बळीराजाला आर्थिक चणचण
बळीराजाला आर्थिक चणचण
सततच्या पावसाने रब्बीचा हंगाम संकटात
पाली, ता. ४ (वार्ताहर) ः रायगड जिल्ह्यात भातशेतीचे पावसाने नुकसान झाले आहे. अशातच आदिवासीबहुल भागातील नाचणी, वरी अशा नगदी पिकांनाही पावसाचा फटका बसला आहे. परिणामी, रब्बी हंगामासाठी लागणारे भांडवल नसल्याने बळीराजाला आर्थिक चणचण जाणवू लागली आहे.
भातशेतीची कामे आटोपल्यावर शेतकरी शेतात कडधान्य लावतो. साधारणपणे ऑक्टोबर-नोव्हेंबरदरम्यान रब्बी हंगामाला सुरुवात होते. जिल्ह्यात रब्बी हंगामात जवळपास बारा ते साडेपंधरा हजार हेक्टरवर कडधान्याचे पीक घेतले जाते. मार्च-एप्रिलपर्यंत हा हंगाम चालतो; मात्र लांबलेल्या पावसामुळे कडधान्यांसाठीचे पूरक हवामान नसल्याने हंगाम संकटात आला आहे. काढणीअभावी भातपीक शेतात पडून आहे. तर डोंगर उतारावरील जमीन ओली असल्याने वरी, नाचणी लागवडीसाठी शेतकऱ्याला मशागत करणे अशक्य आहे. त्यामुळे कडधान्य लागवडीला उशीर होणार असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.
़़ः--------------------------------------------
घरखर्चाची चिंता 
- सुधागड, श्रीवर्धन, खालापूर, तळा, म्हसळा, महाड, पोलादपूर, पेण, कर्जत अशा आदिवासीबहुल तालुक्यात वरी, नाचणीचे पीक आदिवासी मोठ्या प्रमाणात घेतात. हक्काची शेतजमीन नसल्याने भातलागवड करणे शक्य होत नाही. त्यामुळे माळरान किंवा वरकस जमिनीवर शेती होते.
- हाती आलेले पीक विकून दोन पैसे त्यांना मिळतात. या पैशांतून काही दिवसांचा घरखर्च चालतो; मात्र यंदा परतीच्या पावसाने मुक्काम वाढवल्याने जिल्ह्यातील आदिवासी बांधव पुरता हतबल झाला आहे.
----------------------------
कडधान्य पिकाला फटका
जिल्ह्यात भातासह शेतीपूरक वाल, मूग, मटकी, तूर, चवळी अशी कडधान्यांची पिके घेतली जातात. तीन ते चार हजार हेक्टरवर वालाची लागवड केली जाते. त्यानंतर मूग, मटकी, चवळी, तूर अशी कडधान्यांची लागवड होते; मात्र परतीच्या पावसामुळे शेतजमीन पाण्याखाली आहे. शेतात पाणी साचले असल्यामुळे कडधान्य पिकासाठी मशागत, लागवड करणे आता शक्य नाही. त्यामुळे यंदा कडधान्याची आवक कमी होण्यााचा अंदाज आहे.
---------------------------
कडधान्यांना पावसाचा फटका बसला आहे. परतीच्या पावसामुळे कडधान्य पिकाचा हंगाम जवळपास गेला आहे. त्यामुळे मोठ्या नुकसानीला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागणार आहे. 
- शरद गोळे, अध्यक्ष, कृषीमित्र संघटना, सुधागड-पाली
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

