रायगडमधील सर्व आदिवासी आश्रमशाळांमध्ये उलगडले ''चमत्कारां'' मागचे विज्ञान जादूटोणाविरोधी कायद्याबाबत विशेष प्रबोधन अंनिसच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी मोहीम
आदिवासी आश्रमशाळांमध्ये उलगडले चमत्कारांमागचे विज्ञान
जादूटोणाविरोधी कायद्याबाबत विद्यार्थ्यांमध्ये विशेष प्रबोधन
सकाळ वृत्तसेवा
पाली, ता. २ (वार्ताहर) ः जिल्ह्यातील आदिवासी आश्रमशाळांमध्ये राज्य शासनाच्या निर्देशानुसार जादूटोणाविरोधी कायदा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयावर विशेष प्रबोधन कार्यक्रम पार पडले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) वतीने गेल्या दोन महिन्यांत जिल्ह्यातील विविध आश्रमशाळांमध्ये हे उपक्रम राबवण्यात येत असून, विद्यार्थ्यांमधील विज्ञानाची ओढ वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
अंनिसच्या वतीने चमत्कार की हातचलाखी या सर्व बाबींचा प्रात्यक्षिकातून उलगडा करण्यात आला. ग्रामीण व दुर्गम भागात अज्ञान आणि भीतीपोटी जादूटोणा, करणी-बाधा यांसारख्या अनिष्ट प्रथांना खतपाणी मिळते. या भोंदूगिरीचा पर्दाफाश करण्यासाठी अंनिसच्या कार्यकर्त्यांनी शास्त्रीय माहिती देऊन या प्रात्यक्षिक करून दाखवले. यात प्रामुख्याने हातातून अग्नी प्रकट करणे, नारळातून करणी काढणे, गडूतून भूत उतरविणे आणि पेटता कापूर गिळणे अशा प्रयोगांचा समावेश होता. या सर्व कृतींमागे केवळ विज्ञान आणि हातचलाखी असून, कोणताही दैवी चमत्कार नसल्याचे विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले.
या वेळी महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानवीय अनिष्ट अघोरी प्रथा आणि जादूटोणा यांना प्रतिबंध व समूळ उच्चाटन अधिनियम-२०१३ या कायद्याची सविस्तर माहिती देण्यात आली. लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध कशी तक्रार करावी, याचे मार्गदर्शन प्रमुख मार्गदर्शक संदेश गायकवाड आणि अमित निंबाळकर यांनी केले. या मोहिमेत अंनिस जिल्हा कार्याध्यक्ष संदेश गायकवाड, जिल्हा प्रधान सचिव अमित निंबाळकर यांच्यासह जगदीश डंगर, रमाकांत घरत, तुषार ठोंबरे या कार्यकर्त्यांनीही सक्रिय सहभाग घेतला. आश्रमशाळेतील मुख्याध्यापकांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमांचे सूत्रसंचालन शिक्षकांनी केले, तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापकांनी मानले.
आदिवासी विकास विभाग व सर्वच आश्रमशाळांनी या उपक्रमास उत्तम सहकार्य केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या विचारांची कवाडे उघडली. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन आत्मसात करून समाजातील अंधश्रद्धेचा अंधार दूर करावा.
- संदेश गायकवाड, जिल्हा कार्याध्यक्ष, अंनिस
अंधश्रद्धेला थारा देणार नाही
जिल्ह्यातील कोलघर, सानेगाव, डोलीवली, सावरसई, वरवणे, वरसई, साई, पिंगळस, चाफेवाडी, पाथरस व भालिवडी या सर्व आश्रमशाळांमध्ये हे कार्यक्रम उत्साहात पार पडले. प्रत्येक कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी आम्ही अंधश्रद्धेला थारा देणार नाही, अशी सामूहिक शपथ घेतली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

