जंगलात व माळरानात लाकूडफाट्यासाठी वणवण इंधन टंचाईचा निसर्गाला फटका पर्यावरणासह मानवी आरोग्यावरही टांगती तलवार लाकूड फाटा ही महागला
जंगलात व माळरानात लाकूडफाट्यासाठी वणवण
इंधनटंचाईचा निसर्गाला फटका
पर्यावरणासह मानवी आरोग्यावरही टांगती तलवार
लाकूडफाटाही महागला
पाली, ता. १९ (वार्ताहर) ः युद्धजन्य परिस्थितीचा थेट परिणाम आता रायगडच्या ग्रामीण आणि निमशहरी भागातील स्वयंपाकघरांवर दिसू लागला आहे. गॅस सिलिंडरचा पुरवठा विस्कळित झाल्याने नागरिकांना पुन्हा एकदा पारंपरिक चुलींकडे वळावे लागत आहे. मात्र, या अघोषित इंधनटंचाईमुळे रायगडच्या समृद्ध वनसंपदेचा ऱ्हास होत असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. शिवाय सध्या लाकूडफाट्याचे भावदेखील वाढले आहेत.
रायगड हा आपल्या वनसंपदेसाठी आणि जैवविविधतेसाठी ओळखला जातो. मात्र, गॅसअभावी हॉटेल व्यावसायिक आणि गृहिणींना आता लाकूडफाट्याशिवाय पर्याय उरलेला नाही. कडक उन्हात लाकूड गोळा करण्यासाठी महिला व पुरुष तसेच वृद्ध आणि लहानग्यांनादेखील जंगलात भटकावे लागत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत असून, पर्यावरणाचे संतुलन बिघडण्याची भीती निर्माण झाली आहे. चुलीच्या धुरामुळे मानवी आरोग्यावरही गंभीर परिणाम होत आहेत. तासनतास धुराच्या सान्निध्यात राहिल्याने डोळ्यांचे विकार, श्वसनाचे त्रास आणि फुप्फुसाचे आजार बळावण्याची शक्यता वर्तवली आहे.
मुळातच हवामान बदलाचे संकट समोर असताना इंधनटंचाईमुळे पुन्हा लाकूडफाट्याकडे वळणे हे पर्यावरणासाठी घातक आहे. जंगलतोडीमुळे केवळ झाडे कमी होत नाहीत, तर त्यावर अवलंबून असणारी जैवविविधताही धोक्यात येते. प्रशासनाने इंधनाचा पर्यायी पुरवठा सुरळीत करणे आवश्यक आहे, अन्यथा वर्षानुवर्षे जपलेली वनसंपदा नष्ट व्हायला वेळ लागणार नाही.
- शंतनू कुवेसकर, पर्यावरण अभ्यासक, माणगाव
निसर्गावर कुऱ्हाड, जैवविविधता धोक्यात
जळाऊ लाकडासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत असल्याने वनक्षेत्राचे प्रमाण वेगाने घटण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम जंगलातील पक्ष्यांच्या घरट्यांवर व वन्यजीवांच्या अधिवासावर आणि अन्नावर होऊन निसर्गाचे संतुलन बिघडण्याची शक्यता आहे. झाडांची संख्या कमी झाल्यामुळे उन्हाची तीव्रता वाढून भविष्यात पाणीटंचाई आणि तापमानातील वाढ, असे गंभीर परिणाम सहन करावे लागतील.
गॅस मिळेना, धूर सोसवेना
पालीतील लता माळी या गृहिणीने सांगितले की इंधनटंचाईमुळे सर्वसामान्य दुहेरी संकटात सापडले आहेत. गॅस सिलिंडर उपलब्ध नसल्याने नाइलाजास्तव अनेक गृहिणींना भरउन्हात लाकडे गोळा करण्यासाठी वणवण करावी लागत आहे. चुलीवर स्वयंपाक करताना निघणाऱ्या धुरामुळे डोळ्यांचे विकार आणि श्वसनाचे त्रास जाणवू लागले आहेत.
लाकूडफाटा महागला
दुसरीकडे, व्यावसायिक गॅसअभावी हॉटेल चालवणे कठीण झाले असून, चुलीवर जेवण बनवताना वेळ आणि श्रम दोन्ही वाया जात आहेत. लाकूडफाट्याचे भावही वधारल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट पूर्णपणे कोलमडले आहे. याशिवाय लाकूडविक्रेत्यांना आता सुगीचे दिवस आले आहेत.
फोटो ओळ,
पाली ः रानोमाळ उन्हाचे चटके सहन करत लाकूडफाटा नेताना ज्येष्ठ मंडळी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

