सागरी महामार्गात भूसंपादनाचा अडथळा
सागरी महामार्गात भूसंपादनाचा अडथळा
तीन पुलांचा कार्यारंभ आदेश; ५४ हेक्टर खासगी भूसंपादनासाठी एमएसआरडीसीचे प्रयत्न
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. २२ : रेवस-रेड्डी सागरी महामार्गाच्या कामात रायगड जिल्ह्यातील तीन महत्त्वाच्या पुलांचा समावेश आहे. या पुलांच्या कामासाठी कार्यारंभ आदेश निघाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. संबंधित कंत्राटदारांचे कामगार बांधकाम ठिकाणी दाखल झाले असून, काही दिवसांतच कामाला सुरुवात होईल; परंतु या तीन मोठ्या पुलांसाठी आवश्यक भूसंपादनच अद्याप झालेले नाही. रेवस-करंजा, साळाव-रेवदंडा आणि आगरदांडा-दिघी या पुलांसाठी तब्बल ५४ हेक्टर खासगी जागा संपादित करावी लागणार आहे. आजघडीला यातील एक गुंठाही जागा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या ताब्यात नाही. जोपर्यंत भूसंपादन पूर्ण होत नाही, तोपर्यंत पुलांचे काम पूर्ण करणे शक्य नसल्याने कंत्राटदारही चिंतेत आहेत.
४० वर्षांपासून सागरी महामार्गाचे स्वप्न कोकणवासीयांना दाखवले जात आहे. आता पुलांची निविदा प्रक्रिया पूर्ण केली. पूर्वी दुपदरी असलेल्या ५२३ किमीच्या या महामार्गाचे चौपदीकरण करण्यात येणार असून, प्रकल्पाचा खर्च अंदाजे २६,४६३ कोटी रुपये इतका अपेक्षित आहे. तसेच या मार्गावर एकूण नऊ पूल उभारावे लागणार आहेत. यात तीन महत्त्वाचे पूल रायगड जिल्ह्यात आहेत. रेवस- करंजा पुलाची निविदा ॲफकॉन, साळाव-रेवदंडा पुलाची निविदा अशोका बिटकॉन आणि दिघी- आगरदांडा पुलाची निविदा हिंदुस्तान कन्ट्रक्शन कंपनीने जिंकली आहे. तिघांनाही कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत.
सर्वात महत्त्वाचा पूल रेवस-करंजा असून, याच पुलापासून सागरी महामार्ग सुरू होतो. याची लांबी १०.२० किलोमीमीटर असून, पुलासाठी कांदळवनाची जमीन सर्वात जास्त जात आहे, तर खासगी जमीन १७ हेक्टर संपादित करावी लागणार आहे. यासाठी १२ मार्च रोजी अंतिम अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली होती, तर सर्वात जास्त खासगी जमीन साळाव-रेवदंडा पुलासाठी संपादित करावी लागणार आहे. रेवदंड्यात नारळी-पोफळीच्या बागा असल्याने येथील बागायतदारांना वाढीव मोबदला हवा आहे. यासाठी चौल व कोर्लईतील जमिनीची संयुक्त मोजणी झाली आहे, तर उसडी, रांजणखार डावली, रेवदंडा येथील शेतकऱ्यांची भूमिअभिलेख विभागाने संयुक्त मोजणी अद्याप पूर्ण केलेली नाही. आगरदांडा-दिघी पुलासाठी म्हसळा तालुक्यातील तुरुंबवाडी आणि श्रीवर्धन तालुक्यातील दांडा गावातील ३.५६ हेक्टर पुलासाठी संपादित करावी लागणार आहे.
करंजा पुलापासून महामार्गाची सुरुवात
करंजा पुलापासून सागरी महामार्गाची सुरुवात होत असून, यातील हा सर्वात महत्त्वाचा पूल समजला जातो. रेवस-करंजादरम्यान पावसाळ्यात फेरी बोटसेवा बंद राहात असल्याने प्रवाशांची गैरसोय होते. त्यामुळे हा पूल होणे महत्त्वाचे झाले आहे. पुलामुळे अलिबाग थेट नवी मुंबई-मुंबईशी जोडला जाणार आहे. रेवस ते करंजा हा पूल दोन किमी लांबीचा असणार असून, त्याच्या दोन्ही बाजूला तीन किमी लांबीचे मार्ग असतील. शिवडी आणि रायगडमधील न्हावा-शेवाला जोडणारा मुंबई ट्रान्स हार्बर लिंक कार्यान्वित झाल्यानंतर, हा रेवस-करंजा पूल अलिबाग आणि मुरूडसह कोकणाकडे जाणाऱ्या पर्यटकांना खूप महत्त्वाचा ठरणार आहे. या पुलामुळे अलिबाग थेट नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासह जेएनपीटीला जोडले जाणार आहे.
पर्यटनवाढीसाठी मदत
कोकणातील बहुतांशी पर्यटन केंद्रे, समुद्रकिनारे व किल्ले किनारपट्टीवर असल्याने पर्यटन विकासाला गती मिळून मोठ्या प्रमाणावर पर्यटक कोकणात उतरतील. आंबा उत्पादन व मत्स्यव्यवसायाला अधिक गती मिळेल. संरक्षणदृष्ट्या सागरी किनारपट्टीला महत्त्व आहे. या मार्गवर दिघी, आगरदांडा, बाणकोट, बागमांडले, जयगड व दाभोळ हे पूल महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून बांधले जाणार आहेत. पर्यटन विकासासह कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी रेवस ते रेड्डी महामार्गाची नव्याने आखणी केली असून, या सागरी महामार्गाला कोकणातील ९३ पर्यटनस्थळांना जोडण्यात आले आहे.
बागमांडला-बाणकोट पुलाचे प्रशासकीय काम रत्नागिरी जिल्ह्यातून पाहिले जात आहे. रायगड जिल्ह्यातील तीनही पुलांचा कार्यारंभ आदेश काढण्यात आला असून, पुलांच्या कामासाठी कंत्राटदाराने साहित्य टाकण्यास सुरुवात केली आहे. भूसंपादन आणि शेतकऱ्यांना मोबदल्याचे काम एमएसआरडीसीकडून (महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ) केले जात आहे. पुलाच्या कामाबरोबर जोडरस्त्यासाठी आवश्यक असलेल्या जमिनीचेही संपादन करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
- महेंद्र दळवी, आमदार
रेवस-करंजा भागात धरमतर खाडीवरील पूल :
लांबी : १०.२० किमी
प्रशासकीय मान्यता : रु. ३०५७ कोटी
खासगी भूसंपादन - १७.९७ हेक्टर
पुलाचा प्रकार : स्टिल ब्रिज (लोखंडी पूल)
कामाची मुदत : ३ वर्ष - २०२७ मध्ये पूर्ण होईल.
----
रेवदंडा- साळाव भागात कुंडलिका खाडीवर पूल :
लांबी : ३.८२ किमी.
प्रशासकीय मान्यता रक्कम : १७३६ कोटी
खासगी भूसंपादन - ३२.६४ हेक्टर
पुलाचा प्रकार : केबल स्टे
कामाची मुदत : ३ वर्ष
----
दिघी आगरदांडा भागात आगरदांडा खाडीवर पूल :
लांबी : ४.३१ किमी.
प्रशासकीय मान्यता रक्कम : १३१५ कोटी.
खासगी भूसंपादन - ३.५६ हेक्टर
पुलाचा प्रकार : केबल स्टे
कामाची मुदत : ३ वर्ष
----
बागमांडला वेश्वी भागात बाणकोट खाडीवर पूल :
लांबी : १.७११ किमी.
प्रशासकीय मान्यता रक्कम : ४०८ कोटी
खासगी भूसंपादन -
पुलाचा प्रकार : केबल स्टे
कामाची मुदत : ३ वर्ष
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.