नगराध्यक्षपदी भाजपचे पराग मेहता यांनी मारली बाजी

नगराध्यक्षपदी भाजपचे पराग मेहता यांनी मारली बाजी

Published on

भाजपचा शिंदेगटाला धोबीपछाड
पालीच्या नगराध्यक्षपदी पराग मेहता यांची निवड
पाली, ता. १० (वार्ताहर)ः नगर पंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी भाजप तसेच शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार एकमेकांसमोर उभे राहिले होते. त्यामुळे ही निवडणूक दोन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेची झाली होती. अखेर भाजपचे पराग मेहता यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट), मित्रपक्षांच्या मदतीने शिवसेनेच्या (शिंदे गट) कल्याणी दबके यांचा पराभव करीत नगराध्यक्षपद मिळवले.
पाली नगर पंचायतीत नगराध्यक्षपदासाठी बुधवारी (ता. १०) निवडणूक झाली. या वेळी पीठासीन अधिकारी म्हणून रोहा उपविभागीय अधिका ज्ञानेश्वर खुटवड यांनी काम पाहिले. पाली नगर पंचायत मुख्याधिकारी माधुरी मडके उपस्थित होते. नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत शिवसेनेच्या (शिंदे गट) कल्याणी दबके तर भाजपकडून पराग मेहता निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यामुळे महायुतीमधील मित्रपक्षांमध्ये नगराध्यक्षपदासाठी रस्सीखेच होती. भाजपचे राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांबरोबर खासदार सुनील तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे या सर्व प्रक्रियेमध्ये सहभागी होते.
ः-----------------------------------------------------
घडामोडींमुळे रंगत
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) नगरसेविका नलिनी म्हात्रे यांनी नगराध्यक्षपदासाठी अर्ज मागे घेताना भाजपचे पराग मेहता यांना पाठिंबा दिला. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) सुधागड तालुकाध्यक्ष संदेश शेवाळे यांनी भाजपचे उमेदवार पराग मेहता यांना पाठिंबा दिला; मात्र मतदानापूर्वी काही नगरसेवक संपर्कात नसल्यामुळे मतदानाच्या दिवशी काहीतरी चमत्कार होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती.
----------------------------------------
साडेतीन वर्षांत चौथी निवडणूक
पाली नगर पंचायतीमध्ये राजकीय उलथापालथ होत असून, अवघ्या साडेतीन वर्षांत चौथ्यांदा नगराध्यक्षपदाची निवड झाली आहे. नगराध्यक्षपदावर सतत होणारे बदल, नगरसेवक व नगराध्यक्ष यांचे सदस्यत्व रद्द होणे, तसेच पहिल्या नगराध्यक्षांचा राजीनामा, नगरसेवकपदासाठी पोटनिवडणूक आदी घडामोडी पाली गावाच्या विकासासाठी घातक ठरत आहेत.
------------------------------------
पक्षीय बलाबल
पाली नगर पंचायतीत एकूण १७ सदस्य असून दोन सदस्यांचे सदस्यत्व काही दिवसांपूर्वी रद्द झाले. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पाच नगरसेवक, शिवसेना (शिंदे गट) पाच नगरसेवक, भाजप चार नगरसेवक, शेकाप एक नगरसेवक असे बलाबल होते; पण पराग मेहता यांना नऊ मते मिळाली, तर शिवसेनेच्या (शिंदे गट) कल्याणी दबके यांना पाच मते मिळाली. एक नगरसेवक तटस्थ राहिला.

Marathi News Esakal
www.esakal.com