अलिबागमध्ये रंगणार राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धा
अलिबागमध्ये रंगणार राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धा
देशातील १९ राज्यांचा सहभाग; ६५० नेमबाजांचा लागणार कस
अलिबाग, ता. २१ (बातमीदार) : रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग येथील आरसीएफ स्पोर्ट कॉम्प्लेक्स, कुरूळ येथे २२ ते २६ जानेवारी या कालावधीत राष्ट्रीय स्तरावरील फिल्ड इनडोअर आर्चरी (धनुर्विद्या) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर्स (आरसीएफ), रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, फिल्ड आर्चरी असोसिएशन ऑफ इंडिया आणि फिल्ड आर्चरी असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.
या राष्ट्रीय स्पर्धेसाठी देशातील १९ राज्यांमधील सुमारे ६५० महिला व पुरुष धनुर्धारांनी सहभाग नोंदविला असून, राज्यस्तरावर यश मिळवलेल्या नेमबाजांचा कस अलिबागमध्ये पाहायला मिळणार आहे, अशी माहिती फिल्ड आर्चरी असोसिएशन ऑफ इंडियाचे महासचिव सुभाष नायर यांनी दिली. २२ ते २६ जानेवारीदरम्यान पाच दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत ७ वर्षांखालील, १० वर्षांखालील, १४ वर्षांखालील, १७ वर्षांखालील, १९ वर्षांखालील, वरिष्ठ गट तसेच वरिष्ठ अनुभवी धनुर्धर गट अशा विविध वयोगटांमध्ये स्पर्धा खेळवण्यात येणार आहेत. स्पर्धेचा उद्घाटन सोहळा २३ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता आरसीएफ स्पोर्ट कॉम्प्लेक्स, कुरूळ, अलिबाग येथे पार पडणार आहे. या उद्घाटन कार्यक्रमास राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर्सचे कार्यपालक संचालक हिरडे, रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक, आरसीएफचे चीफ मॅनेजर (ॲडमिन) महेश पाटील, फिल्ड आर्चरी असोसिएशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष सीताराम चव्हाण, संजय पिटवा, सहसचिव रितिका नायर, उपाध्यक्ष अनुप देढे, मनीष जेडली आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रीय स्तरावरील ही स्पर्धा अलिबाग व रायगड जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरणार असून, क्रीडा क्षेत्रात जिल्ह्याची ओळख अधिक दृढ होण्यास मदत होणार आहे.
.............
‘नाईन स्पॉट’ विशेष आकर्षण
ही स्पर्धा महिला व पुरुष अशा दोन्ही गटांसाठी स्वतंत्रपणे होणार आहे. या राष्ट्रीय स्पर्धेतील ‘नाईन स्पॉट’ हा धनुर्विद्येचा प्रकार विशेष आकर्षण ठरणार आहे. नाईन स्पॉट प्रकारातील स्पर्धा पाच गटांमध्ये खेळवण्यात येणार आहेत. यामध्ये १०, १४, १७ आणि १९ वर्षांखालील गटांसाठी प्रथम पारितोषिक २५ हजार रुपये, द्वितीय १५ हजार रुपये आणि तृतीय १० हजार रुपये देण्यात येणार आहेत. तर वरिष्ठ गटासाठी प्रथम पारितोषिक १ लाख रुपये, द्वितीय ५० हजार रुपये आणि तृतीय २५ हजार रुपये असणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

