श्रावणात आरोग्यदायी रानभाज्यांचा आहार

श्रावणात आरोग्यदायी रानभाज्यांचा आहार

Published on

श्रावणात आरोग्यदायी रानभाज्यांचा आहार
ग्रामीण भागांत विशेष मागणी, आदिवासींना रोजगार
पाली, ता. २६ (वार्ताहर)ः विविध सणवारांमुळे श्रावणाला अधिक महत्त्व असते. या काळात अनेकजण मांसाहार वर्ज्य करतात. त्यामुळे हंगामात मिळणाऱ्या आरोग्यवर्धक रानभाज्यांना अधिक महत्त्व असते. तसेच त्यांच्या सेवनाने आरोग्यही निरोगी राहते.
श्रावणात फुलणाऱ्या या वनस्पतींमध्ये औषधी गुणधर्मांमुळे त्यांच्या विक्रीतून रोजगारही उपलब्ध होतो. कोणतेही खते किंवा कीटकनाशकांशिवाय नैसर्गिक पद्धतीने उगवलेल्या भाज्यांमुळे आरोग्यदायी पर्वणीच असते.
-----------------------------------
आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व
कपाळफोडी ः जीर्ण आमवातामध्ये कपाळफोडीच्या पानांची भाजी खाण्याची प्रथा आहे. पोट गच्च होणे, मलाविरोधसारख्या विकारात कपाळफोडीच्या भाजीने आराम मिळतो. स्त्रियांची मासिक पाळी नियमित होत नसेल तर या भाजीचा उपयोग होतो. भाजीच्या पानात अँटिबायोटिक व अँटिपॅरासायटिक तत्त्वे असल्याने जुनाट खोकल्यावर उपयुक्त आहे.
--------------------------------
कंटोली ः कंटोली किंवा करटोली ही भाजी कारल्यासारखी दिसते. कारल्याच्या भाजीसारखीच ही भाजी केली जाते. जून ते ऑगस्टमध्ये फुले येतात. त्यानंतर फळे तयार होतात. कंटोली डोकेदुखीवर उत्तम औषध आहे. तसेच मधुमेहाच्या रुग्णांनी या भाजीचे नियमित सेवन केल्यास रक्तातील साखर कमी होते.
--------------------------------
कुरडू ः कुरडूची कोवळी पाने शिजवून भाजी करतात. दमेकरी जुनाट खोकला, वृद्ध माणसांचा कफ विकार यात ही भाजी उपयुक्त आहे. लघवी साफ करायला उपयोगी आहे. पालेभाजीने कफ कमी होतो. तसेच बिया मूतखडा विकारात उपयुक्त आहे.
-----------------------------------
कुलू ः फोडशी, कुलू किंवा काल्ला या नावाने ही रानभाजी ओळखली जाते. ही भाजी फक्त पावसाळ्यातच मिळते. एक प्रकारचे गवतच असते. इतर पावसाळी भाज्यांप्रमाणे ही चविष्ट असते. शाकाहारी, मांसाहारी या दोन्ही प्रकारांत वापर करता येतो.
-------------------------------
काटेमाठ ः कोवळ्या भाज्या आणि कोवळ्या फांद्या भाजीसाठी वापरतात. पावसाळ्यात ओसाड जमिनीवर, रस्त्याच्या कडेला आणि शेतात काटेमाठ ही वनस्पती आढळते.
-----------------------
चुका ः पानांची, कोवळ्या फांद्यांची आणि खोडांची भाजी केली जाते. ओसाड जमिनीवर, बागेत आणि शेतात वनस्पतीची वाढ होते. चुका ही भाजी अतिशय रुचकर असते. त्यामुळे भाजीला ‘रोचनी’ नावानेसुद्धा ओळखले जाते. ही भाजी आंबट-गोड असते.
----------------------------------
भारंग ः जिल्ह्यात ही भाजी मुबलक मिळते. ही भाजी उगवल्यानंतर कोवळी असताना तोडली जाते. भारंगाची सुकी भाजी विशेष लोकप्रिय आहे. काहीजण वाल टाकून ही भाजी करतात.
-------------------------
विविध प्रकार
रानभाज्या प्रकारांमध्ये अंबाडा, खरशिंग, दिंडा, लोथ, पेटा, भारंगी, अळू, तेरुली, फांगली, टाकळा, अग्निशिखा, रानतुळस, बांबू कोंब, रताळ्याचे कोंब, कवदर, कैला, टरली, कसविंदा, कुड्याच्या शेंगा अक्रोड विविध प्रकारच्या रानभाज्यांचा समावेश होतो.
़़़़़़-----------------------------
रानभाज्यांचे आहारातील महत्त्व खूप आहे. शासन व कृषी विभागाने त्यांच्या विक्रीस अधिक प्रोत्साहन द्यावे. रानभाज्यांना हक्काची बाजारपेठ व हमीभाव द्यावा. यामध्ये स्थानिक शेतकरी, आदिवासी व महिला गटांना सहभागी करून घ्यावे.
- तुषार केळकर, शेतकरी, सुधागड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com