सरसगडावरील चढाई दमाने

सरसगडावरील चढाई दमाने

Published on

सरसगडावरील चढाई दमाने
अतिउत्साहाच्या नादात अपघातांचे प्रकार, खबरदारीचे आवाहन
अमित गवळे ः सकाळ वृत्तसेवा
पाली, ता. ७ ः ऐतिहासिक महत्त्व तसेच निसर्गसौंदर्याने नटलेला सरसगड किल्ला गडप्रेमी, ट्रेकर्स, निसर्गप्रेमींना नेहमीच आकर्षित करतो; मात्र पावसाळ्यात खबरदारीशिवाय तसेच अतिउत्साहाच्या नादात वारंवार अपघात होत असल्याने गडावरील चढाई जरा दमाने करण्याचे आवाहन प्रशासन, ट्रेकर्सकडून करण्यात आले आहे.
पावसाळ्यात सरसगडावर जाणे किती धोकादायक आहे, याची प्रचीती शनिवारी (ता. २) झालेल्या अपघातानंतर आली. पाय घसरल्याने एका तरुण गंभीर जखमी झाला. रेस्क्यू टीम, पोलिस तसेच स्थानिकांच्या अथक परिश्रमाने त्याला खाली आणण्यात आले. अशाच प्रकारची घटना चार वर्षांपूर्वी झाली होती. सरसगडावरून पडून एका तरुणाचा मृत्यू झाला होता. अनेक ट्रेकर्स, दुर्गप्रेमी पडल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे गडावर जाताना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
-----------------------------------
अपघाताची कारणे
- पावसाळ्यात धोकादायक सरसगड किल्ला पावसाळ्यात निसरडा होतो. किल्ल्यावर जाण्यासाठी असलेल्या पायऱ्यांवर शेवाळ असल्याने अनेक वेळा पाय घसरतो.
- सरसगडावर चढताना तीव्र उतार आहे. अशा जागांवर पावसाळ्यात गवत असल्याने जागा चिकट होते. किल्ल्याच्या वरच्या टप्प्यावर हा धोका अधिक आहे. तेथून जाताना वाट धोकादायक होते.
-------------------------------------
ऐतिहासिक महत्त्व
या गडाचे महत्त्व ओळखून छत्रपती शिवरायांनी हा गड स्वराज्यात दाखल करून घेतला होता. सरसगडाच्या दुरुस्तीसाठी दोन हजार होन मंजूर केले. यानुसार दुर्गमता व विपुल जलसंचय यावर विशेष भर देऊन गडाची बांधणी करण्यात आली. दूरवर टेहळणी करण्यास, इशारा देण्यास ‘सरस’ असे नाव किल्ल्याला देण्यात आले. किल्ल्यावर जाण्यासाठी दक्षिण व उत्तर दोन्ही बाजूंकडून वाटा आहेत. चुना व घडीव दगडांचा उपयोग करून किल्ल्याला बुरूज व तटबंदी करण्यात आली आहे. दोन्ही बाजूला किल्ल्यावर प्रवेशद्वारे आहेत.
-----------------------------------
गडाची उंची ः ४९० मीटर (समुद्रसपाटीपासून)
पायऱ्या ः १११
--------------------------------------
दरवर्षी एक ते दोन अपघात
पावसाळ्यात निसर्गाने नटलेला सरसगड पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येतात; पण या गडाचा मधला टप्पा आणि वरचा टप्पा अतिशय कठीण आहे. या ठिकाणी असलेला हवेचा वेग तसेच पावसाळ्यात पाण्यामुळे आलेल्या शेवाळामुळे गडावर चढाई करताना काळजी घ्यावी लागते; पण अनेकदा उत्साहाच्या भरात पर्यटकांकडून जीव धोक्यात टाकला जातो.
------------------------------------
श्रावणातील विशेष महत्त्व
किल्ल्याला दक्षिणोत्तर जाणारे भुयार बालेकिल्ल्याच्या खालील बाजूस खोदलेले आहे. बालेकिल्ल्यावर जागेचे क्षेत्रफळ अर्धा हेक्टर आहे. या जागेतील जोगेश्वरी (केदारेश्वर) मंदिराभोवती तळे आहे. तसेच शहापीर दर्गा आहे. वैशाख पौर्णिमेला दर्ग्याचा उरूस भरतो, तर श्रावणी सोमवार, महाशिवरात्रीला केदारेश्वराच्या दर्शनासाठी किल्ल्यावर भाविकांची गर्दी असते.
----------------------------
कोट
ऐतिहासिक महत्त्व असलेला सरसगड किल्ला अस्मितेचा विषय आहे. येथील निसर्गसौंदर्य विलोभनीय आहे; मात्र येथे येणारे दुर्गप्रेमी, पर्यटक आणि ट्रेकर्स यांनी पावसाळ्यात जास्त खबरदारी घेण्याची गरज आहे. जीव धोक्यात येईल, अशी कोणतीही कृती करू नये.
- आरिफ मनियार, प्रभारी नगराध्यक्ष, पाली
---------------------------
किल्ल्यावर जाताना ट्रेकिंगचे प्रशिक्षण तसेच आवश्यक साधने गरजेची आहेत. पहिल्यांदाच येणाऱ्या पर्यटकांनी स्थानिकांना सोबत न्यावे. किल्ल्यावर एखादी दुर्घटना घडल्यास किल्ल्यावरून खाली आणण्यास विविध अडचणींना सामोरे जावे लागते.
- सागर दहिंबेकर, जीवरक्षक
---------------------------------
सरसगड किल्ल्यावर येणाऱ्यांनी सुरक्षा नियमांचे तंतोतंत पालन करावे. किल्ल्यावरील धोकादायक ठिकाणी जाऊ नये. किल्ला चढताना तसेच उतरताना आवश्यक खबरदारी घ्यावी. शक्यतो पावसाळ्यात येणे टाळावे.
- हेमलता शेरेकर, पोलिस निरीक्षक, पाली
----------------------------------
नगर पंचायतीमार्फत सरसगड किल्ल्याच्या पायथ्याशी सूचनाफलक लावण्यात आले आहेत. पावसाळ्यात किल्ल्याचा मार्ग अत्यंत धोकादायक झाल्याने किल्ल्यावर जाण्याचा मोह टाळावा.
- माधुरी मडके, मुख्याधिकारी, पाली नगर पंचायत

Marathi News Esakal
www.esakal.com