आश्रमशाळेत रंगीबेरंगी ‘तिबोटी खंड्या’चे आगमन

आश्रमशाळेत रंगीबेरंगी ‘तिबोटी खंड्या’चे आगमन

Published on

आश्रमशाळेत रंगीबेरंगी ‘तिबोटी खंड्या’चे आगमन
प्राणीमित्राकडून विद्यार्थ्यांना वन्यजीवाशी ओळख
पाली, ता. १२ (बातमीदार) ः माणगाव येथील वनवासी कल्याण आश्रमशाळेत गेल्या आठवड्यात रायगड जिल्ह्याचा राजपक्षी म्हणून ओळखला जाणारा रंगीबेरंगी पिटुकला ‘तिबोटी खंड्या’ दाखल झाला. या आगळ्या पाहुण्यामुळे शाळेतील वातावरण आनंदी आणि कुतूहलमय झाले. विद्यार्थ्यांनी या पक्ष्याबद्दल प्रत्यक्ष माहिती मिळवत निसर्गाशी आपली नाळ आणखी घट्ट केली.
शाळेच्या आवारात दुपारच्यादरम्यान लहान परंतु तेजस्वी रंगांच्या पिसांनी नटलेला पक्षी दिसताच मुला-मुलींची गर्दी झाली. शाळेचे अधीक्षक विलास देगावकर यांच्या लक्षात ही बाब आली. सातवीतील देवानंद नावाच्या विद्यार्थ्याने पक्ष्याला काळजीपूर्वक हातावर घेत सुरक्षित ठिकाणी आणले. त्वरित त्याला मुक्त सोडण्यात आले. परंतु दुसऱ्याच दिवशी तो पुन्हा शाळेत परत आल्याने विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकांनाही आश्चर्याचा धक्का बसला.
देगावकर यांनी ही माहिती माणगावचे वन्यजीव अभ्यासक शंतनु कुवेसकर यांना दिली. त्यांनी तत्काळ शाळेला भेट देऊन पक्ष्याची पाहणी केली. त्यांच्या मते हा ‘तिबोटी खंड्या’ प्रजातीचा, नुकतेच घरट्यातून बाहेर पडलेला पण अजून शिकाऊ अवस्थेत असलेला पिल्लू होता. चोचीच्या बदलत्या रंगावरून तो साधारण पंधरा ते वीस दिवसांचा असावा, असा अंदाज त्यांनी वर्तवला. कुवेसकर यांनी विद्यार्थ्यांना रायगड जिल्ह्याचा पक्षी म्हणून ‘तिबोटी खंड्या’ची वैशिष्ट्ये, जीवनचक्र आणि त्याचा अधिवास याबाबत सविस्तर माहिती दिली. त्यानंतर विद्यार्थ्यांनीच पिल्लाला शाळेजवळील सुरक्षित नैसर्गिक अधिवासात नेऊन मुक्त केले. भरारी घेताच पक्षी स्वैरपणे जंगलाच्या दिशेने उडून गेला, आणि त्या क्षणी मुलांचा आनंद गगनात मावेनासा झाला. कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक अरुण पाटील, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक उत्तम पाटील, प्राथमिक शिक्षक काशिनाथ घाणेकर, शिक्षिका मयुरी भगत, अधीक्षक विलास देगावकर, प्रयोगशाळा परिचर दिनेश पारधी तसेच सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
................
पक्ष्यांचा विणीचा हंगाम
वन्यजीव अभ्यासक शंतनु कुवेसकर यांच्या मते, जून ते सप्टेंबर हा ‘तिबोटी खंड्या’चा विणीचा हंगाम असतो. हे पक्षी प्रामुख्याने दक्षिणेकडून स्थलांतर करून कोकणातील व मुंबईपासून गुजरातच्या सीमेपर्यंतच्या प्रदेशात आढळतात. लहान व शिकाऊ अवस्थेमुळे हे पिल्लू चुकून शाळेच्या परिसरात आले असावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com