रायगडात पिकली पिवळी कलिंगडे
रायगडात पिकली पिवळी कलिंगडे
आरोही वाण ठरतोय आकर्षणाचे केंद्र
अनोख्या प्रयोगातून कृषी पर्यटनाला चालना
सकाळ वृत्तसेवा
पाली, ता. १४ (वार्ताहर) : उन्हाळ्याची चाहूल लागताच बाजारात लालचुटूक कलिंगडे दिसू लागतात. रायगड जिल्ह्यातील घोसाळे किल्ल्याच्या परिसरात मात्र यंदा काहीतरी वेगळे पाहायला मिळत आहे. येथील शेतात चक्क आरोही नावाचे पिवळा गर असणारे वैशिष्ट्यपूर्ण कलिंगड दिसत असून, पर्यटकांना आणि खवय्यांना हे कलिंगड थेट शेतातून स्वत:च्या हाताने निवडून खुडण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
वरच्या भागात इतर कलिंगडांसारखेच हिरवे दिसणारे हे फळ कापल्यानंतर आतून गडद पिवळ्या रंगाचे निघते. दिसायला आकर्षक आणि चवीला अधिक गोड असलेल्या या वाणाची लागवड येथील शेतकरी ऋषिकेश म्हात्रे व प्रवीण म्हात्रे यांनी प्रायोगिक तत्त्वावर यशस्वी केली. केवळ बाजारात मिळणारे फळ विकत न घेता ग्राहकांनी सहकुटुंब शेतात यावे, फिरण्याचा आनंद घ्यावा आणि हवे ते फळ स्वत: निवडावे, ही संकल्पना येथे राबवली जात आहे. येत्या १७ मार्च ते २७ मार्चदरम्यान ही संधी उपलब्ध आहे.
रायगड जिल्ह्यात प्रामुख्याने अलिबाग, पेण आणि रोहा परिसरात मोठ्या प्रमाणात तसेच इतरही ठिकाणी लाल कलिंगडाची लागवड होते. मात्र स्वत: निवडा आणि तोडा ही संकल्पना आणि आरोही (पिवळे कलिंगड) या वाणाची लागवड जिल्ह्यात अत्यंत मर्यादित ठिकाणी किंवा दुर्मिळ आहे. बहुतेक शेतकरी आपला माल घाऊक व्यापाऱ्यांना विकतात. मात्र थेट ग्राहकांना शेतात बोलावून विक्री केल्यामुळे शेतकऱ्याला चांगला भाव मिळेल आणि पर्यटनालाही चालना मिळणार आहे. घोसाळे किल्ल्याच्या परिसरात होणारा हा प्रयोग जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांसाठी कृषी पर्यटनाचा एक नवीन आदर्श ठरू शकतो.
चौकट १
वैशिष्ट्य आणि महत्त्व
पिवळ्या कलिंगडाची चव ही लाल कलिंगडापेक्षा किंचित वेगळी आणि अधिक मधूर असते. याचा गर लाल कलिंगडाच्या तुलनेत अधिक मऊ आणि रसाळ असतो. यामध्ये बीटा-कॅरोटीन भरपूर प्रमाणात असते, जे शरीरात व्हिटॅमिन ‘ए’ तयार करण्यास मदत करते. तसेच हे अँटिऑक्सिडंट्सचा उत्तम स्रोत आहे. बहुतांश पिवळ्या कलिंगडांमध्ये बियांचे प्रमाण लाल कलिंगडापेक्षा कमी असते.
चौकट २
शेतकरी ऋषिकेश म्हात्रे व प्रवीण म्हात्रे यांनी सांगितले, की लोकांना शेतीचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा आणि त्यांना स्वतःच्या हाताने निवडलेले १००% ताजे व दर्जेदार फळ मिळावे, या उद्देशाने आम्ही ‘पिक युअर ओन’ ही संकल्पना राबवत आहोत. आरोही या पिवळ्या कलिंगडाचे वेगळेपण आणि शेतात फिरण्याचा आनंद पर्यकांसाठी नक्कीच नवा अनुभव ठरेल. ग्राहकांच्या प्रतिसादावर या प्रयोगशील शेतीचे यश अवलंबून आहे. जास्तीत जास्त लोकांनी या उपक्रमाला भेट द्यावी.
---------
फोटो ओळ, पाली, पिवळा गर असलेले आरोही जातीचे कलिंगड.
फोटो ओळ, पाली, शेतातील आरोही जातीची कलिंगडे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

