भूमिगत वीजवाहिन्यांचे जाळे विस्‍तारणार

भूमिगत वीजवाहिन्यांचे जाळे विस्‍तारणार

Published on

महेंद्र दुसार : सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. २३ : रायगड जिल्ह्यातील अनेक तालुक्‍यांना वारंवार खंडित वीजपुरवठ्याच्या समस्‍येला सामोरे जावे लागते. वाऱ्याचा वेग वाढला, वादळी वाऱ्यात वीजपुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी रायगड जिल्ह्यात ६२१.६७ कोटी रुपये खर्चून तालुक्यातील गावागावांत भूमिगत वीजवाहिनी टाकल्‍या जाणार आहे. कोकण आपत्ती सौमीकरण योजनेतून जिल्ह्यात १२६४.२३ किलोमीटर लांबीची भूमिगत विद्युतवाहिनीचे काम करण्यात येणार आहे. अलिबागमधील भूमिगत वाहिनीच्या यशस्वी प्रयोगानंतर इतर तालुक्‍यांतही याबाबत सर्व्हे केला जात आहे.
जागतिक बँकेकडून भूमिगत वाहिन्यांच्या प्रकल्पासाठी अर्थसाह्य मिळत असून, यामध्ये ७५ टक्के जागतिक बँक आणि २५ टक्के केंद्र सरकारचा वाटा आहे. यातील सर्वात जास्त ७१५ किलोमीटरची विद्युतवाहिनी श्रीवर्धन तालुक्यात टाकली जाणार आहे. निसर्ग आणि तौक्ते चक्रिवादळात श्रीवर्धन तालुक्यात मोठे नुकसान झाले होते. तब्बल तीन महिने अंधारात राहिलेल्या श्रीवर्धन शहरासह आजूबाजूच्या गावांमध्ये विद्युतवाहिनीचे जाळे विणण्यासाठी तब्बल २८५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्याचबरोबर पेण, मुरूड, रोहा, तळा, माणगाव, म्हसळा, महाड, पोलादपूर आणि उरण तालुक्यांचा या योजनेत समावेश केला आहे. खालापूर, कर्जत, सुधागड या तीन तालुक्यांना या प्रकल्‍पातून वगळण्यात आले आहे.
कोकण आपत्ती सौमीकरण योजनेच्या पॅकेज १मधून अलिबाग आणि आसपासच्या किनारपट्टी भागांमध्ये भूमिगत विद्युतवाहिनी योजना राबवण्यात आली आहे. अलिबाग-१ आणि अलिबाग-२ अशा दोन टप्प्यात राबवण्यात आलेल्या योजनेतून १२२.२५ किलोमीटरची विद्युतवाहिनी टाकण्यात आली आहे. योजनेचा मुख्य उद्देश वादळे आणि नैसर्गिक आपत्तींमुळे वारंवार होणाऱ्या वीजपुरवठ्याच्या व्यत्ययांवर मात करणे, तसेच विद्युत अपघातांचा धोका कमी करणे आणि शहराचे सौंदर्य वाढवणे हा आहे.


योजनेचे प्रमुख तपशील
* वादळ, अतिवृष्टी, पूर यांसारख्या आपत्तींमध्ये वीजपुरवठा सुरळीत ठेवणे
* विजेचे खांब पडणे, तारा तुटणे आणि वीजपुरवठा खंडित होणे टाळणे.
* वीज अपघातांचा धोका कमी करणे.
* शहरी भागातील विजेच्या तारांचे जाळे जमिनीखाली गेल्याने शहराचे सौंदर्य वाढवणे.
* वीजचोरी कमी करणे.


विद्युतवाहिनीची लांबी (किमी)
पेण - २३.७३
मुरूड - ९८.९५
रोहा - १५.००
तळा - २२.५०
माणगाव - १२.००
म्हसळा - २०२
श्रीवर्धन - ७१५
महाड - ६१.५०
पोलादपूर - ३०.५०
उरण - ८३.०५
एकूण - १२६४.२३
----
प्रकल्पावरील दृष्टिक्षेप (अलिबाग वगळून)
उच्चदाब वाहिनी - ६७३ किमी
लघुदाब वाहिनी - ५९१.१५
रोहित्रे - १८
टॉवर - २८
सर्व्हिस कनेक्शन ७१६५
अंदाजपत्रकीय रक्कम - ६२२.३३ रु.

वादळे किंवा इतर नैसर्गिक आपत्तींमध्ये वीज खंडित होण्याचे प्रमाण कमी होईल. त्याचबरोबर जमिनीखालील वाहिन्यांना बाह्य घटकांपासून (उदा. वारा, पाऊस, झाडे) होणारे नुकसान कमी होते, ज्यामुळे देखभालीचा खर्च कमी होतो. वादळात उंच उंच झाडे उन्मळून पडल्याने होणारे नुकसान प्रचंड असते. यावर भूमिगत विद्युतवाहिनीने काही प्रमाणात मात करता येईल.
- धनराज विक्कड, अधीक्षक अभियंता, पेण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com