तर्कशक्ती, सर्जनशीलतेचे खेळ

तर्कशक्ती, सर्जनशीलतेचे खेळ

Published on

अमित गवळे, पाली
बुद्धीबळ हा जगातील सर्वात प्राचीन व बौद्धिकदृष्ट्या समृद्ध करणाऱ्या खेळांपैकी एक आहे. बुद्धीबळाचा उगम प्राचीन भारतातील ‘चतुरंग’ या खेळापासून झाल्‍याचे मानले जाते. हा खेळ इराण, युरोपमार्गे पसरत गेला. बुद्धीबळ हा केवळ एक खेळ नसून, तर्कशक्ती व सर्जनशीलतेचे प्रतीक आहे. जगभरातील लाखो बुद्धीबळप्रेमी रविवारी (ता. २०) आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ दिन साजरा करतात. अगदी गाव-खेड्यांपासून शहरापर्यंत या खेळाला महत्त्व आहे. त्यामुळे मैदानी खेळाबरोबरच बुद्धीबळ खेळाच्या स्पर्धादेखील अनेक ठिकाणी आयोजित केल्या जातात.

बुद्धीबळदिनाचा ऐतिहासिक संदर्भ
२० जुलै १९२४ रोजी पॅरिस येथे फिडेची (जागतिक बुद्धीबळ महासंघ) स्थापना झाली. ही संघटना बुद्धीबळाच्या नियमांचे प्रमाणीकरण करते आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन करते. १९६६ मध्ये युनेस्कोने हा दिवस आंतरराष्ट्रीय बुद्धीबळदिन म्हणून घोषित केला. २०१९ पासून संयुक्‍त राष्‍ट्रांनीही या दिवसाला अधिकृतपणे मान्यता दिली.

शैक्षणिक, मानसिक फायदे
बुद्धीबळ हा केवळ मनोरंजनाचे साधन नसून शैक्षणिक, मानसिक गुणवत्तावाढीसाठी उत्तम असा क्रीडाप्रकार आहे. हा खेळ खेळणाऱ्या मुलांमध्ये गणितीय क्षमता, तार्किक विचारसरणी आणि निर्णयक्षमता वाढते. नियमित बुद्धीबळ खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची एकाग्रता, स्मरणशक्ती आणि समस्या सोडवण्याची क्षमता इतर विद्यार्थ्यांपेक्षा वरचढ असते. मानसिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा खेळ तणाव कमी करण्यास आणि मानसिक संतुलनास मदत करतो.

एआयच्या जमान्यात बुद्धीबळाचे स्वरूप
तंत्रज्ञानाच्या विकासामुळे बुद्धीबळाचे स्वरूप बदलत आहे. कृत्रिम गुणवत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) आणि मशीन लर्निंगच्या मदतीने आता संगणक मानवी बुद्धीबळ खेळाडूंना पराभूत करू शकतात. तरीही मानवी बुद्धीबळाचे महत्त्व कमी झालेले नाही. उलट, नवीन तंत्रज्ञानामुळे बुद्धीबळाचा अभ्यास करणे आणि नवीन तंत्र विकसित करणे सोपे झाले आहे.

भारतातील बुद्धीबळाचे योगदान
भारताने बुद्धीबळ जगतात अतुलनीय योगदान दिले आहे. विश्वनाथन आनंद हे भारताचे सर्वात यशस्वी बुद्धीबळ खेळाडू आहेत, ज्यांनी पाच वेळा जागतिक विजेतेपद पटकावले. अलीकडच्या काळात डी. गुकेश, प्रज्ञानंद, निहाल सारथी, हरिका द्रोणावळी, अर्जुन एरिगसी, दिव्या देखमुखसारख्या तरुण प्रतिभा जागतिक स्तरावर भारताचे नाव रोशन करीत आहेत. भारत सरकारने बुद्धीबळाला क्रीडा प्रकार म्हणून मान्यता दिली असून अनेक राज्यांमध्ये शालेय अभ्यासक्रमात बुद्धीबळाचा समावेश करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com