. यासाठी वाहनचालकांना टोलनाक्यावर आपल्या वाहनांची नोंद करावी लागणार आहे. त्यानुसार नाक्यावरून त्या वाहनाला जाण्यास परवानगी दिली जाईल. त्यापेक्षा जास्त अंतरातील नागरिकांना टोल भरणे सक्तीचे असेल. यात अधिक पारदर्शकता यावी, यासाठी जीपीएस प्रणालीचा वापर केला जाणार आहे. टोलवसुलीतील काही बारकाव्यांचा अभ्यास सध्या केला जात आहे.
----
रोख टोल भरणाऱ्यांना अधिकचा भार
टोलवसुली झटपट व्हावी यासाठी फास्टॅगचा वापर केला जाणार आहे. यासाठी तीन लेन तयार केल्या जात असून, रोखीने टोल भरणाऱ्यांसाठी एक लेन शिल्लक ठेवण्यात आली आहे. या लेनमधून जाणाऱ्या वाहनांना जर २० रुपये टोल फास्टॅगने भरावा लागणार होता, तर त्यासाठी साधारण ४० रुपये टोल रोखीने भरावा लागणार आहे. ही आकारणी फास्टॅगपेक्षा दुप्पट आहे. यातून दुचाकी वाहनांचा सूट आहे.
----
आधिसूचना येण्याची प्रतीक्षा
महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे काम डिसेंबर अखेरपर्यंत संपवण्याचे आदेश आहेत. हे काम कल्याण रोडव्हेज या कंत्राटदाराकडून वेळेत पूर्ण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. एकाच वेळी अनेक ठिकाणी कामे सुरू असून, सध्याच्या पावसामुळे त्यात थोडा व्यत्यय आला. हे काम संपल्यानंतर लगेचच टोलवसुली करावी लागेल. टोलवसुली सुरू करण्यासाठी अधिसूचना येणे बाकी आहे, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे महाव्यवस्थापक (तांत्रिक व प्रकल्प संचालक) यशवंत घोटकर यांनी दिली.
----
जोपर्यंत काम पूर्ण होणार नाही, तोपर्यंत टोल वसूल करून दिला जाणार नाही. कोकणातील नागरिकांनी या रस्त्यामुळे अनेक यातना सहन केलेल्या असल्याने त्यांना सुखकर प्रवासाचा आनंद मिळालाच पाहिजे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना मी लेखी पत्राद्वारे पहिल्या टप्प्यातील टोलवसुली करूच नये, अशी मागणी केलेली आहे.
- सुनील तटकरे, खासदार, रायगड लोकसभा
----
मुंबई-गोवा महामार्गाच्या कामात कसा भ्रष्टाचार झालेला आहे यासंदर्भात आम्ही याचिका दाखल केलेली आहे. वास्तुविशारद पी. एन. पडळीकर यांच्याबरोबरीने मी अनेकवेळा या महामार्गाची पाहणी केलेली आहे. सध्या सुरू असलेल्या कामाच्या वेगावरून पहिल्या टप्प्यातील काम २०२७ पूर्वी होणे शक्य नाही. अशा परिस्थितीत टोलवसुली करणे चुकीचे आहे. या टोलवसुलीविरोधात आम्ही हरकत घेतली आहे.
- ॲड. अजय उपाध्ये, तक्रारदार
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.