वृक्ष आमचे बंधू नेणवली शाळेत मुलांनी साजरा केला पर्यावरणपूरक रक्षाबंधन स्वतः बनवलेल्या पर्यावरणपूरक राख्या बांधल्या झाडांना
विद्यार्थ्यांकडून पर्यावरणपूरक रक्षाबंधन
पाली, ता. ९ (वार्ताहर) ः नेणवलीच्या जिल्हा परिषद शाळेतील मुलांनी यंदाचा रक्षाबंधन सण अनोख्या पद्धतीने साजरा केला. हाताने तयार केलेल्या राख्या विद्यार्थ्यांनी झाडांना बांधून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. या उपक्रमात शाळेतील सर्व मुलांनी उत्साहाने भाग घेतला. मुलांनी टाकाऊ वस्तूंपासून आणि नैसर्गिक साहित्यापासून सुंदर राख्या तयार केल्या. या राख्यांमध्ये प्लॅस्टिकचा वापर टाळण्यात आला होता. त्यानंतर या विद्यार्थ्यांनी झाडांना या राख्या बांधून वृक्ष जोपासण्याचा वसा घेतला.
या वेळी मुलांनी वृक्ष हाच खरा भाऊ, पर्यावरणाचे रक्षण हाच खरा सण, असा संदेश दिला. झाडांप्रती कृतज्ञता व्यक्त करून त्यांचे संरक्षण करण्याची शपथही मुलांनी घेतली. या अनोख्या उपक्रमामुळे मुलांमध्ये पर्यावरणविषयक जागरूकता निर्माण झाली असून, इतरांनाही त्यातून प्रेरणा मिळेल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. या उपक्रमासाठी विषय शिक्षक रवींद्र हंबीर यांचे मुलांना सहकार्य लाभले. मुख्याध्यापक राजेंद्र अंबिके यांनी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे मुलांना लहानपणापासूनच पर्यावरणाचे महत्त्व समजेल आणि ते जबाबदार नागरिक बनतील, असे सांगितले.
फोटो ओळ
पाली ः स्वतः बनवलेल्या राख्या विद्यार्थ्यांनी झाडाला बांधल्या.
स*स*स*स*स*स*स*स*स*स*स*स*स*स*स*स*स*
कर्जतमध्ये शिक्षकांसाठी दोनदिवसीय विशेष प्रशिक्षण शिबिर
कर्जत, ता. ९ (बातमीदार) ः तालुक्यात शिक्षकांसाठी विशेष दोनदिवसीय प्रशिक्षण शिबिर नुकतेच पार पडले. लाइट ऑफ लाइफ ट्रस्ट या राष्ट्रीय संस्थेच्या पुढाकाराने हे शिबिर सोमवारी (ता. ४) आणि मंगळवारी (ता. ५) आयोजित केले होते. श्रमजीवी जनता विद्यालय, पोशीर येथे झालेल्या या शिबिरात तालुक्यातील सहा शाळांमधील एकूण ३२ शिक्षकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. लाइट ऑफ लाइफ ट्रस्टचा शाळा सक्षमीकरण प्रकल्प, क्रेडिला फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड आणि एनटी असेट यांच्या संयुक्त विद्यमाने हे आयोजन केले होते. शिबिरामध्ये शिक्षकांना आधुनिक शिक्षण पद्धती, तंत्रज्ञानाचे महत्त्व आणि अध्यापन कौशल्य यावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. शाळा आणि पालक यांच्यातील नातं घट्ट करण्यासाठी पालकांचा सहभाग कसा वाढवावा, यावरही विचारमंथन झाले. या उपक्रमाचे समन्वयन आनंदो शाळा सक्षमीकरण प्रकल्पाच्या समन्वयक शिल्पा रांगणेकर, सहाय्यक समन्वयक संतोष जोगळे आणि प्रिया सोनावळे यांनी उत्कृष्ट रीतीने पार पाडले.
सस*स*स*स*
हर घर तिरंगा अभियानांतर्गत विविध उपक्रम
अलिबाग (वार्ताहर) ः हर घर तिरंगा ही मोहीम लोकचळवळ बनली असून, यामध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग असतो. यंदादेखील हर घर तिरंगा अभियान उत्साहाने राबवून त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करा, असे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले. हर घर तिरंगा अभियानांतर्गत दुसरा टप्पा ९ ते १२ ऑगस्ट आणि तिसरा टप्पा १३ ते १५ ऑगस्ट या तीन टप्प्यांत करावयाच्या कार्यवाहीबाबत शासनाकडून सूचना आलेल्या आहेत. हर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत शहरी व ग्रामीण भागातील प्रत्येक घरावर तसेच शासकीय/निमशासकीय सहकारी/खासगी आस्थापना कार्यालयात, अमृत सरोवर, वारसा स्थळे या ठिकाणी राष्ट्रध्वज फडकवण्यात यावा. ग्रामपंचायत, नगर परिषद, नगर पंचायत आणि जिल्हा स्तरावर मोठ्या प्रमाणात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. वारसास्थळांच्या ठिकाणी रोषणाई करण्यात येणार आहे. शाळा, महाविद्यालयामध्ये विविध विषयांवर स्पर्धा आणि रॅली, प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे. याबरोबरच जिल्ह्यात विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहेत. नागरिकांनीदेखील या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
स*स*स*स*स*स*स*स*स*स*स*स*स*स*स*स*स
‘मुलगी शिकवा, मुलगी वाचवा’ कार्यशाळा उत्साहात
माणगाव, ता. ९ (बातमीदार) ः जे. बी. सावंत एज्युकेशन सोसायटीचे टिकमभाई मेथा कॉमर्स कॉलेज माणगाव येथे शुक्रवार (ता. ८) चाइल्ड हेल्थ फाउंडेशन रायगड, राष्ट्रीय सेवा योजना विभाग व महिला विकास कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने मुलगी शिकवा, मुलगी वाचवा, स्त्री-पुरुष समानता, बालविवाह व स्त्री भ्रूणहत्या प्रतिबंध, सामाजिक जाणीव जागृती कार्यशाळा कार्यक्रम उत्साहात पार पडली. या कार्यशाळेत एकूण ८२ विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. या कार्यक्रमास महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अमृता देशमुख कार्यशाळेच्या सुरुवातीला प्रा. डॉ. जगदीश शिगवण यांनी प्रास्ताविक करून उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. चाइल्ड हेल्थ फाउंडेशनचे रायगड जिल्हा प्रतिनिधी आकाश मिंडे, महाविद्यालयाचे प्रा. हर्षल जोशी यांनी कार्यक्रमात मार्गदर्शन केले. प्रा. अशोक मोरे, प्रा. डॉ. जगदीश शिगवण, प्रा. डॉ. नितीन मुटकुळे, प्रा. भारत पवार, प्रा. सायगावकर, ग्रंथपाल अमित बाकाडे यांच्यासह सर्व शिक्षक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
सससससससससससससससससससससससस
गोस्वामी तुळशीदास मुंशी प्रेमचंद यांची जयंती साजरी
पेण, ता. ९ (बातमीदार) ः भाऊसाहेब नेने महाविद्यालयात गोस्वामी तुलसीदास मुंशी प्रेमचंद यांची जयंती हिंदी विभाग, हिंदी अनुवाद प्रमाणपत्र कोर्स व डीएलएलइ यांच्या संयुक्त विद्यमाने साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त महाविद्यालयात भाषण स्पर्धेचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सदानंद धार व हिंदी विभाग अध्यक्ष डॉ. देविदास बामणे, संघर्ष कला शाखा व राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. हेमलता सावंत, डॉ. महानंदा कोळी, प्राध्यापक सुप्रिया धुमाळ प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाषण स्पर्धेत प्रथम क्रमांक वैष्णवी गुळवे, द्वितीय क्रमांक दर्शना उघडे, तर तृतीय क्रमांक पंकज शिंदे व निशा राठोड यांना विभागून देण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.