''हिंद दी चादर'' गुरु तेग बहादूर साहिब यांचा गौरवशाली इतिहास नवघर शाळेत घुमला व्याख्यान, रॅली आणि प्रश्नमंजुषेतून विद्यार्थ्यांना प्रेरणा ३५० व्या प्रकाश पर्वाचे उत्साहात आयोजन
नवघर शाळेत घुमला गुरु तेग बहादूर साहिब यांचा जयघोष
३५० व्या प्रकाश पर्वाच्या निमित्ताने रॅली आणि व्याख्यानाचे आयोजन
पाली, ता. १६ (वार्ताहर) ः मानवी मूल्यांसाठी आपले सर्वोच्च बलिदान देणारे शिखांचे नववे गुरु, गुरु तेग बहादूर साहिब यांच्या ३५० व्या प्रकाश पर्वाचे (शताब्दी महोत्सव) औचित्य साधून नवघर शाळेत रॅली आणि व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. गुरुवारी (ता. १२) पार पडलेल्या या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी गुरुंच्या जीवनकार्याचा आणि त्यागाचा आदर्श घेतला.
कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते म्हणून भार्जे येथील गुरुद्वाराचे गुरु बचित्तरसिंग उपस्थित होते. त्यांनी गुरु तेग बहादूर साहिब यांच्या बालपणापासून ते त्यांच्या आध्यात्मिक जीवनापर्यंतचा प्रवास उलगडला. अन्यायाविरुद्ध ढाल बनून उभे राहिल्यामुळेच त्यांना‘हिंद दी चादर’ (हिंदुस्थानचे रक्षण करणारे कवच) असे का संबोधले जाते, हे त्यांनी सोप्या शब्दांत विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी व्याख्यानानंतर एक विशेष प्रश्नमंजुषा घेण्यात आली. बचित्तरसिंग यांनी विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे देणाऱ्या विद्यार्थ्यांना जागीच भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. तसेच, कार्यक्रमात सहभागी सर्व विद्यार्थ्यांना पुस्तके भेट म्हणून देण्यात आली. या सोहळ्याला रिओप्लास्टचे व्यवस्थापक सुखविंदर सिंग, गुरु बच्चन सिंग आणि गुरुद्वाराचे ग्रंथी ग्यानी विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता बैकर यांनी सर्व पाहुण्यांचे उत्साहात स्वागत केले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन उपशिक्षक राजेंद्र अंबिके यांनी केले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वृषाली गुरव, शीतल पाटील, अनुजा माने आणि रुपाली लेंडवे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमानंतर काढलेल्या रॅलीच्या माध्यमातून गुरु तेग बहादूर साहिब यांचा शांतता आणि त्यागाचा संदेश संपूर्ण परिसरात पोहोचवण्यात आला.
मनात मानवी मूल्यांची रुजवण
गुरु तेग बहादूर साहिब यांचा इतिहास आणि त्यांचे कार्य अत्यंत प्रेरणादायी आहे. आजच्या बहुमोल व्याख्यानातून विद्यार्थ्यांच्या मनात मानवी मूल्यांची रुजवण झाली आहे. शिवाय विद्यार्थ्यांना मिळालेल्या भेटवस्तूमुळे विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणीत झाला, असे
राजेंद्र अंबिके यांनी म्हंटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

