लवकरच ग्रामपंचायत स्तरावर हवामान केंद्र

लवकरच ग्रामपंचायत स्तरावर हवामान केंद्र

Published on

लवकरच ग्रामपंचायत स्तरावर हवामान केंद्र
हवामानातील अंदाजात येणार अचूकता; शेतकऱ्यांसाठी ठरणार उपयुक्त
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. ३१ : जिल्ह्यात सद्यःस्थितीत ७३ स्वयंचलित हवामान केंद्रे आहेत. मात्र, या केंद्रांकडून हवामानाच्या अचूक नोंदी होत नसल्याने हवामान केंद्रांची संख्या वाढवण्याची मागणी केली जात होती. केंद्र शासनाच्या वेदर इन्फॉर्मेशन नेटवर्क डाटा सिस्टीम म्हणजेच विंड्स प्रकल्पांतर्गत रायगड जिल्ह्यातील सर्व ८१० ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात येणार आहे. यामुळे २४ तास हवामान निरीक्षण केले जाणार असून, इंटरनेट, मोबाईल ॲपद्वारे हवामान घटकांबाबतची माहिती उपलब्ध होणार असल्याने ही स्वयंचलित हवामान केंद्रे शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहेत.
स्वयंचलित हवामान केंद्रांची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, काही दिवसांतच याचे काम सुरू होणार असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून देण्यात आली. रायगड जिल्ह्याचा भूभाग खूपच विस्तीर्ण असल्याने ही हवामान केंद्रे अपुरी पडतात, त्यामुळे पावसाचा अचूक अंदाज वर्तवता येत नाही. याचा फटका येथील आंबा-काजू उत्पादक बागायतदारांना सातत्याने बसत असल्याने हवामान केंद्रात वाढ करण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. मागील हंगामात याचा सर्वाधिक फटका येथील आंबा बागायतदारांना बसला. नैसर्गिक आपत्तीमुळे नेहमीच शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. झालेल्या नुकसानीच्या नोंदी तत्काळ उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेत मदत मिळत नाही. या सर्व प्रकारावर स्वयंचलित हवामान केंद्रामुळे मात करता येणार आहे. प्रशासनास अतिवृष्टीची अचूक व वेळेत माहिती मिळणार आहे. स्वयंचलित हवामान केंद्रामुळे दैनंदिन पर्जन्यमान, तापमान, वाऱ्याचा वेग इ. माहिती वेळेत मिळण्यास मदत होऊन, गावागावातील नुकसानीचा खरा अहवाल शासकीय यंत्रणेपुढे जलदतेने येण्यास मदत होणार आहे. लवकरच शासनाकडून ही केंद्रे बसवण्याची प्रक्रिया सुरू होईल.

यापूर्वीची नऊ केंद्रे बंद
यापूर्वी केवळ महसूल मंडळ स्तरावर ७७ स्वयंचलित हवामान केंद्रांकडून आकडेवारी उपलब्ध होत होती. यातील नऊ केंद्रे बंद आहेत. ती दुरुस्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ही सर्व केंद्रे आठ वर्षांपूर्वी उभारण्यात आलेली होती. तंत्रज्ञानात खूपच प्रगती झालेली असल्याने या तंत्रज्ञानाचा वापर नव्याने बसवण्यात येणाऱ्या केंद्रामध्ये होणार आहे.

एआय तंत्राचा होणार वापर
चक्रीवादळ, दुष्काळ, आग, पूर, गारपीट, ढगफुटी, थंडीची लाट आदी नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने हवामानविषयक माहिती ग्रामपंचायत स्तरावरच उपलब्ध होईल. या केंद्रांमुळे पर्जन्यमान, तापमान, सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याचा वेग या हवामानविषयक घटकांची माहिती प्राप्त होते. या घटकांसंदर्भात स्वयंचलित हवामान केंद्रांद्वारे प्राप्त माहितीचा वापर एआय प्रणाली आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे हवामानविषयक माहितीचे संकलन, विश्लेषण, शेतकऱ्यांना योग्य वेळी मार्गदर्शन इत्यादी बाबींसाठी उपयुक्त ठरेल.

या केंद्रासाठी फारच कमी जागा लागत असतानाही, हवामान केंद्र उभारण्यासाठी काही ग्रामपंचायतींमध्ये जागा उपलब्ध झालेली नाही. सद्यस्थिती असलेल्या हवामान केंद्रात वाढ झाल्यानंतर हवामानाची स्थिती अचूकपणे मांडता येईल.
- नीलेश बाबरे, स्कायमेट केंद्र प्रतिनिधी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com