हुल्लडबाजांनी वाढवली प्रशासनाची डोकेदुखी
हुल्लडबाजांनी वाढवली प्रशासनाची डोकेदुखी
पर्यटकांची धबधबे, समुद्रकिनाऱ्यावर गर्दी; उधाणाने खवळलेल्या समुद्रात वाढला धोका
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १६ : सलग सुट्ट्यांचा फायदा घेत रायगड जिल्ह्यातील धबधबे, समुद्रकिनारे आणि पर्यटनस्थळांवर पर्यटकांची प्रचंड गर्दी झाली आहे. मात्र पावसामुळे उधाण आलेल्या समुद्रात हुल्लडबाज पर्यटकांचे वागणे प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत आहे. शनिवारी (ता. १६) सकाळपासून पर्यटकांची ही गर्दी वाढू लागल्याने पोलिस प्रशासनाला दहीहंडी उत्सावाच्या बंदोबस्ताबरोबरच पर्यटनस्थळावर जाणाऱ्या हुल्लडबाज पर्यटकांना रोखण्यासाठी बंदोबस्त लावावा लागला.
मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. समुद्र खवळलेला असून किनाऱ्यावर उधाणाचा तडाखा बसेल, असा अंदाजही आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने वर्तविला होता. त्यानुसार येथील समुद्रकिनाऱ्यावर भरतीच्या वेळेला ३.४१ मीटर उंचीच्या लाटांचा मारा होत असताना काही हुल्लडबाज तरुण या लाटांमध्ये मजा लुटत होते. अलिबाग समुद्रकिनारी ११ वाजताच्या दरम्यान दोघे जण बुडताना वाचण्यात यश आले. लाटांबरोबर समुद्रात वाहत जात असताना तैनात असलेल्या जीवरक्षक दलाच्या सदस्यांनी त्यांना सुखरूप बाहेर काढले. अलिबाग, वरसोली, किहीम, दिवेआगर, मुरुड समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची तुडुंब गर्दी होती; परंतु ही गर्दी प्रशासनाला डोकेदुखी ठरत आहे.
-----
धबधब्यांवर पर्यटकांची गर्दी
देवकुंड, कुंभे, नाणेमाची, सिद्धेश्वर धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी दिसून आली. मद्यपान करून धबधब्याजवळ जाणाऱ्या पर्यटकांमुळे दुर्घटनेचा धोका वाढल्याने पोलिस प्रशासनाला येथे अतिरिक्त बंदोबस्त लावावा लागला आहे. या ठिकाणी मद्यपान केल्यानंतर दुर्घटना घडू नये, यासाठी खबरदारी घेतली जात आहे.
बचाव पथके सतर्क
एखादी व्यक्ती जेव्हा बेपत्ता होते तेव्हा त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी प्रशासनाची खूप मोठी ताकद खर्च होत असते. त्यातच तीन दिवस जिल्ह्यात पडणाऱ्या पावसाचा जोर वाढलेला आहे. ओसंडून वाहणारे धबधबे, समुद्राला आलेले उधाण आणि गोपाळकालाच्या दरम्यान दुर्घटना होण्याच्या शक्यता जास्त असतात. या दुर्घटनांमधील व्यक्तींना वाचवण्यासाठी जिल्ह्यातील विविध रेस्क्यू टीम यांनी सज्ज राहावे, अशा सूचना आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाद्वारे देण्यात आलेल्या आहेत.
दहीहंडी उत्सवासाठी बंदोबस्त लावलेला असतानाच पर्यटनस्थळीही गर्दी वाढली आहे. मर्यादित मनुष्यबळामुळे अडचणी येत आहेत. होमगार्डच्या मदतीने बंदोबस्त पुरवला जात आहे.
- आंचल दलाल, जिल्हा पोलिस अधीक्षक, रायगड
महत्त्वाच्या सूचना
खवळलेल्या समुद्रात उतरणे टाळा
धबधब्याजवळ मद्यपान नको
प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा
अपघात टाळण्यासाठी संयम बाळगा
*उधाणाचा तडाखा
भरती - पहाटे ४.३५ (११.२५ फूट)
ओहटी - सकाळी १०.१६ (५.९७ फूट)
भरती - सायंकाळी ४.०२ (११.१९ फूट)
ओहटी - रात्री १०.५५ (२.५३ फूट)
----
*जिल्ह्यात पडलेला पाऊस
पनवेल १४१.४ मिमी
पोलादपूर - १२८.०० मिमी
श्रीवर्धन - १३५.०० मिमी
म्हसळा - १५८.०० मिमी
सरासरी - ८०.७१ मिमी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.