दरड कोसळून महिला ठार

दरड कोसळून महिला ठार

Published on

दरड कोसळून महिला ठार
मुरूडमध्ये दुर्घटनेनंतर राजकीय राडा

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १९ : मुरूड तालुक्यातील मिठेखार येथे मंगळवारी (ता. १९) रोजी काळी दरड कोसळून विठाबाई मोतीराम गायकर (वय ७५) यांचा जागीच मृत्यू झाला. गोठ्यात बांधलेल्या गाईला सोडण्यासाठी जात असताना कोसळलेल्या मातीच्या ढिगाऱ्यात त्या गाडल्या गेल्या. ग्रामस्थांनी तात्काळ धाव घेत ढिगाऱ्याची माती उचलण्याचा प्रयत्न केला; परंतु वृद्ध महिलेचा जीव त्यांना वाचवता आला नाही. त्यानंतर दरडग्रस्तांच्या मदतीला धावून आलेल्या राजकीय नेतेमंडळींमुळे येथे मोठा गदारोळ झाला.
विठाबाई गायकर यांचे मिठेखार वरची आळी येथे दुकान आहे. त्या दुकानाच्याच बाजूला गायी-म्हशींचा गोठा आहे. नेहमीप्रमाणे सकाळी ८.०० वाजताच्या दरम्यान गोठ्यातून गाईला सोडल्यानंतर कोणता आवाज येत आहे, हे पाहण्यासाठी त्या गोठ्याच्या पाठीमागील बाजूस पुन्हा गेल्या असतानाच डोंगराचा भाग कोसळून त्यांच्या अंगावर आला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. शासनाकडून त्यांच्या वारसांना चार लाख रुपयांची तात्काळ मदत जाहीर करण्यात आली. अलिबाग-मुरूडचे प्रांताधिकारी मुकेश चव्हाण यांनी स्थलांतर करण्याचे आश्वासन देत ग्रामस्थांना धीर देण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांना हे आश्वासन लेखी स्वरूपात हवे होते. जोपर्यंत लेखी स्वरूपात आश्वासन दिले जात नाही तोपर्यंत मृतदेह उचलण्यास ग्रामस्थांनी मनाई केली. याच संधीचा फायदा घेत राजकीय नेत्यांची येथे रीघ सुरू झाली. अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी, भाजपचे दक्षिण जिल्हाप्रमुख ॲड. महेश मोहिते, शेकापच्या नेत्या चित्रलेखा पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे असे सर्वच नेते घटनास्थळी दाखल झाले.
...
दोन महिला नेत्यांमध्ये राडा
एका बाजूला मृतदेहाजवळ नातेवाइकांचा आक्रोश सुरू असताना दुसऱ्या बाजूला भरपावसात शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी आणि शेकापच्या नेत्या चित्रलेखा पाटील यांचा वाद विकोपाला गेला. आपण कोणत्या ठिकाणी आहोत याची कोणतीही जाणीव या दोघींनाही नव्हती. चित्रलेखा पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर थेट सवाल करीत विचारले, ‘सत्ता तुमच्याकडे, प्रशासन तुमच्याकडे मग अशा दुर्घटना घडतात तरी का? तत्परता कुठे होती?’ या प्रश्नावर मानसी दळवी संतापल्या आणि त्यांनी थेट हात उचलला. पाहता पाहता दोन्ही महिला नेत्यांमध्ये उघडपणे हातापाई झाली. गावात मृत्यूचा आक्रोश होता; पण घटनास्थळावर सत्ताधाऱ्यांच्या बायकांचा ‘राजकीय तमाशा’ रंगला. या प्रकारावर ग्रामस्थांचा संताप उसळला. लोकांनी संतप्त होत सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. ‘मृत्यूचा प्रसंग आहे आणि तुम्ही राजकारण करता. आम्हाला तुमच्या सहानुभूतीची अजिबात गरज नाही. आम्ही व प्रशासन बघून घेऊ. लगेच इथून निघा!’ असे जाहीरपणे ओरडून सत्ताधाऱ्यांना घटनास्थळावरून हाकलून दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com