शिव्या देणाऱ्यांना जिजाऊ पुरस्कार देणे म्हणजे त्यांचा अपमान’

शिव्या देणाऱ्यांना जिजाऊ पुरस्कार देणे म्हणजे त्यांचा अपमान’

Published on

शिव्या देणाऱ्यांना जिजाऊ पुरस्कार देणे म्हणजे त्यांचा अपमान’
शेकाप नेते जयंत पाटील यांचे मानसी दळवी यांच्यावर टीकास्त्र; थळ मतदारसंघातून सानिका घरत यांची उमेदवारी जाहीर
अलिबाग, ता. १८ (बातमीदार) : राजमाता जिजाऊंनी महाराष्ट्राला सुसंस्कृतपणा, चारित्र्य आणि मूल्याधिष्ठित जीवन जगण्याची शिकवण दिली. त्यांनी कधीही शिवीगाळ किंवा असंस्कृत वर्तन केले नाही. अशा जिजाऊंच्या नावाचा पुरस्कार शिव्या देणाऱ्यांना दिला जात असेल, तर तो जिजाऊंचाच अपमान आहे, अशी तीव्र टीका शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी शिंदे गटातील आमदार पत्नी मानसी दळवी यांच्यावर केली. सध्याच्या राजकारणाचा स्तर पाहता आत्मचिंतन करण्याची वेळ आली असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट शब्दांत सांगितले.
रविवारी (ता. १८) अलिबाग येथील रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात आयोजित बैठकीत जयंत पाटील बोलत होते. यावेळी त्यांनी आगामी रायगड जिल्हा परिषद निवडणुकीसाठी थळ जिल्हा परिषद मतदारसंघातून शेकापच्या उमेदवार म्हणून सानिका सुरेश घरत यांची अधिकृत घोषणा केली. सुशिक्षित, उच्चशिक्षित आणि चारित्र्यवान उमेदवार म्हणून सानिका घरत यांना निवडून देण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. हा विजय महाराष्ट्राच्या राजकारणात नवा इतिहास घडवेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील, महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे, रायगड बाजार समितीचे चेअरमन नृपाल पाटील, कामगार आघाडी प्रमुख ॲड. प्रदीप नाईक, ज्येष्ठ नेते द्वारकानाथ नाईक, जिल्हा सहचिटणीस ॲड. गौतम पाटील, तालुका चिटणीस सुरेश घरत, उमेदवार सानिका घरत यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी, महिला व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जयंत पाटील पुढे म्हणाले की, शेकापच्या माध्यमातून थळ व नवगाव परिसरात रस्ते, बंधारे यांसारखी विकासकामे करण्यात आली; मात्र कधीही त्याचे श्रेय घेण्यासाठी फलकबाजी करण्यात आली नाही. विरोधक मात्र केवळ नारळ फोडण्यात पुढे असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. अलिबागचा आमदारकीचा इतिहास वैभवशाली असून नाना कुंटे, मधुकर ठाकूर यांसारख्या नेत्यांनी स्वच्छ प्रतिमा जपली, याची आठवण करून देत त्यांनी सध्याच्या राजकारणाशी तुलना केली. थळ ग्रामपंचायतीला आरसीएफ कंपनीकडून मिळणाऱ्या साडेसात कोटी रुपयांच्या घरपट्टीबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित करत, विशेष लेखापरीक्षण झाल्यास गंभीर बाबी उघड होऊ शकतात, असे सूचित केले. महिला राखीव असलेल्या थळ मतदारसंघात सुरेश घरत यांनी केलेल्या दीर्घकालीन जनसंपर्काच्या कामाचा विचार करून त्यांच्या कन्येला उमेदवारी देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com