कुरुळमध्ये पुरातन भारतीय बैठ्या खेळांचा जागर

कुरुळमध्ये पुरातन भारतीय बैठ्या खेळांचा जागर

Published on

कुरुळमध्ये पुरातन भारतीय बैठ्या खेळांचा जागर
शिवकालीन गडकिल्ले व शस्त्रांचे भव्य प्रदर्शन; ‘आपला कट्टा’ संस्थेचा उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. ३० : भारतीय संस्कृती, इतिहास आणि परंपरेचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने कुरुळ येथील सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक विद्यालयात मंगळवार (ता. ३०) रोजी पुरातन भारतीय बैठ्या खेळांची संस्कृती, शिवकालीन गडकिल्ले आणि शस्त्रांचे भव्य प्रदर्शन मोठ्या उत्साहात पार पडले. ‘आपला कट्टा, नवी मुंबई’ या संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला विद्यार्थ्यांसह पालक, शिक्षक, इतिहासप्रेमी नागरिक आणि परिसरातील ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या प्रदर्शनामध्ये भारताच्या समृद्ध परंपरेतील विविध बैठ्या खेळांचे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि शास्त्रीय महत्त्व उलगडून सांगण्यात आले. हे खेळ केवळ मनोरंजनापुरते मर्यादित नसून त्यामागे युद्धकौशल्य, सांघिक समन्वय, शारीरिक क्षमता, मानसिक एकाग्रता आणि भारतीय ज्ञानपरंपरेचा ठोस आधार असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले. शिवकालीन काळात सैनिकांच्या प्रशिक्षणासाठी, डावपेच विकसित करण्यासाठी आणि नेतृत्वगुण वाढवण्यासाठी या खेळांचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असे, अशी माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.
आजच्या आधुनिक जीवनशैलीत हरवत चाललेले हे बैठ्या खेळ आजही अनेक गडकिल्ले, लेणी आणि ग्रामीण भागात टिकून असल्याचे उदाहरणांसह सांगण्यात आले. या खेळांमुळे शिस्त, सहकार्य, संयम, निर्णयक्षमता आणि संघभावना विकसित होते, याकडेही मार्गदर्शकांनी लक्ष वेधले. विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाची गोडी निर्माण करणे आणि आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगण्याची भावना रुजवणे, हा या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
................
प्रदर्शनात शिवकालीन दुर्मिळ शस्त्रे, तलवारी, भाले, ढाली, प्राचीन नाणी तसेच महाराष्ट्रातील विविध ऐतिहासिक गडकिल्ल्यांची छायाचित्रे आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. या वस्तूंमधून शिवाजी महाराजांच्या काळातील युद्धकौशल्य, संरक्षण व्यवस्था, गडरचना आणि तत्कालीन जीवनपद्धतीचा जिवंत अनुभव उपस्थितांना मिळाला. विद्यार्थ्यांनी या शस्त्रांविषयी, त्यांच्या वापराबाबत आणि ऐतिहासिक पार्श्वभूमीबाबत अनेक प्रश्न विचारून उत्सुकता व्यक्त केली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाविषयी जाणीव, कुतूहल आणि अभ्यासाची आवड वाढताना दिसून आली. पालक व शिक्षकांनीही अशा उपक्रमांचे स्वागत करत, शाळांमध्ये अशा ऐतिहासिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन अधिक प्रमाणात व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com