बाप्पाच्या आगमनासाठी सारेच सज्ज
बाप्पाच्या आगमनासाठी सारेच सज्ज
गाव-वाड्यांवर नवचैतन्य प्रबोधनात्मक व लोकोपयोगी उपक्रम
पाली, ता. २३ (वार्ताहर) : अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात धामधूम सुरू झाली असून, बाप्पाच्या आगमानासाठी बाजारपेठा सजल्या आहेत. गाव-वाड्यांमध्ये गणेशोत्सवाच्या तयारीची मोठी लगबग दिसत आहे.
पुणे-मुंबईसह इतर शहरांत कामानिमित्त राहणारे कोकणवासीय गणेशोत्सवानिमित्त आवर्जून गावी येतात. त्यामुळे इतर दिवशी ओस पडलेली गाव-वाड्यांवर आता नवचैतन्याने फुलून गेली आहेत. गणरायाची प्रतिष्ठापना झाल्यावर जागरणे, आरत्या होतात. शिवाय येथील अनेक मंडळे गणेशोत्सवात विविध प्रबोधनात्मक व लोकोपयोगी उपक्रमदेखील राबवतात. सुधागड तालुक्यातील वावे गावातील तरुण गणरायासमोर व्हॉलीबॉल व इतर स्पर्धा घेतात. ग्रंथालयात पुस्तके वाचण्यासाठी तरुण व मुले जमतात. अशा प्रकारे गणेशोत्सवात तरुणाईला विधायक कामात गुंतवले जाते. या उपक्रमामुळे तरुण व ग्रामस्थ एकत्र येणे आणि विधायक समाज घडवणे हाच हेतू असतो, असे वावे गावातील तरुण केतन म्हसके यांनी सांगितले.
जिल्ह्यातील प्रसिद्ध तरुण कवी उमेश जाधव म्हणाले, की गणेशोत्सवापूर्वी सर्व गावकरी एकत्र येऊन साफसफाई करतात. गावात भजन-कीर्तनाचे कार्यक्रम राबविले जातात. सत्यशोधक वारकरी संप्रदायाचे रायगड जिल्हाध्यक्ष हभप महेश पोंगडे महाराज म्हणाले, की गणपतीमध्ये प्रबोधनाचे विविध कार्यक्रम राबवतो. दानशूर मंडळींच्या माध्यमातून आदिवासी व गरीब मुलांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप करण्यात येते.
लहानग्यांनाच पर्यावरणस्नेही व पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे महत्त्व पटवून दिले तर आपोआपच पुढची पिढी पर्यावरणाप्रति अधिक सजग होईल. या उद्देशानेच लहानग्यांसाठी येथे मातीचे गणपती बनविण्याची कार्यशाळा आयोजित केली जाते, असे तज्ज्ञ मार्गदर्शक नेहा तारकर देशमुख आणि अभिषेक देशमुख यांनी सांगितले. घरगुती सजावट माध्यमातून प्लॅस्टिकविरोधी संदेश, स्त्रीभ्रूणहत्या रोखणे, वृक्षलागवड, बेटी पढाओ असे जनजागृतीपर देखावे केले जातात. काही ठिकाणी महाराजांच्या गडकिल्ल्यांच्या संवर्धनाचा जागर केला जातो, असे शिक्षक राजेंद्र अंबिके यांनी सांगितले.
प्रबोधनात्मक कार्यक्रम
महाअंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष मोहन भोईर यांनी जिल्ह्यात काही ठिकाणी सार्वजनिक व घरगुती गणेशोत्सवात चमत्कार प्रयोग सादरीकरण, सर्पविज्ञान आदी विधायक व प्रबोधनात्मक कार्यक्रम त्या त्या शाखांमार्फत राबविले जातात. याला चांगला प्रतिसाद मिळतो. यावर्षीदेखील असे कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. आयुष्यमान व्यसनमुक्ती केंद्राचे अध्यक्ष पर्यावरणपूरक मखरांचे वाटप करणार आहेत. तर अनेक ठिकाणी विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी गणेशोत्सव सजावट स्पर्धांचे आयोजनसुद्धा केले आहे
दुकानदार तयारीत
गणरायाच्या स्वागतासाठी सर्वजण तयारीला लागले आहेत. त्याप्रमाणेच व्यापारी व व्यावसायिकदेखील तयारीत आहेत. गणरायासाठी लागणारी कृत्रिम फुले, हार, सजावटीचे साहित्य, अगरबत्ती, धूप अशा वस्तूंची विक्री जोरात सुरू झाली आहे, असे पालीतील सौम्य कलेक्शनचे मालक मुकुंद कोसुंबकर यांनी सांगितले. शिवाय मखर विक्रेतेदेखील सज्ज झाले आहेत. मिठाईवाल्यांनीदेखील कामाला सुरुवात केली आहे. छोटे-मोठे ढोलकी विक्रेतेदेखील आले आहेत.
रोपवाटिका चालक सज्ज
पर्यावरणस्नेही व पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी अनेक जण पुढे येत आहेत. त्यामुळेच नैसर्गिक व विघटनशील अशा साधनांचा वापर केला जातो. त्यामध्ये शोभिवंत झाडे, फुलझाडे आणि आकर्षक कुंड्यांना विशेष मागणी आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी रोपवाटिका तसेच फुलविक्रेते दुकाने सजली आहेत. गणेशोत्सवासाठी विशेष सूट व आकर्षक योजनादेखील दिल्या आहेत. त्यामुळे पर्यावरणपूरक कापडी, कागदी व पुठ्ठ्याच्या मखरांबरोबरच आता शोभिवंत फुल व झाडेदेखील पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी योगदान देत आहेत. फुले व पानांची रेडिमेड आरासदेखील बाजारात उपलब्ध आहेत.
ढोल-ताशा पथकांची जोरदार तयारी
गणेशोत्सवात ढोल-ताशा-ध्वज पथकाला अधिक पसंती आहे. जिल्ह्यात लहानग्यांसह तरुणाईमध्ये ढोल-ताशा या पारंपरिक वादनाची मोठी क्रेझ पाहायला मिळत आहे. गणेशोत्सवात आपल्या ताल व लयबद्ध वादनाने हे ढोलताशा पथक सगळ्यांच्याच हृदयाचा ठोका चुकवतात. गणेशोत्सवासाठी नवीन लय, ठेका व तालावर बहुतांश ढोल-ताशा पथकातील सदस्य सध्या सरावातून अतोनात मेहनत घेत आहेत. कित्येकांना ढोल हातात मिळाला नाही तर ते बैचेन होतात, असे वीर गर्जना पारंपरिक ढोल-ताशा पथकाचे सदस्य उमेश तांबट यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.