गेटवे-मांडवा फेरीबोटीची प्रतीक्षा

गेटवे-मांडवा फेरीबोटीची प्रतीक्षा

Published on

गेटवे-मांडवा फेरीबोटीची प्रतीक्षा
खराब हवामानाचा अडथळा; जलप्रवाशांची गैरसोय
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. ३० : सध्या सर्वत्र मुसळधार पाऊस पडत असून समुद्राला उधाण आले आहे. लाटांचीही उंची कमी झालेली नसून वाऱ्याचा वेगही सर्वाधिक आहे. यामुळे गेटवे मांडवा फेरीबोट सेवा १ सप्टेंबरपासून सुरू होण्यास अनिश्चितता निर्माण झाली आहे. हवामान विभागाने पुढील तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला आहे, त्यामुळे ओहोटीची स्थिती पाहूनच फेरीबोट सुरू करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.
तीन महिन्यांच्या मॉन्सूनबंदीनंतर गेटवे- मांडवा जलवाहतूक १ सप्टेंबरला सुरू होणार आहे. या मार्गावर फेरीबोट सेवा देणाऱ्या कंपन्यांनीही आपली सज्जता पूर्ण केली असून हवामान शांत होण्याची ते वाट पाहत आहेत. तितकीच प्रतीक्षा गौरी-गणपतीसाठी अलिबाग-मुरूडकडे येणारे कोकणवासी करीत आहेत. त्यांचा हा सर्वात आवडीचा मार्ग असला तरी बिघडलेल्या हवामानामुळे त्यांचा प्रवास सुरू होण्यास विलंब होण्याची शक्यता आहे. दरवर्षी सप्टेंबरच्या १ तारखेला ही फेरीबोट सुरू होते. त्यामुळे गौरी-गणपतीचा प्रवास सुखरूप करता येतो. यंदा गणपती उत्सव लवकर आल्याने जलप्रवास करीत गौरी-गणपतीसाठी गावाकडे येणाऱ्यांची संधी हुकली आहे. सध्या सुरू असलेल्या पावसाचे प्रमाण कमी होऊन फेरीबोट निर्धारित वेळापत्रकानुसार सुरू होईल, असा अंदाज जलवाहतूक संस्थांचा आहे. शनिवारी रात्रीची आणि रविवार दुपारच्या भरतीची स्थिती लक्षात घेऊन फेरीबोट सुरू करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा हा सर्वात लोकप्रिय जलवाहतूक मार्ग आहे. या मार्गावर दररोज हजारो पर्यटक आणि स्थानिक नागरिक प्रवास करीत असतात. या सेवेवर अलिबाग, मुरूड तालुक्यातील पर्यटन व्यवसाय अवलंबून असल्याने फेरीबोट केव्हा सुरू होणार याची सर्वांनाच प्रतीक्षा आहे.
-----
अपघात टाळण्यासाठी खबरदारी
मॉन्सून सुरू होण्यापूर्वी गेटवे ऑफ इंडिया ते मांडवापर्यंतची फेरीबोट सेवा बंद होते. मेरिटाइम बोर्डाने १ सप्टेंबरपासून या मार्गावरील फेरीबोट सुरू करण्यास अनुमती दिली आहे. त्यानुसार अजंठा, मालदार, पीएनपी या वाहतूक संस्थांनी आपल्या फेरीबोटी सज्ज ठेवल्या आहेत. मागील वर्षी घारापुरी बेटाकडे जाणाऱ्या एका प्रवासी बोटीला झालेल्या दुर्घटनेनंतर मेरिटाइम बोर्डाने प्रवासांच्या सुरक्षेसाठी काही कडक अटी घालून दिल्या आहेत. त्या अटींची पूर्तता आणि बोटींची दुरुस्ती करूनच यंदा फेरीबोट चालवण्यास अनुमती देण्यात येते. सध्या खराब हवामानामुळे ही खबरदारी घेतली जात आहे.
-----
१ सप्टेंबरपासून गेटवे ते मांडवा फेरीबोट सुरू करण्यास मेरिटाइम बोर्डाने अनुमती दिलेली आहे. यादरम्यान हवामान शांत होणे गरजेचे आहे. सध्याची स्थिती पाहता फेरीबोट सेवा सुरू करणे प्रवाशांसाठी धोक्याचे होऊ शकते. भरतीची स्थिती पाहिल्यानंतर समुद्र किती खवळलेला आहे, हे समजू शकते. त्याचबरोबर समुद्रात वाऱ्यांचा वेग आणि पडणाऱ्या मुसळधार पावसाचा अंदाज घेऊनच फेरीबोट सुरू केली जाईल.
- आशीष मानकर, बंदर निरीक्षक, मांडवा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com