सौर ऊर्जा लावूनही ज्येष्ठ नागरिकाला बसतोय महावितरणचा शॉक ''पीएम सूर्य घर'' योजनेत तांत्रिक गोंधळ

सौर ऊर्जा लावूनही ज्येष्ठ नागरिकाला बसतोय महावितरणचा शॉक ''पीएम सूर्य घर'' योजनेत तांत्रिक गोंधळ

Published on

सौरऊर्जा लावूनही महावितरणचा शॉक
ज्येष्ठ नागरिकाला जादा बिले ः पीएम सूर्य घर योजनेत तांत्रिक गोंधळ
पाली, ता. ७ (वार्ताहर) ः केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री सूर्य घर योजनेतंर्गत सौर ऊर्जा प्रकल्प बसवूनही एका ७२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला जादा बिलाचा शॉक बसला आहे. खांडपोली येथील रहिवासी शशिकांत दिवेकर यांनी सौरप्रकल्प कार्यान्वित असूनही तब्बल १२ हजार ५०० रुपयांचे जादा बिल आल्याची तक्रार केली आहे. महावितरणच्या तांत्रिक गोंधळामुळे आर्थिक आणि मानसिक त्रासाला शशिकांत यांना सामोरे जावे लागत आहे.
शशिकांत दिवेकर यांनी तीन किलोवॅट क्षमतेचा सौर प्रकल्प बसवला. यासाठी त्यांनी स्वतःचे पैसे गुंतवले आणि शासनाचे अनुदानही मिळवले. प्रकल्प पूर्ण झाल्यावर महावितरणने नेट मीटर बसवले, मात्र गेल्या सहा महिन्यांत निर्माण झालेल्या १४५० युनिट्सची नोंदच बिलात झालेली नाही. परिणामी, सौर ऊर्जेचा फायदा मिळण्याऐवजी त्यांना जादा बिले येत आहेत. शशिकांत दिवेकर यांनी याप्रकरणी ऊर्जामंत्री आणि महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दाद मागितली आहे. तातडीने बिलात दुरुस्ती झाली नाही आणि सौर युनिट्सचे समायोजन झाले नाही, तर ग्राहक मंच आणि लोकायुक्तांकडे धाव घेण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

तांत्रिक अडचणीमुळे समस्या
या प्रकरणावर महावितरण कार्यालय पालीचे उपकार्यकारी अभियंता बालाजी छात्रे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले की, दिवेकर यांच्या सौर प्रकल्पाबाबतची तक्रार आमच्याकडे प्राप्त झाली आहे. हा प्रकार प्रामुख्याने पोर्टलवरील तांत्रिक त्रुटीमुळे उद्भवला आहे. संबंधित एजन्सीला कागदपत्रे अपलोड करताना अडचणी येत होत्या. आम्ही स्वतः या प्रकरणात पुढाकार घेऊन एजन्सीचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळवला असून तो मुख्य कार्यालयातील आयटी टीमकडे पाठवला आहे. तसेच रोहा विभागाचे कार्यकारी अभियंता यांना देखील हा विषय सांगितला आहे. महावितरणकडून कोणताही विलंब झालेला नाही, उलट आम्ही एजन्सीशी समन्वय साधून ही तांत्रिक अडचण सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत. येत्या आठवडाभरात हा प्रश्न मार्गी लागेल आणि दिवेकर यांच्या बिलातील दुरुस्ती केली जाईल.

फोटो ओळ, पाली, वीज महावितरण कार्यालय पाली. (छायाचित्र, अमित गवळे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com