विचारधारेच्या राजकारणाला हरताळ

विचारधारेच्या राजकारणाला हरताळ

Published on

राजकीय विचारधारेचा अस्त
रायगड जिल्ह्यात लोककल्याणापेक्षा स्वहिताला प्राधान्य
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. २ : मोडणार पण वाकणार नाही, अशी ओळख रायगडच्या राजकारणाची कधीकाळी ओळख होती. त्यामुळे निवडणुकीदरम्यान मारामाऱ्या, फोडाफोडी असे प्रकार सातत्याने घडत होते. काँग्रेस, शेकाप, शिवसेनेची नेतेमंडळी कायम एक विचारधारेने राजकारण करत असताना त्यांचे कार्यकर्तेही एकमेकांची तोंडे पाहत नव्हते; परंतु आता परिस्थिती पूर्णपणे बदलत गेली असून एकाच कुटुंबात अनेक पक्ष पाहण्याची वेळ मतदारांवर ओढावली आहे. लोककल्याणापेक्षा स्वहिताच्या राजकारणाला अधिक प्राधान्य दिले जात असल्याने राजकीय समीकरणेही बदलली आहेत.
रायगडमधील राजकारण महाराष्ट्राच्या महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचे केंद्रबिंदू बनत आहे. या भागात स्थानिक पातळीवरचे प्रश्न, ऐतिहासिक वारसा आणि बदलत्या राजकीय समीकरणांमुळे राजकीय वातावरण गतिशील असते. जिथे इतिहासाची साक्ष देणारा रायगड किल्ला उभा आहे, शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा डंका वाजवला, तिथले राजकारण आज नव्या वळणावर आहे. पारंपरिक राजकीय बालेकिल्ल्यांची गणिते ढासळू लागली असून नव्या नेतृत्वाबरोबर नवी समीकरणे बनत आहेत. कधीकाळी जिल्ह्यावर जबर पकड असलेल्या शेतकरी कामगार पक्षाचा प्रमुख काँग्रेस (इं) हा प्रमुख विरोधक होता. काही ठरावीक घराणी राजकारणात सक्रिय होती. या दोन प्रमुख पक्षातील नेतेमंडळींबरोबर कार्यकर्तेही एकमेकांची तोंडे पाहत नसत. पुढे १९९३च्या नंतर जिल्ह्यात कट्टर हिंदुत्ववादी शिवसेना पक्षाचा प्रवेश झाला. तर २०१५ नंतर भाजपने आपली पकड मजबूत केली. हिंदुत्वाची दावेदारी करणाऱ्या या दोन्ही पक्षाने आता चांगलीच पकड निर्माण केली आहे; परंतु आताची परिस्थिती त्याच्या अगदी उलट असून विचारधारा, तत्त्व, निष्ठा, पक्षनीतीपेक्षा स्वहिताच्या राजकारणाला अधिक प्राधान्य दिले जात आहे. याचमुळे जिल्ह्यातील घराणेशाही असलेल्या शेकाप, काँग्रेस पक्षातील नेत्यांच्या एकाच कुटुंबात अनेक पक्ष पाहायला मिळत आहेत.
----
पारंपरिक वर्चस्वाला सुरुंग
गेल्या काही दशकांपासून रायगड जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन प्रमुख पक्ष होते. शिवसेनेचा कोकणात भावनिक जनाधार तर राष्ट्रवादीचा ग्रामीण पातळीवर प्रभाव हे समीकरण बराच काळ चालू होते; मात्र २०२२ नंतर राजकीय घडामोडींनी चित्र बदलून टाकले. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटात विभागणी रायगड जिल्ह्यात जाणवू लागली. कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आणि स्थानिक स्तरावर निष्ठा बदलताना दिसली. शरद पवार आणि अजित पवार यांच्या गटात फूट महत्त्वाची ठरली. सत्ता जवळ असणाऱ्या अजित पवार गटाकडे काही सरपंच, स्थानिक नगरसेवक वळले, तर पारंपरिक मतदार शरद पवारांकडे आहेत.
----
शेकापची अस्तित्वाची धडपड
शेतकरी कामगार पक्ष (शेकाप) हा पारंपरिक स्थानिक पक्ष असून रोहा, पेण, अलिबाग, सुधागड परिसरात त्याचा प्रभाव आहे; मात्र अलीकडे या पक्षाला नवसंजीवनी मिळाल्यासारखे वाटत आहे. पनवेल येथील शेकापच्या अधिवेशनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे यांनी प्रमुख उपस्थिती लावली. स्थापनेला ७८ वर्षे झालेल्या शेकापचे रायगड जिल्ह्यात अखंडित वर्चस्व होते. एकेकाळी राज्यात प्रमुख विरोधी पक्ष म्हणून असलेल्या शेकापचे अस्तित्व अलिबाग तालुक्यासाठी मर्यादित राहिले. सत्ताकेंद्रे हातातून गेल्यानंतर आगामी निवडणुकीसाठी मनसेची मदत घ्यावी लागत असल्याबद्दल राजकीय विश्लेषकांना नवल वाटत आहे.
---
काँग्रेसला अखेरची घरघर
काँग्रेसच्या विचारधारेला मानणारे अनेक कार्यकर्ते, मतदार गावोगावी भेटतात; परंतु त्यांचे नेतृत्वच करणारे नेतेमंडळी या पक्षात राहिलेली नाही. माणगावचे साबळे आणि अलिबागचे ठाकूर, महाडच्या जगताप कुटुंबीयांनी काँग्रेसच्या नावावर सत्ता उपभोगली; परंतु आताची स्थिती काँग्रेससाठी पूरक नाही, अशी या कुटुंबातीलच वारसदारांची धारणा झालेली आहे. अनेकांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश केल्याचे दिसून येत आहे. अलिबागचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे ज्येष्ठ पुत्र ॲड. प्रवीण ठाकूर यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याने या पक्षात राहिलेली ताकदही संपवण्यात विरोधकांना यश आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com