सरकारी रुग्णालयात चार डायलिसीस मशीन
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. २० : रायगड जिल्ह्यातील चार सरकारी रुग्णालयांना आयडीबीआय बँकेने आपल्या सीएसआर उपक्रमाअंतर्गत डायलिसीस मशीन उपलब्ध करून दिल्या आहेत. जिल्हाधिकारी डॉ. किशन जावळे यांच्या उपस्थितीत नुकतेच त्यांचे लोकार्पण करण्यात आले.
सध्या जिल्ह्यातील अनेक रुग्णांना डायलिसिसची गरज आहे. रुग्णसंख्येच्या तुलनेत उपलब्ध मशीन कमी पडतात. अशा वेळी आयडीबीआय बँकेने एकाच वेळी चार मशीन उपलब्ध करून दिल्याने रुग्णांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये आणखी काही डायलिसीस मशीन उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न सुरू असल्याचे जावळे यांनी सांगितले. आयडीबीआय बँकेने राबवलेल्या सामाजिक उपक्रमांची माहिती या वेळी बँकेचे विभागप्रमुख रंजनकुमार रथ यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमास रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निशिकांत पाटील, सुधांशू कुलकर्णी, शाखाधिकारी निखिल सिन्हा आणि इतर अधिकारी उपस्थित होते.