

फार्महाऊसमध्ये शिरलेल्या नऊ फुटी अजगराला जीवनदान
पाली, ता. २९ (वार्ताहर) : सुधागड तालुक्यातील धोंडसे गावातील राकेश रंजन यांच्या ‘वंश फार्महाऊस’मध्ये शनिवारी (ता.२७) रात्री अचानक नऊ फुटी अजगर शिरल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. यावेळी सर्पमित्राच्या मदतीने अजगराला जीवनदान देऊन जंगलात सोडून देण्यात आले आहे.
अजगर आढळल्याची माहिती तत्काळ पाली येथील अनुभवी सर्पमित्र दत्तात्रय सावंत यांना दिली. माहिती मिळताच सावंत यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी अत्यंत संयमाने, काळजीपूर्वक आणि कोणतीही दुखापत न करता नऊ फुटी अजगराला सुरक्षितरीत्या पकडले. या संपूर्ण मोहिमेदरम्यान उपस्थितांनी सुटकेचा निश्वास सोडला. सर्पमित्र दत्तात्रय सावंत यांनी सुधागड तालुका वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली या अजगराला नैसर्गिक आणि सुरक्षित अधिवासात सुखरूप सोडून दिले. त्यामुळे अजगरास जीवनदान मिळाले, तसेच नागरिकांचाही जीव धोक्यात न येता परिस्थिती नियंत्रणात आली. अजगर आढळल्यानंतर फार्महाऊस परिसरात काही काळ भीतीचे वातावरण होते. मात्र सर्पमित्रांच्या धाडसी व कुशल कामगिरीमुळे परिस्थिती शांत झाली. नागरिकांनी सर्पमित्रांचे आभार मानत त्यांच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी सर्पमित्र दत्तात्रय सावंत यांनी नागरिकांना आवाहन करत सांगितले की, घरात, घराजवळ किंवा मानवी वस्तीमध्ये साप किंवा अन्य वन्य प्राणी आढळल्यास घाबरून न जाता तत्काळ जवळच्या सर्पमित्र किंवा वनविभागाशी संपर्क साधावा. कोणत्याही परिस्थितीत सापाला मारू नये किंवा त्याला इजा पोहोचवू नये. साप हे पर्यावरणातील महत्त्वाचे घटक असून त्यांचे संरक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.