पावसाने अर्थकारणाला तडे
पावसाने अर्थकारणाला तडे
रायगड जिल्ह्यातील शेती, मासेमारी, पर्यटनाला फटका
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता.२८ : बंगालच्या उपसागरातील मोंथा चक्रीवादळाचा प्रभाव रायगड जिल्ह्यावर दिसत आहे. वादाळाने जिल्ह्यातील भातशेती, मासेमारी, जलवाहतूक पूर्णतः बंद झाली आहे. त्याचा परिणाम पर्यटनावर झाल्याने रायगड जिल्ह्याची अर्थव्यवस्थाच अडचणीत आली आहे.
पावसाने तयार झालेल्या भातपीकाची अक्षरशः माती झाली. मोठ्या कष्ठाने वाढवलेल्या पिकाकडे पाहताना शेतकऱ्यांना रडू येत आहे. साचलेल्या पाण्यातून पीक जमा करुन शेतकरी घरात आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. खलाटीत सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने पिकाचे पंचनामे करायचे, कोणत्या नाही, असा प्रश्न पंचनाम्यासाठी अधिकाऱ्यांनाही पडू लागला आहे. जिल्ह्यातील भातशेतीचे मोठे नुकसान झाले असल्याने सरसकट पंचनामे करण्याची मागणी केली जात आहे. वातावरणातील बदलाने पर्यटन व्यावसायिकांची निराशा केली आहे. खराब हवामानामुळे जलवाहतूक बंद आहे. यामुळे जिल्ह्यातील पर्यटन व्यवसाय ठप्प आहे. सततच्या पावसाने शेतकरी, मच्छिमार, पर्यटन व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
-----
मासेमारी नौका बंदरात
चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मुसळधार पावसाबरोबर, जोराचे वारे सुटणार असल्याने मच्छिमारांना खोल समुद्रात मासेमारी करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ५ हजार ४१७ मासेमारी नौका विविध बंदरांमध्ये २३ ऑक्टोबरपासून नांगरलेल्या स्थितीत आहे. या नौकांवरील लाखो कामगारांचा रोजगार ३० ऑक्टोबरपर्यंत बुडणार आहे. यात मच्छिमारांचे करोडोंचे नुकसान होणार आहे.
-----
७० टक्के भातपीक वाया
कृषी विभागाने २०२५ च्या खरीप हंगामासाठी ८१ हजार ३३५ हेक्टर क्षेत्रावर भात लागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. जेमतेम ७० हजार क्षेत्रावरच भात पिकाची लागवड करण्यात आली आहे. कृषी विभागाच्या २३ ऑक्टोबरपर्यंत झालेल्या पंचनाम्यांनुसार ६९१ गावातील ५ हजार ६४२ शेतकरयांचे १ हजार ६९८ हेक्टर क्षेत्रावरील भातपीकाचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार नुकसान ७० टक्केच्या आसपास आहे.
----
पर्यटन व्यावसायिक अडचणीत
दिवाळी हा पर्यटनाचा मोठा हंगाम मानला जातो. मुंबई, पुण्याचे लाखो पर्यटक जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर येत असतात. दिवाळी संपताच पावसाने पर्यटकांची वाट अडवली. जिल्ह्यातील जलवाहतूक बंद झाल्याने जंजिरा, पद्मदुर्ग किल्ला पाहण्यासाठी पर्यटकांना जाता आले नाही. राजपुरी- दिघी, मांडवा-गेटवे दरम्यानची जलवाहतूक बंद करण्यात आली. यामुळे नोंदणीकृत हॉटेल्स, ट्रॅव्हल एजंट्स, गाईड्स यांची साखळी विस्कळित झाली आहे.
----
जिल्ह्यातील शेतकरी, मच्छीमार, पर्यटन व्यावसायिकांवर पावसाचा परिणाम झाला आहे. पंचनामा करण्यासाठी पीक शिल्लक राहिलेले नसल्याने शासनाने सरसकट ओळा दुष्काळ जाहीर करावा. जिल्हाधिकाऱ्यांनी सरकारला अहवाल पाठवावा, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहोत.
- जयंत पाटील, सरचिटणीस, शेकाप
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

