मुरुडमध्ये सीलिंग कायद्याचे उल्लंघन

मुरुडमध्ये सीलिंग कायद्याचे उल्लंघन
Published on

मुरूडमध्ये सीलिंग कायद्याचे उल्लंघन
नवाबांच्या हजारो एकर जमिनीची बेकायदा विक्री; देशविघातक कृत्ये करणाऱ्यांनाही विकल्याचा आरोप
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १५ : सर्वोच्च न्यायालयाच्या वकील सोनिया राज सूद यांनी मुरूड (जि. रायगड) येथे सीलिंग ऑन होल्डिंग्ज कायदा, १९६१चे गंभीर उल्लंघन होत असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. मुरूडचे दिवंगत नवाब सर सिद्दी मोहम्मद खान यांच्या वारसांनी शेकडो एकर जमीन परस्पर विकली असून, यातील काही जमीन शस्त्रतस्कर आणि देशविघातक कृत्यात सहभागी असणाऱ्यांना विकल्याचा दावा त्यांनी केला आहे.
ॲड. सूद यांच्या म्हणण्यानुसार, कृषी जमीन धारण करण्याची कमाल मर्यादा ५४ एकर असतानाही रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी नवाबांच्या वारसांना सुमारे ४,५०० एकर जमीन ठेवण्याची परवानगी दिली आहे. तसेच १९७२मध्ये निधन पावलेल्या नवाबांच्या नोंदीवर अनिवार्य मृत्युपत्र नसतानाही हजारो एकर जमिनीची नोंद त्यांच्या पाच मुलांच्या नावे बेकायदा करण्यात आली असल्याचा आरोप त्यांनी केला.
१९७१मध्ये संविधानाच्या कलम ३७३ (अ) नुसार नवाबांचे सर्व हक्क आणि विशेषाधिकार रद्द झाले आहेत. संस्थानांच्या विलीनीकरणानंतर सर्व मालमत्ता राज्य सरकारच्या झाल्या आहेत; मात्र रायगडमध्ये हा कायदा लागू करण्यात जिल्हाधिकारी अपयशी ठरले, असा आरोपही ॲड. सूद यांनी केला आहे.
ॲड. सूद यांनी अलिबाग येथे पत्रकार परिषद घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ हा कायदा लागू करून माजी नवाबांच्या जमिनींची विक्री थांबवावी आणि अतिरिक्त शेती जमिनीची गरज असलेल्या भूमिहीनांना वाटून द्याव्यात, अशी मागणी केली आहे. अलिबाग येथील ॲड. मंगेश घोणे यांच्या ‘न्याय सबका अधिकार’ या सामाजिक संस्थेच्या प्रयत्नांना सहकार्य करण्यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.
----
दहशतवादी संबंधांचे आरोप
१९९३ ते १९९९ दरम्यान दहशतवादी इक्बाल मिर्चीची पत्नी हजरा इक्बाल मेमन यांना काशिद बीचवरील १०० एकर जमीन विकण्यात आली होती. तसेच पॅलेसजवळील शेतजमीन २०१८मध्ये एका शस्त्रतस्कर आणि इक्बाल मिर्चीच्या जवळच्या नातेवाइकाला विकल्याचे गंभीर आरोप ॲड. सूद यांनी केले. नवाबाचे नातेवाईक अर्शद आदमजी जसदनवाला हे घाईघाईने एक हजार एकर वनजमीन विकत आहेत. विशेष म्हणजे २०१५मध्ये संसदेत जाहीर झालेल्या परदेशात बँक खाती लपवणाऱ्या १०० भारतीयांच्या यादीत त्यांचे नाव ४७व्या क्रमांकावर होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com