विद्यार्थी बोलणार आता फाडफाड इंग्रजी

विद्यार्थी बोलणार आता फाडफाड इंग्रजी

Published on

विद्यार्थी बोलणार आता फाडफाड इंग्रजी
बँक ऑफ वर्ड उपक्रमाची यशस्वी अंमलबजावणी
पाली, ता. २५ (वार्ताहर) : रायगड जिल्हा परिषद शाळा, नवघर येथे इंग्रजी शिक्षणाचा एक अभिनव व प्रभावी प्रयोग यशस्वीपणे राबवला जात असून, या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी भाषेबाबतची भीती दूर होत आहे. उपशिक्षिका शीतल बळवंत पाटील यांनी गेल्या सहा ते सात महिन्यांपासून ‘बँक ऑफ वर्ड’ या नावीन्यपूर्ण संकल्पनेची अंमलबजावणी सुरू केली असून, त्यातून विद्यार्थ्यांची इंग्रजी शब्दसंपत्ती वाढीस लागली आहे.
आजच्या जागतिक स्पर्धेच्या युगात इंग्रजी भाषेचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत असताना मराठी माध्यमाच्या शाळांसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे. अनेक पालकांमध्ये इंग्रजी माध्यमालाच प्राधान्य देण्याची मानसिकता तयार झाली असून, मराठी शाळांबाबत दुय्यम दर्जाची भावना निर्माण झाली आहे. मात्र नवघर शाळेतील हा उपक्रम त्या गैरसमजाला छेद देत असून, मराठी माध्यमातूनही दर्जेदार इंग्रजी शिक्षण शक्य असल्याचे प्रत्यक्ष उदाहरण ठरत आहे. ‘बँक ऑफ वर्ड’ या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी स्वतःचा एक कार्यसंघ तयार केला आहे. बँकेच्या कार्यपद्धतीप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्यासाठी स्वतंत्र ‘शब्द खाते’ उघडण्यात आले आहे. दररोज नव्या इंग्रजी शब्दांचे पाठांतर, योग्य स्पेलिंग, अर्थ व वाक्यरचना याची नोंद या खात्यावर केली जाते. या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक स्पर्धा निर्माण झाली असून, नवे शब्द शिकण्याची गोडी लागली आहे. या अभिनव उपक्रमाच्या यशामागे मुख्याध्यापिका संगीता बैकर, पदवीधर शिक्षिका वृषाली गुरव व अनुजा माने, तसेच सहाय्यक शिक्षिका रुपाली लेंडवे व अंकिता जाधव यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. केंद्रप्रमुख अनिल राणे, गावकरी आणि पालकवर्ग यांनीही या उपक्रमाचे मनापासून कौतुक करत शाळेला सतत पाठिंबा देण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
.....................
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी भाषेबद्दल आत्मविश्वास निर्माण होत असून, मराठी माध्यमाच्या शाळांमध्येही आधुनिक शिक्षणपद्धती यशस्वीपणे राबवता येतात, हे नवघर शाळेने दाखवून दिले आहे. येत्या काळात हा उपक्रम इतर शाळांसाठीही प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

फोटो ओळ :
पाली – ‘बँक ऑफ वर्ड’ उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या ‘शब्द खात्यां’ची नोंद घेताना विद्यार्थी कार्यसंघ. (छायाचित्र – अमित गवळे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com