अष्टविनायक तीर्थक्षेत्र पाली शहरात पाण्याची गळती थांबेना नळ वाहिन्या तुटून व जीर्ण होऊन रोज हजारो लिटर पाण्याचा अपव्यय
पाली शहरात पाणीगळती थांबेना
नळ वाहिन्या तुटून व जीर्ण होऊन रोज हजारो लिटर पाण्याचा अपव्यय
पाली, ता. ११ (वार्ताहर) ः शहरात मुख्य मार्गावरील आणि इतर अनेक ठिकाणी जल वाहिन्यांना मागील अनेक दिवसांपासून गळती लागली आहे. या गळतीमुळे रोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. यामुळे रस्त्यावर चिखल व घाणीचे साम्राज्य पसरले आहे. परिणामी, नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. याकडे मात्र नगरपंचायतचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.
शहरात गांधी चौक, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक व श्री बल्लाळेश्वर गणपती मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर जल वाहिन्यांना गळती लागली आहे. या फुटलेल्या पाण्याच्या वाहिनीतून दुषित पाणी जाऊन नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती वर्तविली जात आहे. शिवाय शेठ ज. नौ. पालीवाला वाणिज्य महाविद्यालय आणि अमूल आईस्क्रीम दुकानासमोरील भागात नळजोडणीच्या ठिकाणी सतत पाणी गळत असल्याचे दिसून येते. यामुळे नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या गळतीकडे पाली नगरपंचायतीकडून दुर्लक्ष होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. तसेच, नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी तात्काळ जलवाहिनी दुरुस्त करून पाण्याचा अपव्यय थांबवावा, अशी मागणी केली आहे.
अघोषित पाणी टंचाई व आरोग्य धोक्यात
शहरात पाणी टंचाईचे संकट गडद होत असताना, दुसरीकडे हजारो लिटर पाणी वाहून जात आहे. ही परिस्थिती अघोषित पाणी टंचाईकडे नेणारी आहे. तसेच, फुटलेल्या जलवाहिनीतून दूषित पाणी जाऊन त्याचा स्थानिकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होण्याची शक्यता देखील वर्तविली जात आहे.
जीर्ण व खराब पाइप
येथील अनेक पाइप हे फार जुने असल्यामुळे ते आतून गंजून खराब झाले आहेत. त्यांची दुरुस्ती करणे अवघड जाते. तसेच नवीन पीव्हीसी पाइप वाहने जाऊन, सतत होणारे खोदकाम आणि पाण्याचा दबाव वाढून वारंवार तुटतात. येथील साडे पंचवीस कोटीची प्रलंबित शुद्ध पाणी पुरवठा योजना लवकर कार्यान्वित झाल्यास या समस्या मार्गी लागतील.
पाण्याच्या गळतीच्या समस्येवर तात्काळ उपाययोजना करण्यासाठी पाणीपुरवठा सभापती प्रतीक्षा पालांडे यांच्या नेतृत्वाखाली सर्व नगरसेवकांची संयुक्त बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत गळतीग्रस्त भागांची यादी तयार करून दुरुस्तीचे काम त्वरित सुरू करण्यात येणार आहे.
- सुलतान बेनसेकर, उपनगराध्यक्ष, पाली नगरपंचायत
पाली शहरात पाण्याची गळती सुरू आहे, त्या सर्व ठिकाणी नगरपंचायतीने तात्काळ दखल घेऊन दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करावे.
- पी. सी. पालकर, ग्रामस्थ, पाली
फोटो ओळ,
पाली ः रस्त्यावर आलेले पाणी व त्यामुळे झालेला चिखल व खड्डा. (छायाचित्र, अमित गवळे)