जलवाहतुक कंपन्यांना डिजिटल पेमेंटचा तिटकारा

जलवाहतुक कंपन्यांना डिजिटल पेमेंटचा तिटकारा

Published on

जलवाहतूक कंपन्यांना डिजिटल पेमेंटचा तिटकारा
भरसमुद्रात रोकड नसल्याने प्रवाशांची अडचण; मुंबई-मांडवा जलमार्गावरील प्रकार
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १० : मुंबई-मांडवा हा जलमार्ग अल्पावधीत लोकप्रिय झाला आहे. सर्वत्र डिजिटल पेमेंटचा स्वीकार होत असताना या जलमार्गावर अद्याप रोख रकमेवरच तिकीट देण्याची पद्धत सुरू आहे. यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अनेक वेळा भरसमुद्रात तिकीट काढताना खिशात रोकड नसल्यास इतर प्रवाशांकडे पैसे मागण्याची वेळ येत असल्याचे चित्र दिसून येते.
महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाने या समस्येवर तोडगा काढण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर डिजिटल पेमेंटची सुविधा सुरू केली होती. या यंत्रणेनुसार अधिकृत स्कॅनरद्वारे क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर तिकिटाची रक्कम थेट मेरीटाइम बोर्डाच्या खात्यात जमा होणार होती. त्यानंतर आवश्यक शासकीय कर वजा करून उर्वरित रक्कम संबंधित वाहतूक कंपन्यांच्या खात्यात वर्ग केली जाणार होती. मात्र या पारदर्शक आणि नियंत्रित यंत्रणेला प्रवासी लाँच कंपन्यांकडून तीव्र विरोध करण्यात आला. कंपन्यांनी समुद्रात नेटवर्क उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करीत डिजिटल पेमेंट व्यवहार अशक्य असल्याचे सांगितले. परिणामी पुन्हा जुन्याच पद्धतीने रोख चलनाच्या बदल्यात तिकीट देण्याची व्यवस्था सुरू करण्यात आली. या निर्णयाचा सर्वाधिक फटका नवख्या व घाईघाईत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसत आहे.

गर्दीच्या वेळेस गोंधळ
मुंबई-मांडवा जलमार्गावर दररोज प्रवाशांची संख्या वाढत असून पीएनपी, मालदार, अजंठा अशा कंपन्यांच्या लाँचेस प्रवाशांनी खचाखच भरलेल्या असतात. अनेक प्रवासी वेळेअभावी ऑनलाइन किंवा तिकीट खिडकीवर रांगेत उभे न राहता थेट लाँचमध्ये बसतात आणि नंतर तिकीट काढतात. मात्र तेथे डिजिटल पेमेंट स्वीकारले जात नसल्याचे लक्षात येताच कोणाकडे सुट्टे पैसे आहेत का, अशी विचारणा सुरू होते. याचा त्रास मोठ्या प्रमाणात जाणवत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. प्रवाशांनी लेखी स्वरूपातही यासंदर्भात मेरीटाइम बोर्डाकडे तक्रारी केल्या आहेत.

डिजिटल प्रणाली सुरू करण्याची मागणी
बहुतांश व्यवहार मोबाईल वॉलेट, यूपीआय किंवा कार्डद्वारे होत असताना, रोख पैशांवर अवलंबून असलेली ही व्यवस्था कालबाह्य ठरत असल्याची भावना प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे. पारदर्शकता, करचुकवेगिरीला आळा आणि प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी मेरीटाइम बोर्डाने सुरू केलेली डिजिटल प्रणाली कायमस्वरूपी लागू करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

ऑनलाइन तिकीट काढण्याची सुविधा आहे. परंतु लाँचमध्ये बसल्यानंतर डिजिटल पेमेंटद्वारे तिकीट काढण्याची सुविधा नाही. एमएमबीने ही पद्धत सुरू केली होती. ती काही दिवस चालली; मात्र समुद्रात आल्यानंतर मोबाईल नेटवर्क मिळत नसल्याचे कारण दाखवत ही पद्धत कंपन्यांनी बंद ठेवली आहे.
- आशीष मानकर, बंदर निरीक्षक, मांडवा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com