प्रबोधन, जनजागृतीमुळे सापांना अभय

प्रबोधन, जनजागृतीमुळे सापांना अभय

Published on

नागपंचमी विशेष
-----------------------------

पाली, ता. २८ (वार्ताहर)ः सजीवसृष्टीतील महत्त्वाचा घटक असलेल्या सापांबद्दल विविध समज- गैरसमजांमुळे भीती असते. साप दिसला की त्याला मारण्याचा प्रयत्न होतो, मात्र सर्पमित्रांसह वन्यजीव रक्षक संस्था, वन विभागांच्या जनजागृतीने सापाला मारण्यापेक्षा वाचवण्याकडे कल वाढल्याने गाव-खेड्यांमध्ये सापांना मोकळेपणाने जगण्यासाठी आंदण मिळाले आहे.
सह्याद्रीच्या विस्तीर्ण पर्वतरांगा, विस्तीर्ण समुद्रकिनारा, विपुल वनसंपदेमुळे सापांसाठी मुबलक खाद्य, पोषक हवामानामुळे रायगड जिल्ह्यात सापांच्या विविध प्रजाती आढळतात, मात्र नागरीकरण, कारखानदारी, वनतोड, अतिवृष्टीमुळे सापांचे मानवी वस्तीमध्ये येण्याचे प्रमाण वाढले आहे, पण विविध अंधश्रद्धा, गैरसमजांमुळे त्यांना सर्रास मारले जात होते, मात्र आता परिस्थिती बदलली असून, प्रबोधन, जनजागृतीमुळे लोकांच्या मनातील सापांबाबतची भीती कमी झाली आहे.
---------------------------------
मानवी वस्तीत आढळणारे साप
विषारी मण्यार, घोणस, नाग, बिनविषारी तस्कर, अजगर, धामण, कुकरी, कवड्या, दिवड (वेरुळा), निमविषारी मांजऱ्या, हरणटोळ हे साप पावसाळ्यात जास्त प्रमाणात घरात, मानवी वस्तीत आढळून येतात.
---------------------------------------
कोट ः
साप हा अन्नसाखळीतील एक महत्त्वाचा घटक आहे. तो शेतकऱ्यांचा मित्र आहे. मानवी वस्तीत साप मारले जात होते ,पण वन विभाग, सर्पमित्र यांच्या प्रयत्नाने त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडले जाते. तसेच विविध माध्यमातून प्रबोधन सुरू आहे.
- समीर शिंदे, वन परिक्षेत्र अधिकारी कांदळवन, अलिबाग
------------------------------
लोक स्वतःहून सापाला वाचवण्यासाठी पुढे यायला हवेत. कोणत्याही मोबदल्याशिवाय सर्पमित्र जीवावर उदार होऊन सापांचे प्राण वाचवतात, मात्र या सर्पमित्रांना शासनाकडून किमान विम्याचे कवच तरी देण्यात यावे.
- अमित निंबाळकर, सर्पमित्र, पाली-सुधागड
------------------------------------
जिल्ह्यात मुलीदेखील साप पकडतात. ही बाब उल्लेखनीय आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. आतापर्यंत शेकडो सापांना जीवदान दिले आहे. तसेच त्यांचे नैसर्गिक संगोपन करून सुरक्षित अधिवासात सोडले आहे.
- सागर दहिंबेकर, सर्पमित्र व वन्यजीव रक्षक, कोलाड
----------------------------
विषारी, बिनविषारी असे साडेतीन हजारांहून अधिक सापांना सुरक्षित पकडून, वन विभागाच्या माध्यमातून नैसर्गिक अधिवासात सोडले आहे. सर्पमित्रांबद्दल नागरिकांमध्ये विश्वास, आपुलकी, आदराची भावना निर्माण झाली आहे.
- दत्तात्रेय सावंत, सर्पमित्र, पाली
------------------------------
अनेक वर्षे महाअंनिस नागपंचमीदरम्यान सर्प विज्ञान प्रबोधन सप्ताह हा उपक्रम राबवत आहे. जादूटोणा विरोधी कायद्याद्वारे सर्पदंशावर मंत्र-तंत्राद्वारे उपचार करणे दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा आहे. परिणामी विषारी सर्पदंशावर आता उपचारासाठी झाडपाल्याचे औषध व मंत्र-तंत्राचे उपचार करण्याऐवजी रुग्णालयात जाण्याचे प्रमाण वाढले आहे.
- मोहन भोईर, जिल्हा कार्याध्यक्ष, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, रायगड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com