वैद्यकीय शिक्षणाचा श्रीगणेशा

वैद्यकीय शिक्षणाचा श्रीगणेशा

Published on

वैद्यकीय शिक्षणाचा श्रीगणेशा
महाविद्यालयाच्या कामाला वेग, राजकीय मतभेदावर मात
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. ४ : राजकीय मतभेदामुळे वादात राहिलेल्या जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना २०२२ मध्ये याचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत झाले होते; परंतु त्यानंतर झालेल्या राजकीय बदलाचा महाविद्यालयाला मोठा फटका बसला. राजकीय वादामुळे अडीच वर्षांत एकही वीट रचली गेली नव्हती; मात्र आता काम मोठ्या जोमाने सुरू झाल्याने भविष्यातील आरोग्य सेवकांची पदे निर्माण होतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
प्रत्येक जिल्ह्यात एक शासकीय महाविद्यालय असावे, असा जीआर असताना त्यास रायगड जिल्हा अपवाद होता. येथे डॉक्टरांची नेहमीच कमतरता भासत असल्याने तत्कालीन पालकमंत्री आदिती तटकरे यांनी अलिबाग येथील महाविद्यालयाचा प्रस्ताव मांडला. वैद्यकीय व उच्च शिक्षण मंत्रालयाने मंजुरी दिल्यानंतर अर्थ खात्याने निधी मंजूर केला होता; परंतु त्यानंतर उद्धव ठाकरे यांचे सरकार कोसळले. नंतर आलेल्या एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाने आधीच्या सरकारने घेतलेले अनेक निर्णय रद्द केले. यात महाविद्यालयासंदर्भात घेतलेल्या निर्णयाचा समावेश होता; मात्र याचदरम्यान महाविद्यालयाच्या पहिल्या वर्षातील तुकडीसाठी प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाली होती. त्यामुळे कोणत्याही परिस्थिती महाविद्यालयासाठी जागा उपलब्ध करून देणे शासनाला क्रमप्राप्त झाले. अखेर कुरूळ येथील आरसीएफ कॉलनीमध्ये पहिली बॅच सुरू झाली. पहिल्या बॅचने वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले तरीही इमारतीच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झालेली नव्हती. अखेर या कामाला सुरुवात झाली असून निर्धारित वेळेत पूर्ण होईल, अशी आशा शासकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. पूर्वा पाटील यांनी व्यक्त केली आहे.
-----
४५० कोटींचा निधी मंजूर
महाविद्यालयासाठी ४५० कोटींचा निधी मंजूर झाला असून, पहिल्या टप्प्यातील निधीही उपलब्ध आहे. तरीही सत्ता बदलल्यानंतर काही राजकीय कारणांमुळे आणि जागेसंदर्भातील विरोधामुळे कामाला अपेक्षित वेग आला नव्हता. सध्या आरसीएफ कॉलनीतील तात्पुरत्या इमारतींमधून महाविद्यालय कार्यरत आहे. जिल्हा रुग्णालय त्याला संलग्न असून इमारतींचे करार लवकरच संपुष्टात येणार असल्याने कायमस्वरूपी इमारत गरजेची आहे.
----
५२ एकर जागेत महाविद्यालय
अलिबाग तालुक्यातील उसर येथे ५२ एकर जागेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभे राहणार आहे. महाविद्यालयाबरोबरच रुग्णालय, ग्रंथालय, वसतिगृह, दोन टप्प्यांत होणाऱ्या वास्तूच्या कामाचा शुभारंभ दोन वर्षांपूर्वी करण्यात होता. १०० विद्यार्थी प्रवेश क्षमता असलेले महाविद्यालय सुरू करण्यासाठी एकूण चार टप्प्यात गट अ ते गट क मधील नियमित १८५ पदे विद्यार्थी पदे १२१, त्याचप्रमाणे गट क पदे १३९ (बाह्यस्रोताने) व गट ड पदे ६५ (बाह्यस्रोताने) अशी एकूण ५१० पदे निर्माण करण्यास शासन निर्णय २९ जानेवारी २०२१ अन्वये झालेला आहे.
----
रखडपट्टीची कारणे
सुरुवातीला ईपीआयएल कंपनीला काम सोपवण्यात आले होते; मात्र तांत्रिक अडचणीमुळे हा ठेका रद्द करण्यात आला. त्यानंतर रॅक इन्फ्रास्ट्रक्चरकडे ठेका देण्यात आला आहे. केंद्र सरकारकडून मंजूर झालेल्या निविदा प्रक्रियेतून एजन्सीला काम देण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी राज्य शासनाकडून ४०६ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी ईडीबी बँकेकडून अर्थसहाय्य घेण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com