पालीत डंपरचा पुन्हा धुमाकूळ महावितरणचे कर्मचारी थोडक्यात बचावले कंबरेला दुखापत ओव्हरलोड डंपर वाहतुकीमुळे नागरिक संतप्त
पालीत ओव्हरलोड डंपरचा धुमाकूळ
महावितरण कर्मचारी थोडक्यात बचावले
कंबरेला दुखापत; अवजड वाहतुकीविरोधात नागरिक आक्रमक
पाली, ता. २८ (वार्ताहर) : अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली शहरात ओव्हरलोड डंपरमुळे अपघातांची मालिका सुरूच असून शुक्रवारी (ता. २७) महावितरणचे कर्मचारी श्री. सोनवणे यांच्या दुचाकीवर डंपर चढवल्याने भीषण अपघात झाला. प्रसंगावधान राखत त्यांनी दुचाकीवरून उडी मारल्याने मोठा अनर्थ टळला; मात्र त्यांच्या कंबरेला दुखापत झाली. अपघातानंतर चालक न थांबता पुढे गेल्याने संतप्त नागरिकांनी श्रीकांत ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली पाठलाग करून डंपर नगरपंचायत कार्यालयासमोर अडवून चालकाला पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेनंतर पालीत प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
पालीत अवजड वाहतुकीमुळे अपघात होण्याची ही पहिलीच वेळ नाही. जानेवारी महिन्यात ग. बा. वडेर हायस्कूलजवळ खडीच्या डंपरच्या फाळक्याची कडी तुटून ग्रामविकास अधिकारी सचिन केंद्रे गंभीर जखमी झाले होते. अवघ्या दीड महिन्यात पुन्हा तसाच प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. शाळकरी विद्यार्थी, भाविक, ज्येष्ठ नागरिक यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून तातडीने कडक कारवाईची मागणी होत आहे.
चौकट
नगरपंचायतीचा ठराव
नागरिकांच्या तक्रारीनंतर पाली नगरपंचायतीने सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत शहरातून अवजड वाहतूक पूर्णपणे बंद करण्याचा ठराव (क्र. १९७) संमत केला आहे. या संदर्भात २७ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्र पाठवून पुढील कार्यवाहीची मागणी करण्यात आली आहे. पोलीस विभागाचा तांत्रिक अहवाल मिळाल्यानंतर अधिकृत आदेश काढण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी माधुरी मडके यांनी दिली.
बाह्यवळण मार्गाची प्रतीक्षा
पाली शहरातून जाणारी अवजड वाहतूक थांबवण्यासाठी बाह्यवळण मार्ग हा एकमेव पर्याय मानला जात आहे. मात्र गेल्या १२–१५ वर्षांपासून मंजुरी मिळूनही हा मार्ग रखडल्याने अपघातांचे प्रमाण वाढत आहे. ओव्हरलोड वाहतुकीवर कडक निर्बंध आणि बायपास मार्ग पूर्ण होईपर्यंत नागरिकांचा जीव धोक्यातच राहणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

