थोरवेंच्या विरोधात तटकरेंचा ६५ कोटींचा मानहानी दावा

थोरवेंच्या विरोधात तटकरेंचा ६५ कोटींचा मानहानी दावा

Published on

थोरवेंच्या विरोधात तटकरेंचा मानहानीचा दावा
रायगडचे राजकारण पुन्हा तापले; माणगाव न्यायालयात प्रकरण

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १४ : रायगडचे खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी कर्जतचे शिंदे शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांच्याविरुद्ध तब्बल ६५ कोटी तीन हजार रुपयांचा मानहानीचा दावा दाखल करीत रायगडच्या राजकारणात मोठी खळबळ उडवली आहे. माणगाव येथील वरिष्ठ दिवाणी न्यायालयात हा दावा नुकताच दाखल करण्यात आला असून, त्यासाठी तीन लाख रुपयांचे न्यायालयीन शुल्क भरल्याची माहिती समोर आली आहे.
खोपोली नगर परिषदेच्या निवडणुकीदरम्यान उद्भवलेल्या राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर खोपोली येथील मंगेश काळोखे यांच्या हत्येनंतर हे प्रकरण अधिक चिघळले होते. २७ डिसेंबर २०२५ला आमदार थोरवे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत खासदार तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केल्याचे दाव्यात नमूद करण्यात आले आहे. रायगडमध्ये ‘रक्तरंजित राजकारण’ सुरू असून, तटकरे जिल्ह्याचे ‘आका’ असल्याप्रमाणे वागत असल्याचा तसेच काही कार्यकर्त्यांच्या हत्यांमागे त्यांचा हात असल्याचा आरोप थोरवे यांनी केल्याचे म्हटले आहे. या प्रकरणामुळे रायगड जिल्ह्यातील राजकारण पुन्हा तापले असून, शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत. आता न्यायालय या संवेदनशील प्रकरणात काय भूमिका घेते, याकडे राजकीय वर्तुळासह सर्वांचे लक्ष लागले आहे.
----
खोटे आरोप राजकीय हेतूने प्रेरित : तटकरे
खासदार तटकरे यांनी सर्व आरोप फेटाळून लावत हे विधान पूर्णपणे खोटे व राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा दावा केला आहे. गेल्या तीन दशकांच्या सार्वजनिक जीवनात आपण विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या असून, अशा आरोपांमुळे आपली प्रतिमा गुन्हेगारी प्रवृत्तीशी जोडली जात असल्याचे त्यांनी नमूद केले. या विधानांमुळे समाजात चुकीचा संदेश जात असल्याचा आरोपही दाव्यात करण्यात आला आहे.
---
न्यायालयाकडे तीन प्रमुख मागण्या
दाव्यात खासदार तटकरे यांनी न्यायालयाकडे काही महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. आमदार थोरवे यांनी केलेले आरोप खोटे व मानहानिकारक असल्याचे जाहीर करावे, बदनामी करणारे व्हिडिओ सर्व माध्यमांवरून हटवावेत आणि भविष्यात अशा प्रकारची विधाने करण्यास त्यांना मनाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच मानसिक व सामाजिक नुकसानीपोटी ६५ कोटी तीन हजार रुपयांची भरपाई देण्याची मागणीही करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com