पाली प्राथमिक आरोग्य केंद्रात जखमी अवस्थेत तरुण तीन तास उपचाराविना विव्हळत सार्वजनिक आरोग्य सेवेचा भोंगळ कारभार डॉक्टर सुट्टीवर 108 व 102 रुग्णवाहिका उपलब्ध नाही
उपचाराविना रुग्ण तीन तास विव्हळत
पाली प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रकार; डॉक्टर सुट्टीवर तर रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने हाल
पाली, ता. २० (वार्ताहर) ः पालीतील प्राथमिक आरोग्य केंद्रात गंभीर जखमी अवस्थेत उपचार घेण्यासाठी रविवारी (ता. २०) दुपारी रोशन पवार हा तरुण आला होता, मात्र या वेळी एकही डॉक्टर उपलब्ध नव्हता. अडीच ते तीन तासांनंतर खवली येथील डॉक्टरांनी तरुणाला तपासले व इथे उपचार करणे शक्य नसल्याचे सांगून त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यास सांगितले, मात्र १०८ व १०२ रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने नाइलाजाने पदरमोड करून खासगी रुग्णवाहिकेतून तरुणाला अलिबाग येथे नेण्यात आले.
रोशन पवार याच्या कानातून रक्त येत होते. पाठीवर अनेक मारहाणीच्या खुणा होत्या, मात्र प्राथमिक आरोग्य केंद्रात एकही डॉक्टर उपलब्ध नव्हता. आरोग्य केंद्रात केवळ दोन परिचारिका उपस्थित होत्या. डॉक्टरांअभावी रुग्णाला तीन तास ताटकळत राहावे लागले. त्या ठिकाणी उपस्थित रिपब्लिकन सेना रायगड जिल्हा अध्यक्ष अमित गायकवाड यांनी सांगितले की, प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन डॉक्टर आहेत. त्यापैकी डॉ. प्रियंका गवळी रजेवर होत्या, तर डॉ. अभिजित तळेकर यांचा मोबाईल बंद लागत होता. याबाबत गायकवाड यांनी परिचारिकांकडे विचारणा केली असता, त्यांनाही डॉक्टर कुठे आहेत, याबाबत माहीत नव्हते.
दरम्यान, रुग्णाची परिस्थिती गंभीर असल्याने नातेवाइकांनी गोंधळ घातला. त्यामुळे परिचारिकांनी खवली येथील डॉ. शुभम चिवेगावे यांच्यांशी संपर्क केला असता, १० मिनिटांनी ते दाखल झाले. तसेच रुग्णाला तपासून इथे उपचार होणार नाहीत, म्हणून अलिबाग येथे जिल्हा रुग्णालयात पाठवले.
शासकीय रुग्णवाहिका बेभरवशाच्या
सरकारने सुरू केलेल्या १०८ व १०२ क्रमांकाच्या दोन्ही रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने रुग्णाचे हाल झाले. १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका संध्याकाळी ७ वाजता उपलब्ध होणार होती, तर १०२ क्रमांकाची रुग्णवाहिका एका रुग्णाला घेऊन गेली होती. त्यामुळे तिलाही उशीर होणार होता. जखमी तरुणावर लवकर उपचार होणे गरजेचे होते. कारण आधीच त्याला प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये तीन तास ताटकळत राहावे लागले. अखेर त्याच्या नातेवाइकांनी त्याला खासगी रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात नेले.
आम्ही ज्या ज्या वेळी प्राथमिक आरोग्य केंद्रात येतो, तेव्हा आम्हाला विविध समस्यांना सामोरे जावे लागते. या ठिकाणी कधीच डॉक्टर वेळेवर उपस्थित नसतात. काही दिवसांपूर्वी एका रुग्णाला घेऊन आलो होतो, डॉक्टर उशिरा आल्याने रुग्ण दगावला. प्रशासनाने यावर ठोस उपाययोजना करावी.
- विश्वास वाघमारे, अध्यक्ष, आदिवासी समाज, सुधागड
तालुका गटविकास अधिकारी म्हणून माझ्याकडे जेव्हा ही तक्रार आली, तेव्हा तत्काळ तालुका आरोग्य अधिकारी शशिकांत मडवी यांच्याशी संपर्क केला असता त्यांचा फोन बंद होता. त्यानंतर मी आरोग्य विस्तार अधिकारी धनंजय पाटील यांच्याशी संपर्क साधला आणि तत्काळ एखादा डॉक्टर उपलब्ध करून देण्याबाबत सांगितले.
- लता मोहिते, गटविकास अधिकारी, सुधागड