थर्टी फर्स्टला खवय्यांचा मासळीवर ताव

थर्टी फर्स्टला खवय्यांचा मासळीवर ताव

Published on

थर्टी फर्स्टला खवय्यांचा मासळीवर ताव
पर्यटकांची रेलचेल; ताजी समुद्री मासळीला मोठी मागणी, दरातही वाढ
पाली, ता. ३१ (वार्ताहर) : थर्टी फर्स्ट आणि नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असून खवय्यांनी यंदा मासळीवर विशेष ताव मारल्याचे चित्र पाहायला मिळाले. सध्या समुद्रातील मासेमारी जोरात सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात ताजी मासळी उपलब्ध होत आहे. याचा थेट फायदा मासळी व्यवसायाला झाला असून विक्रीत लक्षणीय वाढ झाली आहे.
रायगड जिल्ह्याला तब्बल २४० किलोमीटर लांबीचा विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभला आहे. त्यामुळे येथे खाऱ्या पाण्यातील विविध प्रकारची ताजी मासळी सहज उपलब्ध होते. नाताळच्या सुट्ट्यांमुळे जिल्ह्यातील समुद्रकिनारे, पर्यटनस्थळे, फार्महाउस आणि कॉटेजेस पर्यटकांनी गजबजून गेली आहेत. अनेक पर्यटक खास ताजी आणि चवदार मासळीचा आस्वाद घेण्यासाठी रायगडमध्ये दाखल होत असल्याचे दिसून आले. येथील मासळी मोठ्या प्रमाणावर मुंबई तसेच इतर शहरांमध्येही पाठवली जात आहे. कोळंबी, सुरमई, रावस, घोळ, टोळ, कर्ली, पापलेट यांसारख्या माशांना विशेष मागणी असून बागडा, बोंबील, मांदेली आणि बांगडा यांचीही ‘लॉटरी’ लागत असल्याचे मासळीविक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे. वाढलेल्या मागणीमुळे मासळीच्या दरातही चढ-उतार पाहायला मिळत असून थर्टी फर्स्टसाठी अनेक ग्राहकांनी आगाऊ बुकिंग केल्यामुळे विक्रेत्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
..................
आगाऊ बुकिंगमुळे व्यवसाय तेजीत
नाताळच्या सुट्ट्या आणि वर्षअखेरच्या सेलिब्रेशनमुळे मासळीला मोठी मागणी असून विक्री चांगली होत आहे. मासळी मुबलक आणि ताजी मिळत असल्याने खवय्ये खुश आहेत. थर्टी फर्स्टसाठी अनेकांनी आधीच आगाऊ बुकिंग केली आहे, अशी माहिती पेण व पाली येथील मासळीविक्रेत्या गौरी मनोरे यांनी दिली.
..........................
मासळीचे अंदाजे दर (प्रति किलो)

ठिकाणानुसार दरात फरक संभवतो

बोंबील : ४०० ते ६०० रुपये

पापलेट (मध्यम) : १,००० ते १,२०० रुपये

पापलेट (मोठे) : १,२०० ते १,६०० रुपये

सुरमई, घोळ, रावस : १,००० ते १,२०० रुपये

मांदेली : २०० ते ३०० रुपये

मध्यम कोळंबी : ४०० ते ६०० रुपये

बांगडा (मालवणी) : ४०० ते ५०० रुपये

हलवा : ७०० ते ८०० रुपये

टोळ : ५०० ते ६०० रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com