परदेशी रानमोडीचा उपद्रव

परदेशी रानमोडीचा उपद्रव
Published on

परदेशी रानमोडीचा उपद्रव
रायगड जिल्ह्यातील बहुतांश क्षेत्र व्यापले; जैवविविधता धोक्यात
पाली, ता. ८ (वार्ताहर) : रायगड जिल्ह्यातील कोणताही डोंगरमाथा, माळरानावर, रस्त्याकडेला अथवा शहर व गावातही बारीक पांढऱ्या फुलांनी बहरलेली दाट हिरवी झुडपे पाहायला मिळत आहेत. रानमोडी म्हणून परिचित असलेली ही वनस्पती तिच्या नावाप्रमाणे रानमोडत आहे. झपाट्याने वाढणारी ही परदेशी वनस्पती पूर्णतः निरोपयोगी असून, अन्य स्थानिक झाडे आणि गवताच्या वाढीसाठी अडथळा ठरत आहे. शिवाय जैवविविधतेला तिच्यामुळे धोका असल्याने वन विभाग, पर्यावरणप्रेमी व निसर्ग अभ्यासकांनी चिंता व्यक्त केली आहे. शिवाय रस्त्याकडेला वाढलेल्या या वनस्पतीमुळे वाहतुकीला अडथळादेखील होत आहे.
मागील १० ते १५ वर्षांच्या कालावधीत रानमोडीने रायगड जिल्ह्यातील बहुतांश क्षेत्र व्यापल्याचे चित्र दिसून येत आहे. जंगल, डोंगर उतारावर तसेच मोकळ्या माळरानावर या वनस्पतीची एकछत्री वाढ झाल्याने स्थानिक वनस्पती हळूहळू नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. पावसाळा संपल्यानंतर बहुतांश झुडपे आणि गवत वाळून जात असताना, रानमोडी मात्र वर्षभर हिरवीगार राहते. तिच्या पांढऱ्या रंगाच्या बारीक फुलांमुळे अनेकांना हा निसर्गाचा चमत्कार वाटतो; मात्र या सौंदर्यामागे दडलेला धोका फार गंभीर आहे. पर्यावरण अभ्यासक प्रवीण कवळे, सागर दहिंबेकर, शंतनू कुवेसकर, अमित निंबाळकर यांच्यासह अनेक निसर्ग अभ्यासकांनी रानमोडीच्या वाढीबाबत तीव्र चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या मते रानमोडीमुळे स्थानिक गवताच्या प्रजाती, पावसाळी वनस्पती तसेच लहान झाडांना आवश्यक पोषकद्रव्ये आणि सूर्यप्रकाश मिळण्यास मुश्किल होत आहे. परिणामी त्यांची वाढ खुंटते किंवा त्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.
............
पर्यावरणीय साखळीला धोका
रानमोडी ही मूळची अमेरिकन झुडूपवर्गीय सूर्यफुल कुळातील वनस्पती आहे. तिचे शास्त्रीय नाव क्रोमोलेनिया ओडेरेटा असे आहे. रानमोडी दीड ते दोन मीटर उंच वाढते. तिला ९६ हजार ते एक लाख ६० हजारांपेक्षा अधिक बिया येतात. त्या हवेद्वारे वातावरणात पसरतात आणि पावसाळ्यात रुजतात. मुळाद्वारेदेखील तिचा प्रसार होतो. रानमोडीमुळे स्थानिक गवताच्या प्रजाती आणि इतर पावसाळी आढळणाऱ्या वनस्पती यांच्या वाढीवर मर्यादा येत आहे. या वनस्पतीचा पशुपक्षी, प्राणी वगैरेंना तसा काहीच उपयोग नाही. त्यामुळे तिचे समूळ उच्चाटन करण्याची गरज निर्माण झाली आहे. रानमोडीचे उच्चाटन करणे म्हणजे ती फुलोऱ्याला येण्याअगोदरच मुळासकट काढणे गरजेचे आहे. मात्र तिची व्याप्ती बघता ते अत्यंत अवघड आहे.
.....................
खाज, अ‍ॅलर्जीचा त्रास
या वनस्पतीचे परागकण आणि बारीक पाकळ्या मोठ्या प्रमाणावर हवेत पसरत असल्याने अनेक नागरिकांना श्वसनाचे विकार, खाज व अ‍ॅलर्जीचा त्रास जाणवत आहे. उग्र वास असलेल्या या झुडपातून गेल्यास अंगाला खाज येणे, अंगावर चिकट वास राहणे असे त्रासही होतात. विशेष म्हणजे गुरेढोरे, पशुपक्षी, मधमाश्‍या, फुलपाखरे किंवा कीटक यांना या वनस्पतीचा कोणताही उपयोग नसल्याने पर्यावरणीय साखळीवरही विपरीत परिणाम होत आहे.
................
वाहतुकीला धोका
विशेष म्‍हणजे रस्त्याकडेला मोठ्या प्रमाणावर वाढलेली रानमोडी ही वाहतुकीसाठीही मोठा अडथळा ठरत आहे. दाट झुडपांमुळे रस्त्यावरील वळणांवर समोरून येणारी वाहने दिसत नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. वाहनचालकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत असून, सार्वजनिक सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
.....................
समूळ उच्चाटन आव्हानात्मक
वनक्षेत्रपाल समीर शिंदे यांच्या मते, रानमोडी ही अत्यंत निरुपयोगी वनस्पती असून, तिच्या बेसुमार वाढीमुळे जैवविविधता गंभीर संकटात सापडली आहे. तर निसर्ग अभ्यासक सागर दहिंबेकर यांनी सांगितले, की जंगलातील वनव्यांमध्ये सुमारे ४० टक्के वाटा या वनस्पतीचा असून, आग लागल्यास ती आग प्रचंड वेगाने पसरते आणि नियंत्रणात आणणे अत्यंत कठीण होते. रानमोडीचे समूळ उच्चाटन करणे हाच एकमेव उपाय असला तरी तिची प्रचंड व्याप्ती पाहता हे काम अत्यंत आव्हानात्मक ठरत आहे. तरीही जैवविविधतेचे रक्षण, पर्यावरण संतुलन आणि मानवी आरोग्यासाठी या परदेशी वनस्पतीवर तातडीने नियंत्रण आणण्याची गरज निसर्गप्रेमी आणि अभ्यासकांकडून व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com