अतिक्रमणाविरोधात बेघरआळी ग्रामस्थांचे नगरपंचायत कार्यालयाखाली साखळी उपोषण सुरु
अतिक्रमणाविरोधात बेघरआळी ग्रामस्थ आक्रमक
नगर पंचायत कार्यालयाखाली साखळी उपोषण सुरू
पाली, ता. ११ (वार्ताहर) ः पाली नगर पंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक २ मधील बेघरआळी येथे समाजमंदिराच्या हक्काच्या जागेवर झालेल्या अतिक्रमणाविरोधात ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. वारंवार तक्रार करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने ग्रामस्थांनी अखेर मंगळवार (ता. १०) पासून नगर पंचायत कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच साखळी उपोषणास सुरुवात केली आहे.
बेघरआळी येथील होळीमाळ परिसरात सुमारे ४० वर्षांपासून जुने समाजमंदिर आहे. या मंदिरालगत असलेल्या मोकळ्या जागेवर एका लाभार्थ्याने घरकुल योजनेअंतर्गत बांधकाम सुरू केले आहे. मात्र, हे बांधकाम करताना समाजमंदिराच्या राखीव जागेवर अतिक्रमण करण्यात आल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, डिसेंबर २०२५ पासून या अतिक्रमणाबाबत नगर पंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांकडे आणि अभियंत्याकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला. संबंधित अभियंत्याने पाच ते सहा वेळा जागेची पाहणी केली, परंतु केवळ नोटिसा बजावण्यापलीकडे कोणतीही ठोस कारवाई केली नाही. प्रशासन केवळ वेळकाढूपणा करत असून, अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना पाठबळ दिले जात आहे का, असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
या वेळी सागर मिसाळ, ललित ठोंबरे, अमित निंबाळकर, संजय वझरकर, आकाश दळवी, संतोष परब, सूर्यकांत शिंदे, रवींद्र कोळंबेकर, संजय कोळंबेकर, सचिन कोळंबेकर, चिंतू काटकर, नंदकुमार गोलीपकर, दिनेश कुलाड, अनिकेत कटके, निलेश पिंडे, नितीन वझरकर, सुधीर यशवंत भगत, दीपक कोळंबेकर, महेश भगत, राजेंद्र थळे आदी स्थानिक नागरिक उपस्थित होते.
ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या
समाजमंदिराच्या जागेवरील अनधिकृत अतिक्रमण तत्काळ हटविण्यात यावे. संबंधित लाभार्थ्याच्या जागेच्या कागदपत्रांची सखोल चौकशी व्हावी आणि पुरावे नसल्यास घरकुल नामंजूर करावे. अतिक्रमणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या जबाबदार अधिकारी व अभियंत्याची चौकशी करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी. नियमांचे उल्लंघन झाले असल्यास लाभार्थ्याला दंड आकारून रक्कम वसूल करावी.
उपोषणकर्त्यांचा इशारा
जोपर्यंत आमच्या सर्व मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत हे आमरण साखळी उपोषण सुरूच राहील, असा पवित्रा बेघरआळी ग्रामस्थांनी घेतला आहे. या आंदोलनादरम्यान उपोषणकर्त्यांच्या प्रकृतीला काही इजा झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी नगर पंचायत प्रशासनाची असेल, असा इशाराही लेखी निवेदनाद्वारे दिला आहे. आता प्रशासन यावर काय पाऊल उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

