पोलिस पंचनाम्यात आता ‘इ-साक्ष’ ॲप

पोलिस पंचनाम्यात आता ‘इ-साक्ष’ ॲप

Published on

पोलिस पंचनाम्यात आता ‘इ-साक्ष’ ॲप
तपास अधिक पारदर्शक, विश्वासार्हसह वेळबद्ध होणार
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता.४ : आतापर्यंत रायगड जिल्ह्यातील पोलिस तपासामध्ये पंचनामे प्रामुख्याने कागदोपत्री स्वरूपात तयार केले जात होते. मात्र या प्रक्रियेत मानवी चुका, नोंदीतील विसंगती, कागदपत्रे हरवण्याचा धोका तसेच न्यायालयात पुराव्यांच्या विश्वासार्हतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत होते. अनेकदा पंचनाम्यातील पळवाटा शोधून आरोपी निर्दोष सुटत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. या पार्श्वभूमीवर रायगड पोलिस दलाने पंचनामे आणि तपास प्रक्रियेसाठी ‘इ-साक्ष’ या डिजिटल ॲपचा वापर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. न्यायव्यवस्थेच्या डिजिटलायझेशनच्या दिशेने हे एक मोठे पाऊल मानले जात असून, यामुळे तपास अधिक पारदर्शक, विश्वासार्ह आणि वेळबद्ध होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
‘इ-साक्ष’ ॲपच्या माध्यमातून घटनास्थळीच छायाचित्रे, व्हिडीओ, ऑडिओ, साक्षीदारांचे जबाब तसेच पंचनामे डिजिटल स्वरूपात नोंदवता येणार आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, या सर्व नोंदी वेळ, तारीख आणि ठिकाणासह सुरक्षित पद्धतीने संग्रहित केल्या जातील. त्यामुळे पुराव्यांमध्ये छेडछाड होण्याची शक्यता कमी होणार असून, तपास प्रक्रियेतील साखळी अधिक मजबूत होणार आहे. परिणामी न्यायालयात सादर होणारे पुरावे अधिक ठोस आणि विश्वासार्ह ठरण्याची शक्यता आहे. सत्र न्यायालयात दोषसिद्धीचे प्रमाण केवळ २० टक्के, तर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात सुमारे ६० टक्के इतके आहे. अनेक प्रकरणांमध्ये पंच साक्षीदार फितूर होतात, ज्याचा थेट परिणाम दोषसिद्धीवर होतो. उपलब्ध आकडेवारीनुसार, पंच फितुरीमुळे सुमारे २०. ८ टक्के प्रकरणातील आरोपी निर्दोष सुटतात. मात्र ‘इ-साक्ष’ ॲपमुळे घटनास्थळी जमा झालेले डिजिटल पुरावे थेट प्रणालीत नोंदवले जाणार असल्याने मानवी हस्तक्षेप कमी होईल आणि दोषसिद्धीचे प्रमाण वाढण्यास मदत होईल, असा विश्वास पोलिस प्रशासनाने व्यक्त केला आहे. हे ॲप केवळ पोलिसांसाठीच नव्हे, तर अभियोजन यंत्रणा आणि न्यायालयांसाठीही उपयुक्त ठरणार आहे. तपासातील विलंब कमी होणे, कागदपत्रांची देवाणघेवाण सुलभ होणे आणि खटल्यांचा जलद निपटारा होणे अपेक्षित आहे. एकूणच या डिजिटल बदलामुळे नागरिकांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ होईल, असा आशावाद व्यक्त केला जात आहे.

..........................
इ-साक्ष ॲपचा वापर कसा होणार?
गुन्हेगारी घटनास्थळी ऑडिओ-व्हिज्युअल स्वरूपात डिजिटल पुरावे संकलित केले जाणार
सर्व नोंदी सुरक्षित क्लाउड-आधारित प्रणालीवर अपलोड
नवीन गुन्हेगारी कायद्यांच्या तरतुदींनुसार तपास प्रक्रिया
तपासात पारदर्शकता व जबाबदारी वाढून पुराव्यांची सत्यता सुनिश्चित
.............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com