अलिबागमध्ये क्रीडा चळवळीला नवे बळ
अलिबागमध्ये क्रीडा चळवळीला नवे बळ
‘मेरा भारत, रायगड’ व ओएसिस संस्थेच्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांना प्रतिसाद
अलिबाग, ता. २१ (बातमीदार) : मुरूड तालुक्यात युवक-युवतींमधील क्रीडासंस्कृतीला चालना देण्याच्या उद्देशाने भारत सरकारच्या क्रीडा व युवा कार्यक्रम मंत्रालयाअंतर्गत संचालित ‘मेरा भारत, रायगड’ आणि ओएसिस बहुउद्देशीय समाजाभिमुख संस्था, रेवदंडा यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांना तालुक्यातील युवक-युवतींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याने परिसरातील क्रीडा चळवळीला नवे बळ मिळाले आहे.
या क्रीडा स्पर्धांमध्ये युवकांसाठी कबड्डी, युवतींसाठी खो-खो, तसेच युवक व युवतींसाठी ४०० मीटर धावणे आणि गोळाफेक या क्रीडाप्रकारांचा समावेश करण्यात आला होता. प्रत्येक सामना शेवटच्या क्षणापर्यंत चुरशीचा ठरला. खेळाडूंनी दाखवलेली जिद्द, सांघिक खेळाची भावना आणि शिस्तबद्ध खेळ यामुळे उपस्थित प्रेक्षकांनीही खेळाडूंना भरभरून दाद दिली. या वेळी जिल्हा युथ आयकॉन तपस्वी गोंधळी, ज्येष्ठ विधिज्ञ व समाजसेविका ॲड. नेहा राऊत, समाजसेवक भारत बागवे, ओएसिस संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रतीक कोळी, सहसचिव साहिल साळुंखे, स्वयंसेवक समन्वयक दर्श नागोटकर, सहसंस्थापक प्रतीक पाटील, तसेच स्वयंसेवक वेदांती महाडिक, मनस्वी वायरे, श्रवण घाटबाणे आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांनी खेळाडूंना मार्गदर्शन करत युवकांनी शिक्षणासोबत क्रीडाक्षेत्रातही करिअर घडवावे, असे आवाहन केले. स्पर्धांच्या निकालानुसार कबड्डी (पुरुष) गटात मुरूड पद्मदुर्ग संघाने प्रथम, तर संघर्ष मजगाव संघाने द्वितीय क्रमांक पटकावला. खो-खो (महिला) गटात स्पर्धा विश्व अकॅडमी वॉरियर्स संघ प्रथम, तर प्रिझम रणरागिनी संघ द्वितीय ठरला. ४०० मीटर धावणे आणि गोळाफेक या स्पर्धांमध्येही युवक–युवतींनी उल्लेखनीय कामगिरी करत आपली गुणवत्ता सिद्ध केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

