रस्ता की मृत्यूचा सापळा की? वावळोली ते पाली रस्त्यावर खडी सांडली अपघाताचा धोका वाढला नागरिकांमध्ये संताप
रस्ता की मृत्यूचा सापळा?
वावळोली ते पाली रस्त्यावर खडी सांडली; अपघाताचा धोका, नागरिकांमध्ये संताप
पाली, ता. १० (वार्ताहर) ः वावळोली ते पाली या मुख्य मार्गावर मोठ्या प्रमाणात खडी पसरल्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. शुक्रवारी (ता. ९) या मार्गावरून डम्परमधून क्षमतेपेक्षा अधिक खडी वाहून नेली जात असल्याने ती रस्त्यावर पसरली आहेत. परिणामी संपूर्ण रस्ता खडीने भरून गेला असून, विशेषतः दुचाकीस्वारांसाठी ही परिस्थिती अत्यंत धोकादायक ठरत आहे.
ओव्हरलोड वाहतूक यामुळे खडी सांडण्याचे प्रमाण वाढले आहे. अशात सध्या हिवाळ्याचे दिवस असल्याने दृश्यमानता कमी असते. अशा स्थितीत रस्त्यावर ही खडी वाहनचालकांना दिसत नाही. परिणामी, वेगाने येणारी वाहने, विशेषतः दुचाकी या खडीवरून घसरून गंभीर अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे. निष्काळजीमुळे एखाद्याचा जीव गेला किंवा गंभीर दुखापत झाली, तर त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. ओव्हरलोड वाहतूक आणि अपुऱ्या झाकणाच्या डंपरमुळे खडी सांडण्याचे प्रमाण वाढले असून, याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे, असे पालीतील हभप महेश पोंगडे यांनी सांगितले.
कठोर कारवाईची मागणी
या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रवासी, सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. संबंधित डम्परमालक, चालक आणि दगड खाणमालकांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी होत आहे. वाहतूक विभागाने ओव्हरलोड वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अचानक तपासणी मोहीम राबवावी, अशीही मागणी जोर धरू लागली आहे.
आंदोलनाचा इशारा
पाली नगरपंचायत, पोलिस प्रशासन आणि महसूल विभागाने संयुक्तपणे पुढाकार घेऊन रस्त्यावरील ही खडी तातडीने हटवावी आणि वाहतूक सुरक्षित करावी. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही बाब अत्यंत गंभीर असून, प्रशासनाने याची तातडीने दखल घेणे आवश्यक आहे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही काही नागरिकांनी दिला आहे.
फोटो ओळ, पाली : वावळोली-पाली रस्त्यावर सांडलेली खडी आणि त्यामुळे निर्माण झालेली धोकादायक स्थिती.
(छायाचित्र, अमित गवळे)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

