सुबुद्धी दे रे गणराया...
सुबुद्धी दे रे गणराया...
३५ वर्षांपासून पालीला अशुद्ध पाणीपुरवठा, योजना लालफितीत
अमित गवळे ः सकाळ वृत्तसेवा
पाली, ता. ३१ ः अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली शहरात पाणी शुद्धीकरण होत नसल्याने नागरिकांनी गढूळ पाणी प्यावे लागते. शहरासाठीची पाणीपुरवठा योजना आजही लालफितीत अडकल्याने २५ कोटींच्या घरात गेली आहे. त्यामुळे अशुद्घ पाण्याच्या समस्येला तोंड देणाऱ्या ग्रामस्थांना आता प्रशासनाला ‘सुबुद्धी दे रे गणराया’, अशी बोलण्याची वेळ आली आहे.
पालीतील नागरिक तुषार ठोंबरे यांना ३५ वर्षांपूर्वीचे पत्रक आढळले होते. १९९० च्या या सूचना पत्रकात पाली ग्रामपंचायत हद्दीतील लोकांना अंबा नदीवरील पाणीपुरवठा योजनेमधून नळाद्वारे पाणीपुरवठा सुरू झालेला आहे. या योजनेचे पाणी शुद्धीकरण होऊन येत नसल्यामुळे गावात साथीचे रोग होण्याचा संभव असल्याचे लिहिले होते. तसेच लोकांनी पाणी उकळून पिण्यासाठी वापरावे, अशी विनंती करण्यात आली होती. ३५ वर्षांनंतर तशीच परिस्थिती आजही पाली शहरात आहे. अंबा नदीचे पाणी नळाद्वारे पुरविण्यात येते, पण वितरित होणाऱ्या पाण्यावर कोणतीही शुद्धीकरणाची प्रक्रिया होत नसल्याने कित्येक वर्षांपासून ग्रामस्थांच्या आरोग्याशी हा खेळ सुरू आहे.
---------------------------------------
पाली हे अष्टविनायक क्षेत्र आहे. येथे नियमित हजारो भाविक येत असतात. पालीची स्थायी लोकसंख्यादेखील १५ हजारांहून अधिक आहे. अशा परिस्थितीत भाविकांसह नागरिकांना नाइलाजाने गढूळ, खराब पाणी प्यावे लागत आहे. आत्तापर्यंत नळांतून जिवंत साप, खुबे, शिंपले, मासे आणि किडे आले आहेत. तसेच गाळ, चिखल आणि शेवाळ येणे नित्याचेच झाले आहे.
़़़़़ः-----------------------------------------
शुद्ध पाणी योजनेचा विसर
शुद्ध पाणी योजना १९७४ मध्ये मंजूर झाली आहे, मात्र ही योजना लालफितीत अडकली आहे. निवडणुकींच्या प्रचारात सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी व तत्कालीन मंत्री यांनी शुद्ध पाणी योजना कार्यान्वित करू, असे आश्वासन देतात, मात्र अजून काहीच झालेले नाही. त्यामुळे प्रशासन तसेच राजकारण्यांमुळे पालीकरांचे हाल होताना दिसत आहे.
----------------------------------------
योजनेतील अडचणी
महाराष्ट्र शासनाने केलेल्या २००८-९ च्या सर्व्हेनुसार पालीची लोकसंख्या भाविक व पर्यटकांच्या संख्येनुसार शुद्ध नळ पाणीपुरवठा योजनेचे नियोजन केले होते. एकूण सात कोटी ७९ लाखांचा निधी व १० टक्के लोकवर्गणीद्वार नळयोजना उभी राहणार होती, परंतु राजकीय श्रेयवादामध्ये योजना रखडली गेली. त्याचबरोबर १० टक्के लोकवर्गणीचा प्रश्नदेखील होता, मात्र पाली तीर्थक्षेत्र (क दर्जा) असल्यामुळे लोकवर्गणीची अट शिथिल करण्यात आली आहे. तसेच शुद्ध नळ पाणीपुरवठा योजनेसाठी २५ कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित आहे. २०२२ रोजी पाली नगर पंचायतची स्थापना झाल्यानंतर योजनेचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.
---------------------------------------
आमदार, खासदार, सरपंच, नगराध्यक्ष होऊन गेले, पण आजही पाली शहराची दयनीय परिस्थिती आहे. निवडणुकीला राजकारण करायचे सत्ता मिळवायची आणि पुढे जनतेच्या तोंडाला पाणी पुसायची, हेच झाले आहे. आता संयमाचा बांध फुटणार आहे.
- अमित निंबाळकर, सामाजिक कार्यकर्ते, पाली
़़़़़ः---------------------------------------
शुद्ध पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव मंजुरीसाठी नगरविकास विभाग ३३ (न. वि. ३३) येथे सध्या आहे. अप्पर सचिवांची मान्यता मिळाल्यावर एक बैठक होईल. पुढे मंजुरीची प्रक्रिया होईल. पाणीपुरवठा योजनेसंदर्भात स्वतः मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे. शुद्ध पाणी योजना कार्यान्वित होण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.
- अरिफ मणियार, प्रभारी नगराध्यक्ष, पाली नगर पंचायत
----------------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.