शेतकऱ्यांची यंदाची दिवाळी शेतात
शेतकऱ्यांची यंदाची दिवाळी शेतात
परतीच्या पावसाची भीतीमुळे भातकापणी, झोडणीला वेग
पाली, ता. २० (वार्ताहर) : रायगड जिल्ह्यामध्ये भातपिक आता डोलू लागले आहे. त्यामुळे आता जिल्ह्यात भातकापणीच्या कामांना वेग आला आहे. दिवाळी असली तरी परतीच्या पावसाची भीती व मजुरांची कमतरता यामुळे धान्य आपल्या कणगीत पडावे, यासाठी भातकापणी व झोडणीच्या कामांची शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. परिणामी शेतकऱ्यांना दिवाळीच्या आनंदाला मुकावे लागताना दिसून येत आहे.
मजुरांची कमतरता भासत असल्याने ऐन दिवाळीत शेतकरी कुटुंबातील सर्व सदस्य कापणी, बांधणी, झोडणीच्या कामास लागली आहेत. परतीचा पाऊस व अतिवृष्टीचा फटका भातशेतीला बसू नये, म्हणून शेतकरी मिळेल ते मनुष्यबळ वापरून दिवाळीतच कापणी आटोपून घेत आहेत. ग्रामीण भागात आजही खळ्यांवर मोकळ्या आकाशात झोडणीची कामे होत आहेत. लवकरात लवकर खळ्यांमध्ये पडलेले भात पोत्यात भरून घरात आणून टाकण्याचे काम सुरू आहे. अनेक ठिकाणी कापणी, काढणीच्या कामाला वेळेत मजूर मिळत नसल्याने सधन शेतकरी यंत्राच्या सहाय्याने कामे जलदगतीने आटपून घेत आहेत. काही शेतकरी पारंपरिक पद्धतीला बाजूला सारत यंत्रसामुग्रीचा वापर करीत आहेत. यामध्ये श्रम, वेळ व पैशाची बचत होत आहे.
...................
मजुरी परवडेना
दिवसेंदिवस मजुरीचे दर वाढत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. गोरगरीब शेतकऱ्यांना हे दर परवडणारे नसल्याने ते आपले कुटुंब आणि नातेवाईक कुटुंबांच्या मदतीने आळीपाळीने कापणी व झोडणीची कामे करीत आहेत. या कामात महिला मोठ्या प्रमाणावर सहभागी होताना दिसून येत आहेत. ग्रामीण भागातील शेतकरी भातझोडणीच्या कामात व्यग्र झाला असून, ऐन दिवाळीत मळणी काढण्यासाठी भल्या पहाटे शेतात दाखल होत आहेत. भातकापणी, भात वाळवणे, पेंढ्याची उडवी रचणे या कामाला चांगलाच वेग आला आहे.
.................
दिवाळीत चार पैसे हाती
दिवाळीमध्ये भात विकून चार पैसे खर्चायला मिळतील, अशी आशा येथील शेतकऱ्यांना आहे. त्यामुळेच ऐन दिवाळीत शेतकरी आपल्या शेतामध्ये कापणी, झोडणी आणि इतर कामासाठी उतरलेला दिसत आहे. दरम्यान, या खटाटोपामध्ये त्याच्या दिवाळीच्या आनंदावर मात्र विरजण पडताना दिसत आहे, असे सुधागड तालुक्यातील शेतकरी शरद गोळे यांनी सांगितले.
.............................